आरबीआयच्या नियमांना गुगलची सहमती

11 Sep 2018 15:17:24

 

 

 
नवी दिल्ली : इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने पेमेंट सेवांशी संबंधित डेटा स्थानिक स्तरावर संकलित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. कंपनीने या नियमांचे पालन करण्यासाठी डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद ऑगस्ट महिन्यात अमेरिका दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कॅलिफोर्नियातील गुगलच्या मुख्यालयाला भेट दिली.
 
 
भेटीदरम्यान, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि रविशंकर प्रसाद यांच्यात चर्चा झाली. यावेळी गुगलकडून भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सुरक्षतेसाठी पेमेंट सेवा देणाऱ्या सर्व कंपनांना निर्देश दिले आहेत. यामध्ये कंपन्यांनी पेमेंट सेवा संबंधित सर्व डेटा देशात स्टोअर केला पाहिजे. यासाठी कंपन्यांना ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने भारतात पेमेंट सेवांशी संबंधित सुविधा सुरु केल्या आहेत. गुगल तेज या पैशांच्या देवाण-घेवाण संबंधित अॅपचे नाव बदलून गुगल पे करण्यात आले आहे. या अॅपद्वारे गुगल पुढील काही महिन्यांपासून कर्ज वाटणार आहे. यासाठी गुगलने काही बँकांशी सहकार्य करार केला आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0