संधीचे सोने अन् सोन्याचा साधू!

05 Aug 2018 08:59:33


 
 
 
 
ओ मेरा सोनारे सोनारे सोना...
ले लूंगा जान किसी ने जो छीना रे
मैने इसे बडे प्यार से कमाया
मेरा कसूर नही जो मैने लोगोंसे लुटा रेऽऽऽ
 
हो, हो, हो... गाणं तेच आहे. मात्र, जरा संदर्भ बदलले आहेत. ‘मेरे घर सोने की गद्दी है’ म्हटल्यावर मग ऐकणार्याला वाटतं की काय श्रीमंत माणूस आहे! कुणा कुणाचे आयुष्य सोन्याहून पिवळेच असते ना. आता परवा एक बातमी वाचली. एक बाबा आहे. तो पंचवीस किलो सोने अंगावर घालून फिरतो अन् मग त्याच्या रक्षणासाठी पंचेवीस पोलिस आहेत. इकडे महिला असुरक्षित आहेत, अनेक गुन्ह्यांचे केवळ तपासच सुरू असतात. त्याचा निकाल लागत नाही अन् इकडे त्या बाबाच्या रक्षणासाठी पंचेवीस पोलिस आहेत. त्या बाबाचे नाव निरंजन आहे अन् जळतो मात्र बघणारा... पंचेवीस किलो सोने!!! म्हणजे कितो तोळे याचा हिशेब लावा. काय आहे की आपली आर्थिक स्थिती तोळामासाच असल्याने सोने आपण तोळ्याच्या वर कधी अपेक्षितच ठेऊ शकत नाही. एक किलो सोने म्हणजे 100 तोळे इतके माहीत आहे. शाळेत शिकविले होते...
 
 
आम्ही लहान असताना शिक्षण म्हणजे विद्या हेच सोने असते, असे सांगितले जात होते. या साधूला कुणी सांगितले असेल की संपत्ती जगविणे म्हणजे सोनेच असते. त्याने ती विद्या अवगत केली असेल. आता या पंचेवीस किलो सोन्याचे गणित जमवून पाहू... एक तोळा सोने आता 32 हजार रुपयांचे आहे. 100 तोळे झाले बत्तीस लाख रुपयांचे. पंचेवीस किलो सोने झाले आठ कोटी रुपयांचे... हा साधू सध्या आठ कोटी रुपयांचे सोने अंगावर घालून फिरतो आहे. संधीचे सोने करावे, अशी आपली शिकवण आहे. या साधूने बराच संधीसाधूपणा केला असावा. हा साधू साधा नाही, तो संधीसाधूच आहे. एकतर त्याच्याकडे सोने आहे इतके अन् त्यात तो साधूदेखील आहे. म्हणजे सोने पे सुहागाच. कारण साधू- सन्यासी असल्याने त्याला इन्कमटॅक्स लागत नसावा. हा अंदाज काढण्याचे कारण त्याला हे सोने कुणीतरी; कुणीतरी म्हणण्यापेक्षा कुणी कुणी दानांत दिले असावे. आता दानावर आयकर लागत नाही. आता कर नाही तर डरही नाही! भारत हा गरीब देश आहे, असे कोण म्हणेल? कारण या देशात सर्वसंगपरित्याग करून भगवी वस्त्रे घालून निघालेल्या साधूकडे पंचवीस किलो सोने आहे. या साधूने ते घालून मिरविण्याची संधी साधून घेतली. आता ज्या देशांत साधूकडे इतके सोने असते तो देश गरीब कसा?
यहां डाल डाल पर सोने की
चिडीया करतीं है बसेरा...
असे गाणे आहे. या देशात म्हणजे कधीकाळी सोन्याचा धूर निघत होता. दुधाचा महापूर होता. आता त्याच देशांत दूध उत्पादकांना दुधाचे भाव वाढवून घेण्यासाठी मोर्चा काढावा लागतो. असो. एखाद्या साधूकडे 25 किलो सोने केवळ घालून मिरविण्यासाठीच असेल तर या देशात चाळीस कोट लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात यावर कुणी कसा विश्वास ठेवेल? या लोकसंख्येला अन्नसुरक्षा देण्यासाठी सरकारला योजना राबवावी लागते, हे खरेच वाटायचे नाही. त्या दक्षिणेतल्या एका पुरातन मंदिरांत अरबो रुपयांचे दागिने अन् सोने सापडले होते. इतके होते की नंतर ते मोजणेही बंद करण्यात आले होते. आता पंढरपूरच्या विठोबालाही वीस कोट रुपये कुणीतरी वाहिले. जो तुळशीच्या पानावरही संतुष्ट होतो असा गरिबांचा, तेल्या-तांबोळ्यांचा देव अन् त्यालाही या देशातले त्याचे गरीब भक्त इतके कोटी रुपये वाहत असतील तर मग या देशातल्या गरिबांच्या गरिबीची पातळी काय, हादेखील सवाल आहेच ना! आता मग साधूकडे इतके सोने कसे अन् हा सोनेबाबा आला कुठून... असे प्रश्न मात्र विचारायचे नसतात, कारण नदीचे मूळ अन् साधूंचे कुळ कुणी विचारायचे नसते, शोधायचे नसते. तसे करणारा पाप करत असतो. त्यामुळे आपल्या देशांतल्या तपासयंत्रणा असल्या पापांत पडू पाहात नसाव्यात. तरीही काही खुटीउपाड लोकांनी या साधूचे मूळ शोधूनच काढले.
 
