लढा एका बहिष्कृत आयुष्याचा...

    दिनांक  10-Sep-2018   

 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वंचित समाजासाठी नेहमी आंदोलने होतात. पण, ती सर्व भावनिक मुद्द्याची असतात. दलितांपेक्षाही पददलित असणार्या सफाई कामगारांच्या जगण्या-मरण्यावर त्यांच्या प्रश्नांवर कोणतीच आंदोलनं झाली नाहीत. मग ते रिडल्स असू दे, नामांतरण असू दे किंवा भीमा-कोरेगाव असू दे,” असे सफाई कामगार परिवर्तन संघाचे अध्यक्ष आणि ज्यांनी सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी आयुष्य वेचले, असे रमेश हरी हरळकर अत्यंत पोटतिडकीनं सांगत होते.
 

कोकणातील हरळ हे त्यांचं गाव. रमेश यांचे वडील मुंबईत सफाई कामगार म्हणून काम करत. त्यांना महानगरपालिकेतर्फे घरही मिळाले. हरी यांना तीन मुली आणि दोन मुलं. मोठा मुलगा रमेश. आपण कलाशिक्षक व्हावे, अशी रमेशची इच्छा. नोकरी करत शिकावे म्हणून दहावी पास झालेले तरुण रमेश हे महानगरपालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून कामालाही लागले आणि तो दिवस उजाडला. वडिलांच्या निवृत्तीचा. त्याकाळी नव्हे, आजही एक नियमच आहे की, महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचार्‍यांना घर मिळते. पण, ते घर पुढे टिकावायचे, तर हरी यांच्या मुलांपैकी एकाने सफाई कामगार म्हणून नोकरी करणे आवश्यक होते. मुंबईमधील आसरा टिकवायचा म्हणून मनातील इच्छा मारून रमेश यांनी शाळेतील नोकरीचा राजीनामा दिला. ते हातात झाडू घेऊन सफाई काम करू लागले. पुढे ते ‘पँथर चळवळी’कडे आकर्षित झाले. तिथेही ते सफाई कामगारांचे प्रश्न मांडू लागले. तिथे त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. बाबासाहेबांनी सांगितले होते की, “घाणीचे काम सोड. तू का करतोस हे काम?” रमेश म्हणत, “माझ्यासकट हजारो सफाई कामगारांनी 100 टक्के आरक्षण असलेले कचरा सफाईचे काम सोडले, तर तात्काळ दुसरे कोणते काम मिळेल? याच कामामध्ये सोयीसुविधा निर्माण होण्यासाठी का मोर्चे-आंदोलन करत नाहीत?” यावर त्यांना कोणीही उत्तर देत नसे.

 

दिवसा सफाई काम करत असतानाच रमेश संध्याकाळी डॉ. लता काटदरे यांच्या ओळखीने ‘सत्यम क्लिनीक’ इथे काम करू लागले. एक दिवशी डॉ. लतांनी रमेश यांना कचर्‍याच्या गाडीवर पाहिले. त्यादिवशी संध्याकाळी त्या म्हणाल्या,“ केवळ राहते घर कायम राहावे, म्हणून तू स्वत:चे मन मारून सफाई कामगाराची नोकरी करू नकोस. पुढे घर टिकवण्यासाठी तुझ्या मुलानेही हेच कचरा उचलायचे काम करायचे का? तू मुलांना शिकव.” तेव्हा रमेश यांचे डोळे उघडले. जन्माने ब्राह्मण असलेल्या डॉ. लता काटदरे या वसईच्या डॉ. सदू गाळवणकर यांच्या कन्या. डॉ. गाळवणकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी. रमेश ज्या वस्तीत, ज्या समाजात वाढले होते, तिथे एक माणसाला ‘माणूस’ म्हणून बघण्याऐवजी तो आपला मागासवर्गीय आहे ना? हे पाहणारा गट तयार झाला होता. अशातच रमेश यांना सामाजिक कार्यासाठी जयंत साळगावकर यांनी ‘गणेश महानिधी पुरस्कार’ जाहीर केला. झाले, ठिणगी पडली. नवबौद्ध व्यक्तीने ‘गणेश महानिधी पुरस्कार’ स्वीकारला, हे काही समाजबांधवाना खटकले. रमेश म्हणतात, ‘’डॉ. लता काटदरे, मेधा कुलकर्णी, जयंत साळगावकर, स्नेहलता देशमुख, सुधींद्र कुलकर्णी आदी एक ना अनेक कितीतरी सवर्ण समाजातील व्यक्तींनी माझी जात किंवा माझा सफाई कामगारांचा पेशा विचारात न घेता मला मार्गदर्शन, मदत आणि सोबतही केली. जसे मागसवर्गीय म्हणून जन्म घेणे कुणाच्या हातात नसते, तसे सवर्ण म्हणून जन्म घेणेही कुणाच्या हातात नसते.”

