‘क्यों चक्र चलाना भूल गये...?’

    दिनांक  03-Aug-2018   ‘निज गौरव को निज वैभव को, क्यो हिंदू बहादुर भूल गये.’ ६६ वर्षांपूर्वी हे गीत मी गात होतो, तेव्हा माझे वय सहा वर्षांचे होते. तेव्हा ‘निज वैभव’ म्हणजे काय आणि ‘निज गौरव’ म्हणजे काय, काही कळत नव्हते. ‘हिंदू बहादुर’ म्हणजे कोण, हेदेखील कळत नव्हतं. या गोष्टी कळण्याचे ते वय नव्हते. असे असले तरी संघगीतात गेयता असते, त्याला उत्तम चाल असते, त्यामुळे ते आपण गुणगुणत बसतो. लहानपणी जे आपण ऐकतो. त्याचा ठसा चिरकाल मनावर उमटलेला असतो. ते विसरता येत नाही. वय वाढत गेले की, विस्मरणाचा रोग सुरू होतो. बालवयात फक्त स्मरणाचा अनुराग असतो.

 

संघ शाखेत जाऊन मला आता जवळजवळ ६६ वर्षे झाली आहेत. संघ परिभाषेत माझे संघवय ६६ वर्ष आहे. या ६६ वर्षांत संघाच्या सहा उत्सवातील गुरुपौर्णिमेचा उत्सव हा चुकविता येत नाही. आणीबाणीच्या काळात मी कारागृहात होतो, शाखा बंद होत्या, पण त्या काळातही गुरुपौर्णिमेचा उत्सव झालाच. त्याचे स्वरूप थोडे बदलले. यावर्षी प्रथेप्रमाणे मी माझ्या वस्तीतील शाखेत गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी गेलो आणि शिशु असताना म्हणजे जवजवळ ६६ वर्षांपूर्वी जे गीत मी शाखेत गायले, ते गीत पुन्हा ऐकायला मिळाले.  असे काही घडले की, मनुष्यस्वभावाप्रमाणे आपण भूतकाळात रमून जातो. जुन्या सिनेमातील गाण्याविषयी असेच असते. ते गाणे ऐकले की, आपल्याला भूतकाळ आठवू लागतो. त्या गाण्याबरोबर असंख्य आठवणी मनापुढे नाचू लागतात आणि आपण त्यात रंगून जातो. नव्या पिढीतील तरुण-तरुणी विचारतात,”काय जुनी गाणी ऐकत बसता?” मी ते का ऐकतो हे त्यांना समजत नाही आणि मलाही समजून सांगता येत नाही.

 

गीत होते -‘निज गौरव को निज वैभव को, क्यो हिंदू बहादुर भूल गये.’ ६६ वर्षांपूर्वी हे गीत मी गात होतो, तेव्हा माझे वय सहा वर्षांचे होते. तेव्हा ‘निज वैभव’ म्हणजे काय आणि ‘निज गौरव’ म्हणजे काय, काही कळत नव्हते. ‘हिंदू बहादुर’ म्हणजे कोण, हेदेखील कळत नव्हतं. या गोष्टी कळण्याचे ते वय नव्हते. असे असले तरी संघगीतात गेयता असते, त्याला उत्तम चाल असते, त्यामुळे ते आपण गुणगुणत बसतो. लहानपणी जे आपण ऐकतो. त्याचा ठसा चिरकाल मनावर उमटलेला असतो. ते विसरता येत नाही. वय वाढत गेले की, विस्मरणाचा रोग सुरू होतो. बालवयात फक्त स्मरणाचा अनुराग असतो. या गीताने मला अंधेरीतील माझ्या शाखेत नेले. तेव्हा माझी शाखा अंधेरी पश्चिमेला आमराईत लागत असे. तेव्हा मी गुंदवली गावात राहत होतो. घर ते शाखा दोन किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागे. तेव्हा त्याचे काही वाटत नसे. चालण्याची तेव्हा सर्वांनाच सवय होती. तेव्हाचे अंधेरी स्टेशन, अंधेरी पश्चिमेला स्टेशनवरच असलेली आंब्याची झाडे, आंब्याच्या दिवसात त्यांना लागणारे आंबे, रेल्वेलाईनला समांतर शाखेकडे जाणारा रस्ता, रस्त्यावरील भलेमोठे पिंपळाचे झाड, त्याखालून जाताना आम्ही मुद्दाम जोराने पाय आपटत असे आणि त्याचा आवाज नंतर घुमत असे आणि आमच्या शाखेचे तेव्हाचे मुख्य शिक्षक निळकंठ जुहूकर, अशा सर्व आठवणी दाटून आल्या. जुहूकरांची तर आठवण आणि प्रतिमा मनात न पुसण्याइतकी बसलेली आहे. तेव्हा ते मला माझ्या बोबड्या बोलण्यावरून खूप चिडवत असत आणि आजही कधी भेटले की, गमतीने त्या आठवणी ते काढतातच.

