चिंतामणीचीच चिंता...

10 Sep 2018 19:40:50

 


 
 
चिंतामणीचीच चिंता करावी, असा प्रकार गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत शिरलेल्या समाजकंटकांनी केला आहे. हिंदूंच्या परंपरा व सणांमध्ये शिरलेल्या विकृतीवर सश्रद्ध हिंदूंनीच टीका केली नाही तर या सगळ्यालाच अंधश्रद्धा मानणाऱ्या मंडळींनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळेल.
 
 

जेमतेम अडीच वर्षांचा मुलगा मागे ठेऊन वयाच्या २९ व्या वर्षी मेजर कौस्तुभ राणेंनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना कौस्तुभ राणेंना वीरमरण आले होते. या तरुणाची जिद्द अशी होती की, त्याला सैन्यातच जायचे होते. सैन्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी यावर्षी २६ जानेवारीला त्यांना सेना पदकाने गौरवान्वितदेखील केले होते. देशासाठी लढताना आपल्याला कधीतरी मृत्यूला सामोरे जावे लागेल याची त्यांना कल्पना नव्हती असे नाही. मेजर राणेंचे स्मरण करण्याचे कारण म्हणजे परवा मुंबईत घडलेली घटना. अशाप्रकारे वीरगती प्राप्त करणारे मेजर राणे हे महाराष्ट्रातला पहिला लष्करी कर्मचारी नव्हे. सीमेवर देशभरातले सैनिक एकत्र येऊन देशाच्या सीमा अक्षुण्ण ठेवतात म्हणूनच देशात राहणाऱ्या नागरिकांना सणवार आनंदाने साजरे करता येतात. मात्र, लालबागला परवा जे घडले ते या नागरिकांच्या कृतघ्नतेचे लाजिरवाणे लक्षण मानावे लागेल. ज्या प्रकारची सामाजिक सुरक्षा आणि तणावविरहीत वातावरण आपल्याला अनुभवता येते त्यामागे सैन्य, पोलीस यासारख्या यंत्रणांचे योगदान आपण विसरलो की, माणसे कशी उन्मत्त होतात याचाच हा प्रकार उदाहरण होता. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा गणपती परळहून आपल्या मंडपात नेण्यासाठी जी मिरवणूक काढण्यात आली, त्यात मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त सामील झाले होते. यातील काही उन्मादी मंडळींनी लालबाग पुलाखालील सार्वजनिक मालमत्तेचे भरपूर नुकसान केले. या पुलाखाली सुशोभिकरण करण्यात आले आहे आणि दुभाजकाचा अपघात टाळण्यासाठी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. सुशोभिकरणासाठी या ठिकाणी काही पुतळेही उभारले होते. मुंबई पोलिसांच्या कामाला सलाम म्हणून किंवा त्यांच्याविषयी आदराची भावना म्हणून पोलिसांची शिल्पे उभारली होती. ‘बेटी बचाव’ सारख्या शुद्ध सामाजिक आशय असलेल्या संकल्पनेचे प्रतिकात्मक शिल्पही या ठिकाणी होते. ही सारी शिल्पे गणरायाच्या आगमनाच्या आनंदात उन्मत्त झालेल्या तथाकथित गणेशभक्तांनी तोडली. महत्त्वाचे म्हणजे, गेल्यावर्षीसुद्धा अशाच प्रकारची तोडफोड करण्यात आली होती. यावर्षी हा सारा प्रकार मुक्त माध्यमांवर आल्याने या विषयाला वाचा फुटली.

 

