मनमोहक निळावंती

    दिनांक  05-Aug-2018   


 


तब्बल बारा वर्षांनी निळ्या-जांभळ्या रंगाने नटून-थटून प्रत्येकाला मोहिनी घालण्यासाठी, पाहणाऱ्या प्रत्येकाची नजर खिळवून ठेवण्यासाठी आपला पश्चिम घाट आणि दक्षिण भारताचा प्रदेश सज्ज झाला आहे. पश्चिम घाटाच्या उंच उंच पहाडांवर, डोंगर-कड्यांवर, टेकड्यांवर निसर्गाने आपल्या कुंचल्याने निळा-जांभळा रंग भरायला सुरुवात केली आहे.

 

‘नीले गगन के तले धरती का प्यार पले’... महेंद्र कपूर यांच्या आवाजातले हे सुमधुर गीत ऐकताना असे वाटते की, आपण एखाद्या निसर्गसौंदऱ्या ने नटलेल्या, रंगीबेरंगी फुलांनी लगडलेल्या, धुक्याच्या दुलईत हरवलेल्या स्वप्नील जगाची सैर करत आहोत. काहीशी अशीच निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची, त्याच्या चमत्काराची, त्याच्या कलाकारीतेची, त्याच्या कलाकृतीची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची संधी तब्बल बारा वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आली आहे आणि तीही भारतातच-तामिळनाडूत!

 

तब्बल बारा वर्षांनी निळ्या-जांभळ्या रंगाने नटून-थटून प्रत्येकाला मोहिनी घालण्यासाठी, पाहणाऱ्या प्रत्येकाची नजर खिळवून ठेवण्यासाठी आपला पश्चिम घाट आणि दक्षिण भारताचा प्रदेश सज्ज झाला आहे. पश्चिम घाटाच्या उंच उंच पहाडांवर, डोंगर-कड्यांवर, टेकड्यांवर निसर्गाने आपल्या कुंचल्याने निळा-जांभळा रंग भरायला सुरुवात केली आहे. हा रंग, निळ्या-जांभळ्या फुलांची चादर किंवा मन प्रफुल्लित करणारा गालिचा इथे येणाऱ्या प्रत्येकालाच नाचायला, बागडायला प्रोत्साहन देत आहे. त्याला कारणही तसेच आहे. सुमारे बारा वर्षांनंतर या प्रदेशात निळ्या-जांभळ्या रंगांच्या लाखो-कोट्यवधी कळ्यांनी आपले डोळे उघडले आहेत. मन प्रसन्न करणारी, येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करणारी, प्रत्येकाला निळ्या-जांभळ्या रंगात न्हाऊ घालणारी ही हसरी फुले आहेत ती म्हणजे ‘निला कुरींजीची!’

 

नजर जाईल तिथपर्यंत निळ्या-जांभळ्या रंगात नटलेली, मनाला भुरळ पाडणारी, डोळ्यांचे पारणे फेडणारी निला कुरींजींच्या फुलांचा हा बहार आता आपल्या फुलण्याच्या, उमलण्याच्या चरमसीमेवर आहे आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात ही फुलांची व रंगांची उधळण अशीच होत राहणार आहे. जुलैच्या अखेरीस ही निला कुरींजींची फुले दक्षिण भारतातील घाटमाथा, डोंगररांगा, पश्चिम घाट, तामिळनाडू आणि केरळच्या प्रदेशात दिसू लागतात. बारा वर्षांमध्ये एकदा उमलणारी ही फुले आणि त्यांची रोपटी ही एकदा उमलली, की मरुन जातात. नंतर याच फुलांच्या बियांमधून पुन्हा या रोपट्यांना वाढायला व फुलांना फुलायला बारा वर्षांचा अवधी लागतो. दर बारा वर्षांनी हे चक्र असेच चालू राहते. हाही एक निसर्गाच्या घडाळ्याचा चमत्कारच!

