मनपा अधिकार्‍यांवर अपहाराचे गुन्हे दाखल करा

30 Aug 2018 13:27:21

मजदूर संघाची निवेदनाद्वारे मागणी

 
जळगावः
मनपा कर्मचार्‍यांचे थकीत वेतन, महागाई भत्ता फरक, एलआयसी तसेच ग.स. सोसायटीचे पगारातून कपात केलेल्या हप्त्यांची रक्कम तत्काळ अदा न झाल्यास संबंधित महापालिका अधिकार्‍यांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय मजदूर संघातर्फे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
निवेदनात नमूद केले आहे की, महापालिका कर्मचार्‍यांचे थकीत वेतन, महागाई फरक आदी अदा करण्यासाठी अखिल भारतीय मजदूर संघातर्फे वेळोवेळी निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे. परंतु, महापालिका प्रशासन कर्मचार्‍यांकडून काम करवून घेणे व त्याचा मोबदला न देणे ही अनुचित कामगार प्रथेचा अवलंब करून कर्मचार्‍यांच्या हक्काच्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करून अपहार करीत आहेत, यावर त्वरित कारवाई व्हावी.
कपातीबाबत अधिकार्‍यांची चौकशी करा
कर्मचार्‍यांच्या पगारातून एलआयसी व ग.स. सोसायटी कर्ज हप्त्यांपोटी २७ महिन्यांत पगारातून कपात केलेली रक्कम ३ कोटी ९० लाख ४ हजार १४५ रुपये संबंधित का दिल्या नाहीत, अशी विचारणा करण्यात आलेली आहे. कपात करूनही ग.स. सोसायटीस अदा न केल्यामुळे संबंधित महापालिका अधिकार्‍यांची चौकशी होऊन अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0