तुरूंगातील बंदीवानांच्या नजरेतून ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र’

07 Aug 2018 23:13:40


 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि रामचंद्र प्रतिष्ठानच्यावतीने कारागृहातील बंदिवानांसाठी एक स्तुत्य उपक्रम तो म्हणजे बंदिवानांसाठी स्वा. वि. दा. सावरकरांच्या जीवनविषयावर निबंधस्पर्धा.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान कारागृहात असताना आपल्या सहबंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवून त्यांच्यातून अनेक देशभक्त तयार केले. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर अनेक बंदिवानांनी सावरकरांचे विचार, त्यांचे कार्य देशामध्ये अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे कार्य करताना दिसत आहेत. असेच कार्य आपणही करावे, असा विचार मनात रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या मनात आला. कारागृहांमधील पुरूष आणि महिला बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती वाढीस लागावी यासाठी त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा घ्यावी असे ठरविले. परंतु अगोदर कुठेही जास्त वाच्यता करता सलग सहा महिने शासकीय स्तरावर गृहविभागाचे सचिव, अतिरिक्त सचिव, कक्ष अधिकारी, कारागृहाचे महासंचालक, विशेष महानिरीक्षक यांच्याकडे त्यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांना या निबंधस्पर्धेची निकड आणि राष्ट्रीय कार्यातील उपलब्धता समजावून सांगितली. कारागृहाची सुधारणा, बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती आणि पुनर्वसन यांची निकड समजावण्यासाठी अनेक प्रयोग केले. एक दिवस असा उजाडला की, अशोक शिंदे यांना प्रयत्नात यश मिळाले. महाराष्ट्र कारागृहाच्या पुणे मुख्यालयाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. विठ्ठल जाधव यांचा दूरध्वनी आला आणि त्यांनी काही अटींच्या अधीन राहून हा उपक्रम राबविण्याची संमती दिली आणि शुभेच्छा दिल्या.  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका ही आनंदाची बातमी समजल्यावर सर्वांना अतिशय आनंद झाला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकआणिरामचंद्र प्रतिष्ठानयांच्या स्वयंसेवी संस्थेने हा उपक्रम महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये राबवावा यावर शिक्कामोर्तब झाले आणि कार्याला सुरुवात झाली. या कार्याला स्वामिनी सावरकर आणि स्नेहलता साठे यांचे आशीर्वाद लाभले. त्यांनी मनापासून या उपक्रमाचे स्वागत केले आणि मार्गदर्शनही केले. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या उपक्रमाला पाठिंबा देऊन योग्य त्या सूचना केल्या. तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर यांना समन्वय साधण्यास सांगितले. त्यानुसार स्वामिनी सावरकर, स्नेहलता साठे यांच्या मार्गदर्शनानुसार बैठका होत होत्या. त्यातून विषयांची निवड, ग्रंथनिवड, सूचना-नियम या सर्व गोष्टी साकारत गेल्या आणि मंदाकिनी भट, राजेंद्र वराडकर, अशोक शिंदे, मुकुंद गोडबोले यांनी परिश्रमपूर्वक प्रत्येक कारागृहांना भेटी देऊन तेथील कारागृह प्रमुखांशी चर्चा केली. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या बाबतीत साकारला गेला.

 

महाराष्ट्रातील येरवडा मध्यवर्ती, मुंबई मध्यवर्ती, ठाणे मध्यवर्ती, नाशिक रोड मध्यवर्ती, सातारा जिल्हा, भायखळा आणि रत्नागिरी विशेष अशा कारागृहात ही निबंध स्पर्धा घेतली गेली. ही स्पर्धा घेतली तरी कशी गेली? कारागृहांमधील पुरूष आणि महिला बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती वाढीस लागावी यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली. काही महिन्यांच्या अवधीनंतर कारागृहाला सोयीचा ठरेल, अशा दिवशी ग्रंथांच्या आधारे निबंधाचे विषय देऊन त्यावर बंदिवानांना लिहायला सांगितले. ही स्पर्धा दि. १२ एप्रिल २०१८ या दिवशी ठाणे मध्यवर्ती कारागृहापासून सुरू झाली आणि दि. मे २०१८ या दिवशी येरवडा मध्यवर्ती कारागृहात समाप्त झाली. सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खूप दिवसांनी बंदिवानांच्या हाताला एक वेगळंच काम मिळाले होते. त्यांचे हात लिहिते झाले. या स्पर्धेत केवळ मराठी भाषिकच सहभागी झाले नव्हते, तर मुस्लीम, ख्रिश्चन महिला पुुरूषही सहभागी झाले होते. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमध्ये स्पर्धकांनी निबंध लिहिले. प्रत्येक कारागृहात स्पर्धेच्यावेळी अशोक शिंदे यांच्यासोबत स्मारकाशी संबंधित असलेली व्यक्ती जात होती. स्पर्धेपूर्वी बंदिवानांशी सावरकरांच्या साहित्यावर स्पर्धेविषयी मनमोकळ्या गप्पा केल्यामुळे ही सर्व मंडळी आपलीच आहेत, अशी भावना बंदिवानांच्या मनात दृढ होऊन त्यांच्यावरील दडपण दूर झाले आणि सावरकरांविषयी लिहायला हात तयार झाले.

