साधा कार्यकर्ता ते उद्योजकापर्यंतचा प्रवास

    दिनांक  09-Aug-2018   


 

लोकमान्य टिळकांनी देशासाठी शरीर उत्तम असावे म्हणून विद्यार्थीदशेत एक वर्ष शाळा सोडून व्यायाम करून शरीर कमावले होते. ही गोष्ट धीरजच्या बालमनावर कायम कोरली गेली होती. आपणसुद्धा देशासाठी काहीतरी केलेच पाहिजे, हे धीरजच्या मनात लहानपणापासून होतं
 

कोणतीही संघटना वाढते ती, त्या संघटनेतील समर्पित कार्यकर्त्यांमुळे. अशाच संघटनांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. जवळपास ९० वर्षांपूर्वी या संघटनेची स्थापना झाली. ध्येय एकच राष्ट्रवाद. या राष्ट्रवादाने प्रेरित होऊन अनेक तरुण संघात सामील झाले. देशसेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. समर्पण भावना जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळीच संघामध्ये तयार झाली. संघविचारसरणीने प्रभावित होऊन पुढे अनेक संघटना उदयास आल्या. त्यापैकीच एक विद्यार्थ्यांची संघटना म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविप. अभाविपमध्येसुद्धा अनेक विद्यार्थी समर्पित भावनेने देशासाठी कार्यरत आहेत. तो देखील असाच विद्यार्थीदशेत देशासाठी काहीतरी करायचं या भावनेने अभाविपमध्ये आला. पदवी मिळाल्यानंतर सहा वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्याने काम केले. त्यानंतर तो व्यवसायात उतरला. जी समर्पण भावना संघटनेसाठी दिली होती, त्याच भावनेने त्याने उद्योग सुरू केला. प्रचंड मेहनत घेतली. निव्वळ एका दशकात करोडोंची उलाढाल करणारी कंपनी उभारली. अभाविपचा हा समर्पित कार्यकर्ता म्हणजेच धीरज दिनकर बोरीकर. ‘एबी एंटरप्रायजेसया कंपनीचे सर्वेसर्वा. १९७० च्या आसपासचा काळ असेल. वाशिम जिल्ह्यातील लाडाचे कारंजे येथून एक सातवी पास शिकलेला तरुण रोजगाराच्या शोधासाठी मुंबईत आला. एका जवळच्या नातेवाईकानेच त्यांना मुंबईला बोलावले होते. नातेवाईकाने दिनकरांना एका मिलमध्ये कामाला लावले. त्या नातेवाईकाच्या घरातल्या एका कट्ट्यावर ते झोपायचे. दरम्यानच्या काळात दिनकरांचे लग्न झाले. लग्नानंतर नातेवाईकांनी सात हजार रुपयांचं एक घर मिळवून दिले. त्यांची बायको बी..पर्यंत शिकली होती. त्यांनी आपल्या बायकोला लग्नानंतरसुद्धा शिकवलं. एम.. केलं. त्यानंतर बी.एड्. करून त्या शिक्षिका झाल्या. शासकीय संस्थेत त्यांना शिक्षिकेची नोकरी मिळाली. कुठलाही पुरुषी अहंकार बाळगता सातवी पास असलेल्या दिनकररावांनी आपल्या बायकोला शिक्षिका बनविणे, ही खरंच खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे. अशा या दाम्पत्याला पुढे दोन मुले झाली. धीरज आणि अश्विनी.

 

काही वर्षांतच दिनकर काम करत असलेल्या गिरणीमध्ये संप घडला. गिरणीचं काम ठप्प झालं. सुदैवाने त्यांना लगेच एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. यावेळी धीरजने दहावीची परीक्षा दिली होती. मुलाचा शिक्षणाचा कल पाहण्यासाठी धीरजच्या आईने त्याची अप्टिट्यूड तपासणी करून घेतली. धीरजचा कॉमर्स शाखेकडे ओढा आहे, हे तपासणीत आढळले. मात्र, त्या काळानुसार घरातल्यांनी धीरजला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या डिप्लोमामध्ये प्रवेश घेऊन दिला. पुढे धीरजने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. १९९६ साली पदवी मिळविल्यानंतर त्याने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला. धीरजवर लोकमान्य टिळकांचा पगडा होता. लोकमान्य टिळकांनी देशासाठी शरीर उत्तम असावे म्हणून विद्यार्थीदशेत एक वर्ष शाळा सोडून व्यायाम करून शरीर कमावले होते. ही गोष्ट धीरजच्या बालमनावर कायम कोरली गेली होती. आपणसुद्धा देशासाठी काहीतरी केलेच पाहिजे, हे धीरजच्या मनात लहानपणापासून होतं. कॉलेजमध्ये असताना नव्वदच्या दशकात काश्मीरचा प्रश्न प्रचंड प्रमाणात चिघळला होता. या काश्मीर प्रश्नावर अभाविपने एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. हे चर्चासत्र ऐकल्यानंतर धीरजचा राष्ट्रवाद उफाळून आला आणि त्याने अभाविपमध्ये प्रवेश केला. अभाविपमध्ये असताना सहसंघटनमंत्री, मुंबई महानगरमंत्री, जनसंपर्कप्रमुख अशी विविध पदे भूषवली. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून देशसेवा करावी, असे धीरजच्या मनात आले. त्याने आपला मनोदय आई-बाबांजवळ व्यक्त केला. “तू जे करशील ते योग्यच असेल,” असा आशावाद व्यक्त करत स्वतंत्र विचारसरणीचे पुरस्कर्ते असणाऱ्या धीरजच्या आई-बाबांनी त्यास सहा वर्षे घरापासून दूर राहून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य करण्याची परवानगी दिली. धीरजने पूर्ण देश पादाक्रांत केला.

