गणितातील नोबेल मिळवणारा अवलिया

    दिनांक  04-Aug-2018   मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या अक्षय यांचा आताच ‘गणिताचे नोबेल’ अशी ख्याती असणाऱ्या ‘फिल्डस मेडल’ने गौरविण्यात आले. वयाच्या केवळ ३६व्या वर्षी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

 

गणित हा असा एक विषय आहे, ज्याबद्दल मोठमोठ्या लोकांना अजूनही भीती वाटते. त्यामुळे ‘गणित’ या विषयाची आवड असणारी तशी फारच मोजकी हुशार मंडळी. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला, याचा आजही छातीठोकपणे प्रत्येक भारतीय अभिमानाने उल्लेख करतो. पण, जर तुम्हाला आम्ही सांगितलं की, सोळाव्या वर्षीच कुणीतरी गणितामध्ये उत्तम गुणांसह पदवी संपादन केली तर.... चला पदवीचं सोडा, पण जर त्याच माणसाने पुढे विसाव्या वर्षीच पीएच.डी संपादित केली आहे, असं सांगितलं तर... डोळ्यांवर विश्वास बसत नाही ना, पण हे खरचं घडलं आहे. भारतीय वंशाचे अक्षय व्यंकटेश या बुद्धिमान व्यक्तीनं हे करून दाखवलं आहे.

 

ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलेले, पण मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या अक्षय यांचा आताच ‘गणिताचे नोबेल’ अशी ख्याती असणाऱ्या ‘फिल्डस मेडल’ने गौरविण्यात आले. वयाच्या केवळ ३६व्या वर्षी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फारशा नावडत्या गणित आणि भौतिकशास्त्र या विषयात त्यांनी आपले संशोधन केले. अक्षय यांचा जन्म जरी दिल्लीचा असला, तरी वयाच्या दुसऱ्याच वर्षी ते आपल्या आई-वडिलांसोबत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे स्थायिक झाले. अगदी लहानपणापासून त्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि विज्ञान या तीन विषयांची विशेष आवड होती. त्यांच्या विज्ञानक्षेत्रातील प्रगतीने त्यांनी आपल्या लहानवयातच सर्वांचे लक्षही वेधून घेतले होते. अगदी अल्पकाळात गणितातील संशोधक म्हणून जागतिक पातळीवर त्यांना प्रसिद्धीही मिळाली. अर्थात, हा सगळा नावलौकिक त्यांना एका दिवसात मिळाला आहे, असेही नाही. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठात वयाच्या तेराव्या वर्षीच प्रवेश मिळवणारे ते सर्वात कमी वयाचे विद्यार्थी म्हणूनही ओळखले गेले आणि नंतर त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी गणितामध्ये उत्तम गुणांसह पदवीही संपादन केली. असे करणारे अक्षय हे सर्वात कमी वयाचे विद्यार्थी ठरले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी पीएच.डी पदवी संपादित केली आणि त्यानंतर त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. तेथे संशोधनकार्य केल्यानंतर ते आता स्टॅनफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांचा हा सगळा प्रवास बघता खरंच थक्क व्हायला होते. एवढ्या लहान वयात अशी अलौकिकता मिळवणं अर्थातचं सोपं नव्हतं. त्यांनी स्वत:ला आवडणाऱ्या विषयांवर जीव तोडून मेहनत आणि संशोधन केलं.

 

स्टॅनफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ज्ञानार्जनाचे कार्य करत असताना ते आपल्या विद्यार्थ्यांना एकच कानमंत्र द्यायचे. तो म्हणजे, “तेच करा ज्यावर तुमचं खरं प्रेम आहे आणि ते करताना कोणताही प्रकारचा आळस किंवा कंटाळा तुमच्या कामात आणू नका.” आजवरचे सर्व संशोधन हे त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच त्यांनी केले. त्यांचे डायनॅमिक्स थिअरीमधील योगदानाचे कौतुक जगातले सर्वच संशोधक करतात. मात्र, त्यांच्यासाठी हे केवळ त्यांचे या विषयावरील प्रेम आहे. अक्षय आपल्या संशोधनांकडे कधीच कोणत्याही अपेक्षेने पाहत नाही. त्यांच्यासाठी तो एक त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रयोग असतो. गणितातील नोबेल पुरस्कार मिळवूनही त्यांना अजून काहीतरी वेगळं शिकण्याची व शोधण्याची ओढ आहे. त्यांच्या मते, “माणसाने शिकत राहावे, जोपर्यंत आपला मेंदू साथ देत आहे.” अक्षय यांनी आतापर्यंत अंकगणितीय भूमिती, टोपोलॉजी, ऑटोमॉरफिक फॉर्म आणि एर्गोडिक थिअरीमधील उच्च पातळीवर काम केले आहे. अजूनही गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांवर संशोधन करण्यास ते उत्सुक आहेत.

 

अक्षय व्यंकटेश यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यात इन्फोसिस पुरस्कार, सालेम पुरस्कार, रामानुजन पुरस्कार यांचा समावेश आहे. प्राध्यापक होण्याचा वारसा त्यांनी आपल्या आईकडून घेतला. त्यांची आईही पर्थमध्ये एका नामांकित विद्यापीठात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अक्षय यांना त्यांच्या आईकडूनच मुलांना शिकवण्याची प्रेरणा मिळाली आणि आपल्या संशोधनाबरोबरच त्यांनी स्टॅनफर्ड गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय शिकवण्यास सुरुवात केली. या मागे त्यांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे संशोधनाबरोबरच आपल्याकडून गणित तसेच भौतिकशास्त्रातील काही नवीन संशोधक निर्माण व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. आपल्याकडून चांगलं काम व्हावं, या एकाच विचाराने काम करणारा असा हा अलौकिक संशोधक... तेव्हा, अक्षयचा आदर्श आजच्या तरुणांनीही डोळ्यासमोर ठेवून त्याच्या संशोधनातून नक्कीच प्रेरणा घ्यायला हवी आणि जगाकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायला हवा.