कोणाच्या रुळावर कोणाचे इंजिन

    दिनांक  10-Sep-2018   

 

 

 
काँग्रेस आणि विरोधकांनी इंधन दरवाढीचे निमित्त पुढे करत केलेल्या ‘भारत बंद’ला जनतेनेही सपशेल नाकारल्याचे चित्र साधारण देशभर दिसून आले. राजकीय कार्यकर्त्यांचा हैदोस नको म्हणून दुकानदारांनी-व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली, चार-एक गाड्या जाळल्या म्हणजे भारत ‘बंद’ होत नाही! पण, हे अतिउत्साही, उपद्व्यापी कार्यकर्त्यांना समजवावे तरी कुणी... अशा या काँग्रेसघोषित ‘बंद’मध्ये मनसेनेही आपले गंजलेले ‘इंजिन’ घुसविले. तेवढीच काय ती त्या सुस्तावलेल्या ‘इंजिना’ची हालचाल म्हणा... ‘हाता’च्या धक्क्यावर ‘बंद’मध्ये हे ‘इंजिन’ही इकडेतिकडे मोदीद्वेषाचा धूर ओकताना दिसले. आंदोलनाची खुमखुमी आणि आपले ‘अस्त’ होणारे राजकीय ‘अस्तित्व’ टिकविण्याचा मनसेचा हा केविलवाणा प्रयत्नकोणे एकेकाळी ‘मोदींना सर्वप्रथम पंतप्रधानपदी पाहणारा मीच’ म्हणून छाती ठोकणारे राजसाहेब आज आपल्या प्रत्येक सभेत मोदींवर अगदी तुटून पडतात. कारण काय तर म्हणे, मोदींनी जनतेचा अपेक्षाभंग केला. महागाईला थारा दिला वगैरे वगैरे... पण, याच राजसाहेबांची 2014 सालची भाजपसोबतची जवळीक अजूनही मतदार विसरलेले नाहीत. त्यामुळे राजसाहेबांचा सत्तास्पर्शासाठी चाललेला आटापिटा, जळफळाट अगदी साहजिक. म्हणूनच त्यांचे कार्यकर्ते मोदींना गाढव काय ठरवतात, ‘अच्छे दिनां’ची प्रेतयात्रा काय काढतात आणि जाळपोळ-तोडफोड तर अगदी नेहमीचीच. पण, एकच प्रश्न विचारावासा वाटतो की, मोदीद्वेषापायी पछाडलेले हेच राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून निवडणुका लढविणार का? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट-निष्प्रभ कारभाराचे वाभाडे काढून ‘नवनिर्माणा’साठी निघालेल्या राजसाहेबांच्या पक्षाला पुन्हा पवार-चव्हाणांशी सलगी करणे झेपणारे आहे का? तर याचे उत्तर आहे निश्चितच ’नाही...’ पण, आता आंदोलनाच्या वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेण्यासाठी मनसेने काँग्रेसचा ‘बंद’ जणू आपल्याच राजकीय पक्षाने पुकारलेला ‘बंद’ असल्याप्रमाणे अगदी झोकून यात उडी घेतली. तेवढीच मोदींना शिव्या घालण्याची आणखी एक सार्वजनिक-नामी संधी. जनता आंधळी नाही. इंधन दरवाढ चिंताजनक आहेच, पण ‘बंद’ पुकारून, तोडफोड-जाळपोळ करून दमदाटीने हा भारत ‘बंद’ होणारा नाही. तेव्हा, राजसाहेबांनीही उगाच काँग्रेसी कुबड्यांचा ‘आदर्श’ घेत इंजिनाची ढकलगाडी करू नये, एवढेच...
 

नामधारी सत्ताधारी...

 

एकीकडे मनसेने काँग्रेसच्या ‘बंद’मध्ये सहभागी होऊन ‘चान्स पे डान्स’ मारला, तर दुसरीकडे ‘बंद’पासून दूर राहूनही सेनेने सवयीप्रमाणे भाजपवर निशाणा तर साधलाच, पण विरोधकांनीही चार खडे बोल सुनावले. म्हणजे, नेहमीप्रमाणे धड तळ्यात ना मळ्यात. सवयीप्रमाणे गोंधळलेली, संभ्रमित भूमिका आणि त्याला वाघाच्या डरकाळीचा काय तो शिवराळ मुलामा. सत्तेत असूनही विरोधकांची वृत्ती आणि विरोधकांनाही लाजवेल असा विरोध. महागाईने होरपळलेली जनता सत्ताधार्‍यांचे लंकादहन करेल, असा ‘सामना’च्या अग्रलेखातून काय तो इशारा सेनेने दिला पण, या ‘सत्ताधारी’ शब्दामध्येच सगळे काही दडले आहे. कारण, राज्यासह केंद्रात शिवसेना-भाजपसोबतच सत्तेचा उपभोग घेतेच आहे. तो मोह काही सुटलेला नाही. त्यामुळे सेनेच्या म्हणण्याप्रमाणे सत्ताधार्‍यांचे लंकादहन झालेच, तर त्यात वांद्य्राचाही महाल येईलच की... पण, नाही, कारण हे आहेत केवळ नामधारी सत्ताधारी...एवढेच नाही तर ‘सत्तेत राहूनही आम्ही आकांडतांडव केले’ आणि भाजपवर वेळोवेळी दबाव टाकल्याचा मोठेपणाही अग्रलेखात मिरवलेला दिसतो. पण, असे कितावेळा झाले? कधी झाले? सेनेच्या दबावाखातर कोणते निर्णय भाजप सरकारला बदलण्याची नामुष्की ओढवली? हे मात्र शोधूनही सापडायचे नाही. कारण, सेनेचे मंत्री म्हणून कधीही कुठल्या नेत्याची विधीमंडळात कामाची विशेष छाप पडलेली. गेल्या चार वर्षांत तरी दिसली नाही. उलट, याच सेनेच्या नेत्यांकडून शिवसैनिकांचीच कामे होत नाही, म्हणून वादविवाद झाले. मग सत्तेत असून स्वत:च्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या या नेत्यांकडून अजून कोणती अपेक्षा जनतेने करावी? एक गोष्ट मात्र अगदी मोठेपणाचा आव आणत सेनेने कबूल केलेली दिसली. ती म्हणजे, “विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत?” स्वत:च्या तोंडातून हे कबूल केले ते उत्तमच. पण, सत्तेत राहून विरोधी पक्षांचे ओझे उचलणारे हे कुठल्या प्रकारचे सत्ताधारी? सत्तेत आहात, तर सत्तेत राहून चर्चेने, संवादातून प्रश्न सोडविणेच अपेक्षित. त्यात आधीद गमावलेल्या विरोधकांची ताकद आजमावून सेनेला स्वत:ची ताकद कशी जास्त, हे पाहून स्वत:लाच गुदगुदल्या करून घ्यायच्या असतील, तर त्यापेक्षा विनोदी दुसरे काय म्हणावे!
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/