गणेश मिरवणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. ही कोंडी दूर करण्यापेक्षा मंडळाचे कार्यकर्तेसुद्धा यातच सहभागी झाले होते. वाढता वाढता वाढलेला हा उत्साह उन्मादात कधी रुपांतरित झाला ते कुणालाही कळले नाही. टॅक्सीच्या काचा फोडणे, बसवर चढून नाचणे असे प्रकारही या ठिकाणी केले गेले. चिंचपोकळी सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली. आगमन मिरवणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होतील याची आपल्याला कल्पना नव्हती, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. झालेल्या नासधुसीची जबाबदारी मात्र मंडळाने घेतलेली नाही. मंडप उभारणी आणि ११ दिवसांच्या उत्सवावर होणाऱ्या खर्चासाठी देणग्यांतून लाखो रुपये उभारणाऱ्या मंडळाने झाल्या प्रकाराची पूर्ण जबाबदारी घेतली असती तर त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये सरळ संदेश गेला असता. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ असे संबोधन या गणपतीला कार्यकर्त्यांनीच लावले आहे. काल जे काही घडले ते ‘चिंतामणी’च्या कीर्तीत भर घालणारे मुळीच नसून उलट चिंतामणीचीच चिंता वाढविणारे आहे. एकोप्याचा संदेश देणारे हे सण आणि उत्सव आता फालतू प्रतिष्ठेचे निमित्त बनले आहेत. राम कदमांसारखी व्यक्ती जेव्हा बेताल विधाने करते किंवा गणेशमंडळाचे कार्यकर्ते अशा उन्मादी लोकांना रोखू शकत नाहीत, त्याचे मुख्य कारण म्हणजे अशा मंडळींच्या आधारावरच आता आपले सण आणि उत्सव साजरे केले जात आहेत. राम कदमांचा व्हिडिओ नीट पाहिला तर गोविंदा पथकातला एक गोविंदाच त्याला आपली व्यथा सांगतो आणि त्याल उत्तर म्हणून हे महाशय मुली उचलून आणून देण्याची भाषा करतात. माध्यमांमध्ये चर्चा सुरू होत नाही तोपर्यंत गोविंदा पथके, राम कदमांच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला, राजकीय नेते यापैकी कुणालाही याचा निषेध करून व्यासपीठ सोडावे असे वाटत नाही. या बुद्धीमांद्याला एक कारण आहे. राजकीय नेते, राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणारे गल्लीबोळातले पुढारी, स्वस्तात प्रसिद्धी मिळविण्याची अभिलाषा बाळगणारे महाभाग हेच आजकाल आपल्या उत्सवांचे आश्रयदाते झाले आहेत. उत्सवातील गोडवा व परंपरा जपण्यापेक्षा त्याचे स्वरूप अधिकाधिक महाकाय कसे करता येईल याचीच जिथेतिथे स्पर्धा लागली आहे.

 

ज्या लालबागला कालचा प्रकार घडला, त्याच लालबागमध्ये मूर्तींच्या उंचीवरून किंवा अधिकाधिक आकर्षक देखावे करण्याची स्पर्धा होतीच. पौराणिक देखावे साकारणाऱ्या या मंडळांमधली ही स्पर्धा तेव्हा तरी गोंडस आणि निकोप वाटायची. नंतर ‘अमका राजा’, ‘तमका महाराजा’ असल्या विशेषणाने गणपती सजू लागले. प्रयत्नांना यश देणाऱ्या परमेश्वरापेक्षा नवसाला पावणाऱ्या गणपतींचे प्रस्थ वाढू लागले. यात श्रद्धेचा भाग नाही, असे मुळीच नाही, पण श्रद्धेच्या नावाखाली आपल्या सणांमध्ये वाढत असलेला बीभत्सपणा समृद्ध परंपरा लाभलेल्या हिंदू धर्मालाही हुल्लडबाजी करणाऱ्या वाळवंटी धर्मांच्या रांगेत नेऊन बसवतो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दहीहंडीच्या उत्सवाला साहसी खेळ म्हणून मान्यता मागणाऱ्या पुढाऱ्यांनी गोविंदांच्या संरक्षणासाठी कुठल्याही प्रकारच्या निकषाचा पाठपुरावा केलेला नाही. गोविंदांच्या सणावर आपल्या ‘इव्हेंट’ टीमच्या साहाय्याने ताबा मिळविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तर सत्ता नाही म्हटल्यावर हा सण साजरे करणेच सोडून दिले. या सणांमागचे खरे हेतू इतके झाल्यावर तरी लक्षात आले पाहिजेत, मात्र आपण बधीरपणे यांच्याच मागे धावण्यात धन्यता मानतो. शिवसेनेसारखा पक्ष गणेश मंडळांचा उद्धारक म्हणून समोर येतो. गणपती मंडपात सुखाने जावा यासाठी लागणारा खड्डेमुक्त रस्ता देण्याची जबाबदारी या पक्षाची नसते. गणेशमंडपांच्या माध्यमातून हिंदुत्वाचे राजकारण करायला मात्र ही मंडळी मागे राहात नाहीत. राहिला प्रश्न हिंदूंच्या परंपरा व सणांचा तर सणांमध्ये शिरलेल्या विकृतीवर सश्रद्ध हिंदूंनीच टीका केली नाही तर या सगळ्यालाच अंधश्रद्धा मानणाऱ्या मंडळींनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0