 

२००१ साली धीरज घरी परतला. एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून तो रुजू झाला. मात्र, माणसं जोडण्याचा छंद असणाऱ्या व्यक्तीला डेस्कवर एका ठिकाणी काम करणं जमत नाही. तसंच धीरजचं झालं. सहा महिन्यातच त्याने कंपनी सोडली. त्यानंतर त्याने काही आयटी कंपनीत विक्री विभागात काम केलं. सकाळी ते सॉफ्टवेअरचा कोर्स, त्यानंतर १० ते नोकरी परत संध्याकाळी ते हार्डवेअरचा कोर्स. अशाप्रकारे एक वर्ष धीरजने मेहनत घेतली. धीरजची आई धीरजला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असे तीन वेगवेगळे डबे द्यायची. धीरजच्या मनात मात्र स्वत:चं काहीतरी असावं, ही भावना होती. धीरजचे एक स्नेही मर्चंट नेव्हीमध्ये होते. त्यांनादेखील स्वत:चं वेगळं असं काहीतरी सुरू करायचं होतं. या दोघांच्या महत्त्वाकांक्षेतून उभी राहिलीएबी एंटरप्रायजेसअर्थातआगरकर-बोरीकर एंटरप्रायजेस.’ त्यातून त्यांना पहिले ग्राहक मिळाले, ते म्हणजे एक प्रसिद्ध व्यवस्थापन महाविद्यालय. त्यांनी पाच संगणकांची ऑर्डर दिली. जवळपास दीड लाख रुपयांची ऑर्डर होती ती. याच काळात धीरजचं लग्न झालं. त्याची सुविद्य पत्नी प्रा. रुपाली बोरीकर सध्या किर्ती महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवतात. त्या अभाविप ईशान्य मुंबईच्या अध्यक्षा आहेत. धीरजने आपल्या मुलाला, ध्रुवला मुद्दाम मराठी माध्यमात दाखल केले. आपल्याला शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर समजायचे असतील तर त्यासाठी मराठी माध्यमच उत्तम. तसं पण मातृभाषेतून शिक्षण घेऊन सर्वोत्तम बनता येतंच, हे शिक्षणतज्ज्ञांचं मत आहे आणि काही व्यक्तींनी ते सिद्ध सुद्धा केलं आहे, असं धीरजचं मत आहे. खरंच या अशा धाडसी निर्णयामुळेच बोरीकर कुटुंब हे प्रवाहातले एक वाटता वेगळे भासतात.

 

धीरज यांनी एक वर्ष संगणकाची दुरुस्ती करणे, संगणकाची देखभाल, लॅमिंग्टन रोडवरून खांद्यावर टाकून संगणक घेऊन येणं यांसारखी कामे केली. आपण जर यातच गुरफटून राहिलो, तर कंपनी वाढणार नाही. धीरजने या सगळ्यांसाठी एक टीम तयार केली आणि स्वत: विक्रीवर लक्ष केंद्रीत केलं. अभाविपमधल्या त्यांच्या एका मित्राने बोरीकरांना सांगितलं होतं की, “तू संघ परिवारातले कोणतेही संपर्क वापरता नवीन ग्राहक मिळव.” मित्राचा सल्ला आव्हान म्हणून धीरजने स्वीकारला. नवीन लोकांना तो भेटू लागला. याचवेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणी असलेली एक मोठी आयटी क्षेत्रातील कंपनी बंद पडली. तिथे धीरजचे काही मित्र होते. त्यांनी धीरजला त्या कंपनीचे ग्राहक मिळवून दिले. मोठमोठी महाविद्यालये, शिपिंग कंपन्या यांचा त्यात समावेश होता. यानंतर सुरू झालेला बोरीकरांचा प्रवास आजतागायत सुरूच आहे. कालांतराने बोरीकरांवरच कंपनीचा सगळा भार आला. काही वर्षांतचध्रुव इन्फोटेकनावाने बोरीकरांनी अजून एक कंपनी सुरू केली. आज हा उद्योगसमूह काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. संगणक वापरणाऱ्या कंपन्या, संस्था त्यांच्या देखभालीसाठी आयटी कंपन्यांसोबत वर्षभराचा करार करतात. त्या क्षेत्रातील सर्वोत्तम दहा कंपन्यांमध्येएबी एंटरप्रायजेस’ आणण्याचं बोरीकरांचं ध्येय आहे. यशवंत केळकर यांचंमाणूस नावाचं कामया पुस्तकाने ते प्रभावित झाले. या प्रभावातूनच ते एका संस्थेची स्थापना करणार असून त्याद्वारे समाजात शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात कार्य उभारण्याचा त्यांचा मानस आहे. गेल्या १४ वर्षांत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत केलेली आहे. त्यापैकी काहीजणांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तकच घेतलेलं आहे. त्यांच्या भगिनी अश्विनी कराडे याउमंग चाईल्ड ट्रस्टनावाची संस्था चालवितात. मानसिकदृष्ट्या विशेष गटातील मुलांसाठी ही संस्था कार्य करते. संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात. मग ते घरातील असो वा समाजातील. धीरज बोरीकरांना अशा उत्तम संस्कारांची शिदोरी लाभली. त्यामुळेच एक उत्तम संघटक, एक उत्तम उद्योजक आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून आज ते सर्वपरिचित आहेत. उद्योगक्षेत्रात तर त्यांना प्रेमानेधीरूभाईम्हटले जाते. धीरज बोरीकरांसारखी व्यक्ती जर कोणत्याही संस्था वा संघटनेत आली तर ती संघटना एका वेगळ्या उंचीवर जाते आणि संघटना ही चांगल्या माणसांनी घडते, या उक्तीला बळकटी मिळते.