चांद्रचरणाचा अमृत महोत्सव

    दिनांक  08-Aug-2018   मानवाने २० जुलै १९६९ रोजी पहिले पाऊल चंद्रावर टाकले. त्याला या २०१९ मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अवघे विश्व चांद्रचरणाचा अमृतमहोत्सव साजरा करणार, हे निश्चित. अपोलो यान आणि चंद्रावर मानवाचे पाऊल पडण्यापूर्वी नेमक्या काय घटना घडल्या, याचा मागोवा या लेखात घेण्यात आला आहे.

 

‘दैव बलंत देव चंद्र बलंत देव,’ अशा संस्कृतप्रचुर श्लोकात चंद्राची महती सांगण्यात आली आहे. मानवाला सर्वात प्रिय आणि ज्याबद्दल सर्वात जास्त आकर्षण आहे, असा हा पृथ्वीचा उपग्रह म्हणजे चंद्र. मानवाने २० जुलै १९६९ रोजी पहिले पाऊल चंद्रावर टाकले. त्याला या २०१९ मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अवघे विश्व चांद्रचरणाचा अमृतमहोत्सव साजरा करणार, हे निश्चित. अपोलो यान आणि चंद्रावर मानवाचे पाऊल पडण्यापूर्वी नेमक्या काय घटना घडल्या, याचा मागोवा या लेखात घेण्यात आला आहे. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याच्या या खास घटनेची नोंद वैचारिक क्रांतीची सुरुवात म्हणून केली गेली. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे विज्ञानयुगाचा विकास होण्यास खऱ्या अर्थाने चालना मिळाली. मात्र, त्यानंतर हिरोशिमा-नागासाकीच्या घटनेमुळे विज्ञान शाप की वरदान, असा प्रश्न समस्त मानवजातीसमोर उभा ठाकला. यानंतर मात्र भारताने मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन ‘शांततेसाठी अणुऊर्जा’ हे धोरण स्वीकारले व जगाला शांततेच्या धोरणाचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात झाली. या शांततेमुळे वैचारिक विकासाला चालना मिळाली व मानवाला चंद्रावर जाण्याचा विचार सुचू लागला आणि तसे करणे शक्य झाले.

 

तसे पाहता खऱ्या अर्थाने शीतयुद्धाच्या दशकात (१९५०-६०) अवकाश स्पर्धेचा (स्पेस रेस) जन्म झाला. जागतिक महासत्तांच्या द्वीध्रुवीकरणामुळे जगाचे लक्ष खऱ्या अर्थाने अवकाशाकडे वळण्यास सुरुवात झाली. यातच रशियाने ‘स्पूटनिक’ उपग्रहाचे यशस्वीरित्या सीमोल्लंघन केले आणि तेथूनच विज्ञान-तंत्रज्ञानाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. या यशामुळे अवकाश तंत्रज्ञान विकासाला राजकीय पाठबळ मिळण्यास सुरुवात झाली आणि यातूनच चांद्रस्पर्धेचा जन्म झाला. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांत अंतराळप्रवास शास्त्र आणि अवकाशिकी विषय क्षेत्रातील संशोधनास चालना मिळण्यास सुरुवात झाली होती. याच कालखंडात १९६१ मध्ये युरी गागरिन याने समानव अंतराळ भ्रमण पूर्ण केले. १०८ मिनिटांच्या कालावधीत युरीने पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी, तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी रशियावर वरचढ होण्याच्या भूमिकेतून, “आपण थेट चंद्रावर माणूस पाठवून, त्याला परत आणू शकतो का?,” अशी विचारणा ‘नासा’ला केली. यासाठी ‘नासा’ने ‘सर्व्हेअर’, ‘रेंजर’, ‘जेमिनी’ असे खास अवकाश कार्यक्रम आखण्यास सुरुवात केली.

 

आता रशियाही सरसावला होता व त्यांनीही कसून तयारी सुरू केली. मात्र, त्याला राष्ट्रकार्य या भावनेची आणि संवेदनेची जोड नव्हती, जी अमेरिकेच्या अंतराळ धोरणात स्पष्टपणे दिसून येत होती. रशियाने ‘ल्युना’, ‘व्होस्टोक’ असे कार्यक्रम हाती घेतले. अशा महत्त्वाच्या मोहिमांमध्ये विविध वैज्ञानिक शाखा आणि अभियांत्रिकीची विषयक्षेत्रे यांचा आपापसात समन्वय असणे आवश्यक असते. इथेच अमेरिका रशियाच्या पुढे गेला आणि अमेरिकेने चांद्रमोहिमेसाठी ‘अपोलो’ कार्यक्रम आखला. मात्र, अपघातांमुळे व अंतराळवीरांचा त्यात मृत्यू झाल्याने अपोलो-२, ३ या मोहिमा झाल्या नाहीत. त्यानंतर ‘अपोलो- १० पर्यंतच्या मोहिमा आखल्या गेल्या. ‘अपोलो-१०’ नंतर दोन महिन्यांनी ‘अपोलो-११’ मोहीम पार पडली आणि याच मोहिमेत मानवी पाऊल पहिल्यांदा नील आर्मस्ट्राँग, बझ ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांच्या रूपाने चंद्रावर पडले. या दरम्यान खरी स्पर्धा जगाने पाहिली, ती पुन्हा रशिया आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अवकाशयान आणि चंद्रावर पहिला कोण पोहोचणार याची. कारण, याच काळात रशियाने ‘ल्युना-१५’ मोहिमेंतर्गत विविध प्राण्यांसह आपले अवकाशयान चंद्रावर धाडले. त्यांची ही मोहीम अत्यंत गुप्तपणे चालली होती. मात्र, दरम्यानच्या काळात अमेरिकेने समानवयान अंतराळात पाठवून एकाच मार्गावर दोन यानांची स्पर्धा जगाला अनुभवण्याची संधी आणि आपली महत्त्वाकांक्षा यांची ओळख करून दिली. २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर पोहोचले. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलले. चंद्रावर अमेरिकेचा ध्वजही फडकला. केवळ कुरघोडी आणि श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आखलेली ही मोहीम खऱ्या अर्थाने कोटीच्या कोटी उड्डाणे ठरली होती. मानवी बुद्धिमत्तेचा व कौशल्याचा विजय हा समस्त मानवजातीचा विजय ठरला होता.