 

यातच रमेश यांच्या मुलाने मराठा समाजाच्या मुलीशी लग्न केले. मुलगा आणि सून दोघेही उच्चशिक्षित. समाजातील काही म्होरक्यांनी सांगितले की, “सुनेला बौद्ध समाजाची दीक्षा द्या. पण, मला आणि माझ्या मुलाला हे मान्य नव्हते. जातीपलीकडे समाजाने विचार करणे गरजेचे आहे, असे आमचे मत.” काही लोकांनी वाद माजवले. रमेश रा. स्व. संघ, भाजप आणि इतर चळवळीतील ब्राह्मण सवर्णांसोबत राहतोे. असे करून तो बाबासाहेबांचा अपमान करतो. या वादाला बळी पडून हरळ गावातील समाजबांधवांनी रमेश हरळकर कुटुंबीयांना वाळीत टाकले.

 

तरीही महानगरपालिकेच्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर रमेश पूर्ण वेळ सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी काम करू लागले. जातपात, धर्म यापेक्षा सफाई कामगारांचे प्रश्न मनापासून समजून घेणार्‍यांना सोबत घेऊन ते मुंबईतील हजारो वस्त्यांपर्यंत पोहोचले. पत्नी आशाने इच्छा व्यक्त केली की, ‘’तरुणपण कष्टात गेले. आयुष्याची संध्याकाळ गावी साजरी करू.” इच्छेखातर आशा गावी राहिल्या आणि रमेश कामानिमित्त मुंबईला जाऊन येऊन होते. मोठ्या हौसेने गावी राहायला आलेल्या साध्याभोळ्या आशा यांना समाजाने टाकलेल्या बहिष्काराची झळ सोसावी लागली. गावातील समाजातील कोणी येत नसे, बोलत नसे, टाळत असत. दिवसभर आशा आणि चार मांजरी त्या मोठ्या घरात. शेवटी व्हायचे तेच झाले. आशांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळीही मदतीला कुणीही आले नाही. रमेश त्यांना घेऊन मुंबईला आले. डॉक्टरांनी आशांना ‘मृत’ म्हणून घेाषित केले. त्या वारल्यानंतर मग सगळी भावकी जमा झाली. समाज अंत्यसंस्काराला आला. त्यावेळी रमेश सगळ्यांना म्हणाले, ”जगताना मरणयातना दिल्या. आता मेल्यानंतर कशाला आलात?“ बहिष्कार घालणार्‍या एकालाही त्यांनी तिथे थांबू दिले नाही. ही घटना आजच्या युगात अर्तक्य वाटेल. पण, तिचा बळी ठरलेले साक्षीदार आहेत रमेश हरळकर. त्यांच्या सामाजिक कामासाठी त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘झाडू विरुद्ध खडू’ हा त्यांचा मंत्र. मुंबई शहरातील अक्षरश: हजारो वस्त्यांमध्ये रमेश हरळकर हा विचार घेऊन अहोरात्र जागर करत आहेत.

 
 
    माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/