असाही एक संसार...

    दिनांक  08-Aug-2018   


 

संसार हा केवळ आपल्यापुरता न ठेवता, आम्ही दोघांनी या कामालाच संसार केला आणि आमचं मूल म्हणजेच अभिनव विकास फाऊंडेशन आम्ही एकत्रित वाढवण्याचा निर्णय घेतला.

 

“शिक्षण जर माणसाला माणसापासून दूर करणारं असेल, तर ते शिक्षणच नव्हे. तर, व्यक्तीमध्ये मूलभूत जाणीव निर्माण करून व्यक्तित्वाचा विकास करणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे”. हे विचार कोणत्या संतांचे किंवा थोर व्यक्तींचे नसून, पुण्यातील एका दाम्पत्याचे आहेत. ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुसंस्कृतांच्या पुण्यात आजही कितीतरी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. यात मुलांना आपल्यासारखं सुसंस्कृत आणि शिक्षित करण्यासाठी पुण्यातील ‘बोरकर’ दाम्पत्य झगडत आहे. गौरी आणि विकास बोरकर आपला संसार हा अशाच काही अशिक्षित मुलांना शिक्षण देण्याच्या कामात सत्कारणी लावत आहेत. पुण्यातील कोथरुड वस्तीमधील कचरा वेचणाऱ्या मुलांसाठी त्यांनी ‘अभिनव विकास फाऊंडेशन’च्यावतीने शाळा सुरू केल्या. आपली कर्मभूमी पुणे, असं मानणाऱ्या या दाम्पत्याने नोकरी-धंदा सर्व सोडून स्वत:ला या कामात वाहून घेतलं. गौरी यांनी सोशल वर्क या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्यांना त्यांचे ध्येय उमगले. त्यांनी स्वत:च्या शिक्षणाचा वापर करून सर्वांना शिक्षण मिळावं या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली. आपल्या शिक्षणाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी न करता त्यांनी समाजकार्यचं करायचं ठरवलं आणि त्या दिशेने त्यांनी आपली पावलं उचलली.

 

“मुलांना फक्त शिक्षणाची गरज नसते. त्यांना प्रेमाची, आपुलकीचीही तेवढीच गरज असते,” असं गौरी मानतात. या त्यांच्या विचारावर काम करण्यासाठी त्यांनी पुण्यातील काही भागात सर्व्हे केला. हा सर्व्हे केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, पुण्यातील बऱ्याच भागांमध्ये कचरा वेचणारी मुलं आहेत, जी दिवसभर फक्त कचरा वेचण्याचं काम करतात आणि रात्री इतर व्यसनांच्या आहारी जातात. गौरी यांचा एक मानस होता, मुलांना शिक्षण मिळावं यासाठी संस्था स्थापन करायची, पण ज्या वस्तीत मुलांना खरंच गरज आहे, त्या वस्तीमध्येच. या सर्व्हेमधूनच त्यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाची सुरुवात, कोथरुडमधील केळेवाडी या वस्तीपासून केली. सुरुवातीला वस्तीतील मुलांमध्ये शिक्षणाची आवड कशी निर्माण करावी? आणि त्यांच्या पालकांचं मन परिवर्तन कसं करावं? हे मोठे आव्हान बोरकर दाम्पत्यासमोर होते. आधी त्यांनी शनिवार, रविवार मुलांना फक्त कार्यानुभव, गोष्टी, गाणी शिकवण्यास सुरुवात केली. जेणेकरून मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी. या कामात गौरी यांनी स्वत:ला झोकून दिलं असताना त्यांना त्यांच्या पतींचीही मदत लाभली. “संसार हा केवळ आपल्यापुरता न ठेवता, आम्ही दोघांनी या कामालाच संसार केला आणि आमचं मूल म्हणजेच ‘अभिनव विकास फाऊंडेशन’ आम्ही एकत्रित वाढवण्याचा निर्णय घेतला,” असं गौरी आनंदाने सांगतात. केवळ काही मुलांना जबरदस्ती बोलवून सुरू केलेल्या या प्रकल्पात आज दररोज शंभरहून अधिक मुलं येतात, तीही आनंदात. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांना मूल्यशिक्षणही मिळावं, यांसाठी गौरी यांचे प्रयत्न असतात. मुलांनी बाहेरच्या जगात वावरत असताना काही मूल्यं जपावी, यासाठी त्यांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच, मुलांना मूल्यही शिकवली. लिहिता-वाचता न येणाऱ्या मुलांना शिकवायचं कसं? हा प्रश्न असताना, विकास यांनी हे शिवधनुष्य स्वत: पेलण्याची तयारी दाखवली. आपली नोकरी सोडून त्यांनी या मुलांना शिकवण्यास सुरुवात केली.

 

वस्तीतील मुलांना शिकवत असताना त्यांना एक गोष्ट कटाक्षाने जाणवली, ती म्हणजे मुलांचे आरोग्य. मुलांचे सततचे आजार लक्षात घेता, बोरकर दाम्पत्याने या मुलांसाठी आरोग्य शिबीरही भरवले. शिक्षणाबरोबरच मुलांना स्वबळावर काहीतरी करता यावे, यासाठी शिबिराचे आयोजन केले. मुलांच्या घरची बिकट परिस्थिती बघता, बोरकर दाम्पत्याने मुलांच्या पालकांनाही रोजगार मिळवून दिला. कापडी पिशव्या, कपडे शिवणे, राख्या तयार करणे यांसारखे लघु उद्योग त्यांना सुरू करून दिले. “आम्ही फक्त अपेक्षेपेक्षा केवळ दहा टक्के काम केलं आहे, अजून खूप काम करायचं आहे,” असं बोरकर दाम्पत्य म्हणते. “मुलांना शिक्षण, त्यांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांच्या आहाराची सोय करणं, म्हणजे तारेवरची कसरत असते,” असं गौरी सांगतात. मुलांचा हाच खर्च भागवण्यासाठी त्यांनी वस्तीत एक अनोखा उपक्रम सुरू केला. वस्तीतल्या तसेच आजूबाजूच्या घरातील रद्दी जमवण्यास त्यांनी सुरुवात केली, जेणेकरुन मुलांचा खर्च भागवता येईल. “काम करत असताना आम्हाला ती मुलं आमचीच वाटतात. आमची मुलं दहावी पास झाल्यानंतर जेव्हा पेढे आणतात, तेव्हा वाटतं आपण केलेल्या कामाचं चीज होत आहे,” असं शेवटी हसतहसत गौरी म्हणाल्या. नाहीतरी, कोण बघतं या मुलांकडे? ती आपल्यातली आहेत आणि ती काहीतरी करू शकतात. एवढ्या विश्वासाची फक्त गरज असते. त्यांना संधी मिळाली, तर तीही सुशिक्षित आणि सुसंस्कृत होतील.