 

गेल्यावेळीदेखील निला कुरींजींची फुले बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ साली या प्रदेशात उमलली होती. त्यावेळीही दक्षिण भारतातल्या कोडाइकॅनॉल, नीलगिरी, अन्नमलाई आणि पळनी या डोंगररांगांमध्ये निळ्या-जांभळ्या रंगांच्या निला कुरींजींच्या फुलांचा असाच बहार आला होता. एवढेच नव्हे, तर ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान तामिळनाडूमधील क्लावरईहून केरळच्या मुन्नारजवळील वट्टावडापर्यंत चारही बाजूंनी जसा काही निसर्गाने निळ्या-जांभळ्या रंगांचा गालिचाच अंथरला आहे, असे वाटत होते. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या १५० वर्षांमध्ये केवळ चौदाव्या वेळी निला कुरींजीची फुले उमलली आहेत. ही नीलगिरी डोंगररांगांत प्रामुख्याने आढळत असल्याने असे म्हटले जाते की, या फुलांच्या निळ्या-जांभळ्या रंगांवरुन नीलगिरी डोंगररांगेचे नाव ‘नीलगिरी’ झाले.

 

निला कुरींजींची झुडूपे आणि त्यांची फुले प्राचीन काळापासून दक्षिण भारतात उमलतात. निळ्या-जांभळ्या रंगाच्या निला कुरींजींच्या मनमोहक बहराला पाहूनच २००० वर्षांपासूनच्या प्राचीन तामिळ कवींनी अनेकानेक सुंदर सुंदर कविता रचल्या. तामिळ संगमच्या सर्वच प्राचीन कवितांमध्ये ‘निला कुरींजी’चे गुणगा केलेले आढळते. एका राजाची प्रशंसा करताना एके ठिकाणी असेही म्हटले आहे की, ‘हा राजा अशा प्रदेशावर राज्य करत होता, जिथे ‘निला कुरींजी’च्या फुलांच्या मधाच्या नद्या वाहत होत्या.’ याच काळात दक्षिण भारतातील डोंगराळ प्रदेशाला ‘निला कुरींजींचा प्रदेश’ म्हणून ओळखले जात असे. याबाबत एक अशी कथाही सांगितली जाते की, या प्रदेशातील वनवासी बांधव मुरुगन देवतेची पूजा करत असत. त्यांच्या मते, मुरुगनने ज्यावेळी वनवासी वधू ‘वल्ली’शी विवाह केला. त्यावेळी त्याने आपल्या वधूच्या गळ्यात ‘निला कुरींजी’च्या फुलांचीच वरमाला घातली होती. ही जरी एक कथा असली तरी आपल्याला आजही तामिळनाडूच्या वलपराई आणि केरळच्या मन्नारदरम्यानच्या डोंगररांगांमध्ये मुडूवर या वनवासी जमातीची माणसे राहताना दिसतात. कदाचित सांगितली जाणारी कथा याच लोकांशी निगडित असू शकते. मुडूवर जमातीची माणसे आपल्या वयाचा हिशोबदेखील ‘निला कुरींजी’च्या उमलण्यावरूनच लावतात. निला कुरींजीची फुले जितक्या वेळा उमलतील, तितके ते स्वत:चे वय सांगतात.

 

निला कुरींजीबद्दल पश्चिम घाटाचा आणि तामिळनाडूचा प्रदेश वगळता इतरांना माहिती कशी मिळाली? तर १८३६ साली ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ रॉबर्ट व्हाइट हा पळनी डोंगररांगांमध्ये गेला असता, त्याला तिथे निळ्या-जांभळ्या रंगांनी नटलेल्या निला कुरींजीच्या फुलांचा बहार दिसला, तर तो भान हरपून या शेकडो एकरांवर फुललेल्या फुलांकडे पाहतच राहिला. नंतर रॉबर्ट व्हाइट याने या फुलांबद्दल बरीच माहिती लिहून ठेवली. त्यानंतर निला कुरींजीबद्दलची माहिती या प्रदेशाबाहेरील लोकांनादेखील समजली. आणखी एक वनस्पती शास्त्रज्ञ कॅप्टन बेडोम यानेदेखील १८५७ साली निला कुरींजीबद्दल बरेच काही लिहून ठेवले. कोडाईकॅनालच्या कॅथलिक पाद्र्यांनीदेखील निला कुरींजीच्या उमलण्याची नोंदणी करून ठेवली. सध्या नीलगिरी डोंगररांगात १८५८ सालापासून उमलत असलेल्या निला कुरींजीच्या उमलण्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. कोटागिरीमध्ये राहत असलेल्या काकबर्नेनामक व्यक्तीच्या आजीनेदेखील स्थानिक कोटा आणि टोडा लोकांकडे विचारणा करून निला कुरींजीबद्दल माहिती लिहून ठेवली आहे.