 

जवळ जवळ सर्व निबंध स्पर्धा १० मेपर्यंत संपल्या. प्रथमच सुरू केलेल्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. कारागृहाचे अधीक्षक, कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य मिळाले. नंतर सुरू झाले परीक्षकांचे काम! तसं म्हटलं तर निबंध वाचताना परीक्षकांचीच परीक्षा होती. निबंधवाचन करून क्रमांक देण्यात आले. या सर्व निबंधस्पर्धेत खूप छान गमती झाल्या. अभिमान वाटावे, असे प्रसंग घडले. आपण काही चांगलं काम केलं याचा आनंद अधीक्षकांना बंदिवानांना आणि आम्हाला मिळाला. काही कारागृहातले अनुभव इथे सांगायलाच पाहिजेत. निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी लेखन साहित्य देण्यात आले होते. स्पर्धा संपल्यावर त्यांनी ते परत द्यायचं होेतं. एका कारागृहात आम्ही स्पर्धा घ्यायला गेलो, त्यावेळी एका बंदिवानानी साहित्य ठेवून घेतले आणि सांगितले,”यापुढे कुठेही काही लेखन केले, तर मी हे साहित्य वापरेन. त्याचा मला अभिमान वाटेल, मात्र ते लेखन साहित्य त्याच्याजवळ ठेवता कारागृहाच्या अधीक्षकांजवळ देऊन ठेवलं. त्यांच्याजवळून तुला हवे असेल तेव्हा मागून घे असे प्रेमाने सांगितले. त्यावेळी त्याला खूप बरे वाटले. बंदिवानांना लिखाण करायला प्रत्येकाला पेन देण्यात आले होते. निबंध लिहून झाल्यावर स्पर्धकांनी ते पेन आपल्याजवळच ठेवायचे होते. सर्वांना ते ऐकून आश्चर्य वाटले. त्यातल्या एका बंदिवानांनी विचारले, “खरचं हे पेन आम्ही घेऊन जायचं?”   आमचा प्रतिनिधी म्हणाला,  “हो, हे पेन आता तुमचे झाले.”  पेनावरस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकअसे कोरले होते. त्यामुळे त्या बंदिवानांनी एखादेपदककिंवाबिल्लाआपल्या शर्टाला लावून मिरवावे, तसे ते पेन आपल्या शर्टाच्या बटणाला लावले आणि त्याचे अनुकरण इतरही काही बंदिवानांनी केले. खरोखरच किती कमी काळात हा बदल त्यांच्यात झाला होता!  आणखीन एक प्रसंग तो मजेशीरच होता. बंदिवान लिहीत होते. अगदी त्यांचे लिहिते हातमोकाटसुटले होते. आपणाला केवळ सावरकरांवर लिहायचे एवढेच त्यातील एकाच्या डोक्यात होते. त्यामुळे दिलेली उत्तरपत्रिका पूरत नव्हती. मगपुरवणी’ (सप्लीमेंट) मागितली. तीही पुरली नाही. मग दुसरी पुरवणी मागितली. त्याचा हा प्रकार बघून दुसर्या बंदिवानालाही स्फुरण चढले. त्यांनेही पुरवणी मागितली. आम्हाला तो प्रकार पाहून आनंद झाला. नंतर त्याला अधीक्षकांनी विचारले,  “तू काय लिहिलस तरी काय एवढे?”  त्यावर तो काय म्हणाला माहीत आहे? तो म्हणाला, “खूप दिवसांनी लिहायला मिळाले. खूप आनंद झाला. जे आठवलं. ते लिहीत गेलो.” विषय, पृष्ठमर्यादा, अक्षर, व्याकरण याचा विचार करता लिहिणार्या या बंदिवानाला खरोखरच पारितोषिक हवे होते का? खूप दिवसांनी हातात पेन मिळाले आणि त्याचे मन मोकळे झाले होते!

