परेलमध्ये संत रोहिदास भवन उभारणार

31 Aug 2018 18:28:31



 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमीपूजन

मुंबई ­: मुंबईतील परेलमधील बाबू जगजीवनराम मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागेवर संत रोहिदास भवन उभारण्यात येणार आहे. शनिवार दि. १ सप्टेबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

 

संत रोहिदास भवनाच्या उभारणीसाठी ११ कोटी रूपयांचा निधीही वितरीत करण्यात आला असून येत्या दोन वर्षात भवनाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही बडोले यावेळी म्हणाले. परेलमधील संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई संचालित बाबू जगजीवनराम यांच्या नावाचे मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह जीर्ण झाले होते. त्यामळे ते बंद होते. दरम्यान, या जागेवर संत रोहिदास भवनाची उभारणी करण्यात यावी, अशी रोहिदास समाज पंचायत संघाची मागणी होती. त्यानुसार संत रोहिदास भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लागणाऱ्या ११ कोटी रूपयांची तरतूदही करण्यात आली. आता भूमीपूजनानंतर भवनाच्या प्रत्यक्ष उभारणीला वेग देण्यात येईल, असेही बडोले यांनी सांगितले.

 

रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार

संत रोहिदास भवनामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, भव्य ग्रंथसंपदा असलेले वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच मागासवर्गीय समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची सुविधा येथे करण्यात येणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0