 

आपल्या बहराने संपूर्ण डोंगररांगेला एखाद्या कॅनव्हाससारखे निळ्या-जांभळ्या रंगात रंगवणाऱ्या या झुडूपवजा रोपट्यांना वनस्पती शास्त्रात ‘स्ट्रोबाइलेंथिज कुंथियाना’ असे म्हणतात. या रोपट्याच्या जगभरात जवळपास २४० प्रजाती आढळतात. या सर्वच प्रजातींची फुले आशियात आढळतात. त्यातील जवळपास १५० प्रजाती भारतात आणि ३० प्रजाती पश्चिम घाट, नीलगिरी आणि कोडाईकॅनॉलच्या परिसरात आढळतात. या रोपट्याच्या काही प्रजाती दरवर्षीदेखील फुलतात, तर काही प्रजाती ठरावीक वर्षांच्या अंतराने उमलतात. स्ट्रोबाइलेंथिज कुंथियाना बारा वर्षांमध्ये एकदा उमलते, त्यामुळे ही दुर्मीळ वनस्पती म्हटली जाते. शिवाय निला कुरींजीची फुले जांभळ्या रंगाव्यतिरिक्त निळ्या, हिरव्या आणि लाल रंगातही उमलतात. निला कुरींजी ही डोळे आणि मन प्रसन्न करणारी तर आहेतच, पण ही फुलझाडे, फुलपाखरे आणि मधमाशांसाठीदेखील उपयुक्त आहेत. निला कुरींजीच्या झुडूपाची साधारणत: उंची ३० ते ६० सेंमी असते, तर अनुकूल परिस्थितीत त्यांची उंची १८० सेमीपर्यंतही वाढते. चमचम करणारी, निळ्या-जांभळ्या रंगाची निला कुरींजीची फुले घंटीच्या आकाराची दिसतात. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील अनाइमुडी कडा दक्षिण भारतातील सर्वात उंच कडा आहे. त्याच्या चारही बाजूच्या परिसराला इराविकुलम असे म्हटले जाते. इराविकुलम हे राष्ट्रीय उद्यान असून निली कुरींजीसाठीचे संरक्षित क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच जिल्ह्यातील देवीकुलम तालुक्यातील ३२ किमीच्या प्रदेशाला ‘कुरींजीमाला क्षेत्र’ म्हणून संरक्षित केले आहे. अशा या निसर्गाने दोन्ही हाताने रंगांची आणि फुलांची उधळण केलेल्या परिसराला भेट नक्कीच दिली पाहिजे.

 

लोनली प्लॅनेट या पर्यटनविषयक प्रकाशनानेदेखील आशियातील २०१८ सालच्या सर्वांत सुंदर स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश केला आहे तो निला कुरींजीच्या उमलण्यामुळे, फुलण्यामुळे. स्वप्नील तथा संमोहित करणाऱ्या निला कुरींजीच्या निळ्या-जांभळ्या बहराला, निसर्गाच्या निलावंतीला पाहण्यासाठी आगामी तीन महिन्यांत केरळच्या मुन्नार आणि तामिळनाडूच्या नीलगिरी डोंगररांगांचा रस्ता लाखो पर्यटक धरतील, तुम्हीही तिथे जाऊन निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटू शकता. हो ना?