 

काही बंदिवानांनी आमचे प्रतिनिधी परत जात असताना त्यांना वाकून नमस्कार केला. कारण काय तर आम्ही कोणताही भेदभाव त्यांच्यात केला नाही. त्यांना तुम्ही कोणता गुन्हा केला? तुम्हाला किती दिवसांची शिक्षा झाली? तुमच्या घरी कोण कोण असते? फक्त एवढंच सांगितले, ‘माणूस आहे तिथे चूक होणारचं. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. सुधारण्याचा प्रयत्न करा. मन शांत ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. विचार करायला शिका आणि मुंबईत याल तेव्हा स्मारकात जरूर या. फक्त कुठून आलात ते सांगा. आमच्याशी मोकळेपणाने बोला.” असे बोलल्यामुळे त्यांनाही खूप बरे वाटले. अधीक्षकांना आम्ही सर्वजण म्हणालो,”त्यांना लिहिण्यावाचून अडवू नका. लिहू द्या. बघून का होईना पण लिहितात हेच खूप!”  आमचा पहिलाच प्रयत्न होता. आम्हाला हेच हवे होते? अनुभवांचे गाठोडे मोठे व्हायला लागले तसा आमचा उत्साह वाढू लागला.  उत्तरपत्रिका लिहून झाल्यावर काही बंदिवान प्रश्न विचारीत होते. “आम्ही निबंधस्पर्धेचा निकाल लागण्यापूर्वी सुटलो, तर आम्हाला निकाल कसा कळणार?”  “आम्ही यशस्वी ठरलो नाही तरी आम्हाला प्रमाणपत्र देणार का?” “मुंबईला आलो, तर तुम्हाला कुठे भेटायचे?”  “इथून सुटल्यावर काय करता येईल?”  असे एक ना अनेक प्रप्रश्न. तिथे जाणारा आपला प्रतिनिधी त्यांच्या या प्रश्नांना उत्तरे देऊन सर्व बंदिवानांना आश्वासक करून कारागृहातून बाहेर पडत होता. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत होते. स्मारकात आल्यावर प्रत्येकाच्या चेहर्यावर एखादा मोठा पराक्रम गाजवून आल्याचा आनंद दिसायचा. या स्पर्धेचे फलित काय? कारागृहातील प्रत्येक बंदिवानाच्या मनात हीच भावना असेल-  सावरकर निबंध स्पर्धेमुळे आम्हाला कारागृहात सावरकर नावाचा देव भेटला. आम्ही वाचायला लागलो. आम्ही सामुदायिक वाचनही करायला लागलो. आम्ही विचार करायला लागलो. आम्ही एकमेकांशी चर्चा करायला लागलो. आम्ही आमच्या मनाशी बोलायला लागलो. आम्ही लिहायला लागलो.  ज्या हातांनी वाईट कृत्ये घडली, त्याच हातांनी आम्हाला लिहिते केले. कागदावर झरझर अक्षर उमटली आणि...

आम्ही पार बदलून गेलो!

आम्ही पार बदलून गेलो!

हा सावरकर वाङमयाचा स्पर्धायज्ञ इथेच संपणार नाही. यात बदल होत जाणार, वाढ होत जाणार, स्पर्धक वाढणार, ग्रंथ वाढणार, कारागृह वाढणार आणि सावरकर वाङ्मयाबरोबर त्यात क्रांतिकारकांच्या माहितीचा समावेश होणार.  यापुढील वर्षात मागील वर्षांची सर्व कारागृहे असणारच आहेत शिवाय या वर्षात तिहार, विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात यांचाही समावेश असेल. व्याप वाढणार आहे पण तुमच्या सर्वांची साथ आणि आशीवार्द असल्यावर तसेच कारागृहांचे सहकार्य मिळाल्यावर हे स्पर्धेचेशिवधनुष्यपेलायला बळ मिळणारच याची खात्री आहे.

-मंदाकिनी भट

Powered By Sangraha 9.0