 
 
कुणी असे सांगतात की या निरंजनबाबाचे मूळ दिल्लीचे आहे. तो तिथला डॉन होता. म्हणजे गुंड होता, असे नाही म्हणायचे. कारण तो आधी काहीही असला तरीही आता मात्र तो साधू आहे. साधू म्हणजे संत. म्हणजे आता त्याला मोह नाही. त्याला साधी वस्त्रे काय नि सोने काय, सारखेच आहे. आता आपण असे म्हणायचे की तो आधी वाल्या होता, आता त्याचा वाल्मीकि ऋषी झाला आहे. त्याने दिल्लीत वाटमार्या केल्या असतील. लोकांना अडवून लुटले असेल अन् त्यांच्याकडून पैसे, सोने लुटले असेल. त्यासाठी अनेकांचे बळीही घेतले असतील. मग घरच्यांना विचारले असेल त्याने की तुम्ही माझ्या पापांत सहभागी आहांत का? तर त्यांनी नाही म्हटले असेल म्हणून मग सोन्यासह तो साधू झाला असेल. बघाना, एकाच जन्मात गुंड ते साधू असे दोन्ही त्याने साधून घेतले. त्याला ते साधले म्हणून तो साधू. आपल्या देशांत असे ‘साधू’ खूप आहेत. त्यामुळे होते काय की खर्या साधूंची बदनामी होते. त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. आता खरा कोण अन् खोटा कोण तेच कळत नाही. एक मात्र नक्की की त्या साधूच्या मागे आधीही पोलिस होतेच, कारण तेव्हा तो गुंड होता अन् आताही आहेतच कारण आता तो साधू आहे. आपल्या देशात एकतर गुंडांच्या मागे किंवा साधूंच्या पुढे पोलिस असतात. आधी वाटले होते की हे सोने खरे नसावे... कारण मागे एका बाईने देवाला नवस केला की मला मुलगा होऊ दे, मी तुला सोन्याचे टोपरे वाहीन. तिला मूल झाले. आता तिच्या नवर्याला प्रश्न पडला की ही आता सोन्याचे टोपरे कसे वाहील देवाला? तर तिने मुलाचेच नाव सोन्या ठेवले अन् त्याचे कळकटले मळकटले टोपरे देवाला वाहिले... तर हे असे असते. आता मात्र तो साधू सन्यासी झाला आहे. त्याने कधी काय केले ते आता बघायचे नसते.
 
 
पुत्र दे म्हणत देवाला नवस केल्यावरून आठवले, तुकाराम महाराज म्हणाले होते, ‘नवसे कन्या-पुत्र होती तो का करावे लागे पती?’ हा त्यांचा सवाल रोकडा होता. यावरून तुकाराम महाराजांची एक गोष्ट आठवली. एकदा तुकाराम महाराज अन् त्यांची बायको आवडाई कुठेतरी निघाले होते. तेव्हाच्या पद्धतीनुसार आवडाई नवर्याच्या पासून थोडे अंतर राखून मागून चालली होती. तिच्यात अन् महाराजांमध्ये बर्यापैकी अंतर निर्माण झाले तरीही तिचे लक्ष मात्र महाराजांवर होतेच. महाराज एका ठिकाणी थांबले अन् त्यांनी खाली नीट बघत पायाने माती सारखी केली अन् ते समोर निघून गेले. ही लगबग तिने पाहिली अन् तिने त्यांना थांबवून विचारले की तिथे तुम्ही पायाने काय केले? महाराज म्हणाले, ‘‘तिथे सोन्याचे कडे पडले होते. त्यावर मी पायाने माती झाकून टाकली. कारण मागून तू येत होतीस अन् तुला ते कडे दिसले असते तर तुला त्याचा मोह झाला असता...’’ ते ऐकून आवडाईने महाराजांना खूप मार्मिक प्रश्न विचारला, ‘‘मी तर सामान्य बाई आहे. गृहिणी आहे. संसार करते. षड्रिपूंनी ग्रासली आहे. मोह आहेत, राग आहे... पण; तुम्ही तर संत आहात ना? मग तुम्हाला सोने अन् मातीतला फरक कळला कसा? आपण ज्याला सोने समजून डोळे विस्फारतो ती त्या माजी गुंड अन् आजी साधूसाठी मातीच असेल... बोला पुंडलिक वरदा, हऽऽऽरी विठ्ठल...
Powered By Sangraha 9.0