आता गीताचा अर्थ समजण्याचे वय झाले. गीताची पहिली ओळ संपल्यानंतर दुसरी ओळ सुरू होते -

‘उपदेश दिया जो गीता में, क्यों सुनना सुनाना भूल गये’ आणि यानंतर लगेच पुढच्या कडव्याला सुरुवात होते. पुढचे कडवे असे आहे -

‘रावण ने सिया चुराई थी,

हनुमंत ने लंका जलाई थी,

अब लाखों सीता हरी गयी,

क्यो लंका जलना भूल गये’

हे गीत कोणी रचले, त्याचे साल कोणते, याची मला माहिती नाही. संघगीतांच्या पुस्तकात कवीचे नावही नसते आणि ते कोणत्या साली रचले, त्याचे सालही नसते. गीत संघाचे असते, कवीचे नसते. त्यामुळे कवीचे नाव नसते. गणवेश मी, माझ्या पैशाने खरेदी करतो, पण बोलताना म्हणतो की, “हा संघाचा गणवेश आहे.” म्हणजे, माझा नाही. याला म्हणतात,‘संघ संस्कार.’

गीतातल्या शब्दांवरून आणि त्यातील भावावरून हे लक्षात येते की, या गीताला फाळणीची पार्श्वभूमी आहे. १९४६  ते ४७ या वर्षात देशात भयानक दंगे झालेले आहेत. नौखालीचा दंगा, गांधीजींच्या पदयात्रेमुळे चर्चेत आला. १९४७ साली देशाची फाळणी झाली. पाकिस्तानात आणि पूर्व पाकिस्तानात हिंदूंच्या कत्तली झाल्या. हजारो स्त्रिया पळविल्या गेल्या. हिंदू समाजावर झालेला हा अतिशय भीषण अशा प्रकारचा आघात होता. यापूर्वी महम्मद बीन कासीम, नादिर शहा, बाबर, औरंगजेब, टिपू यांनी हिंदू समाजावर असेच अत्याचार केले, परंतु त्याचा कहर १९४७ च्या फाळणीत झाला. म्हणून गीतातील ओळ आठवण करून देते की, एका सीतेला रावणाने पळविले, त्याचा सूड म्हणून हनुमंताने लंकेला आग लावली आणि आता लाखो सीतांचे हरण झाले आणि आपण सर्व लंकेला आग लावण्याचेच विसरून गेलो. घरात रडत बसलो. ही व्यथा, या ओळीतून काव्य आणि गेयता घेऊन फार जबरदस्तपणे येते.

गीताचे दुसरे कडवे-

‘गीता का पाठ पढाया था,

अर्जुन को वीर बनाया था,

क्यो रास रचाना याद रहा,

क्यों चक्र चलाना भूल गये...???’

 

हा रडवेपणा, कायरता आमच्यात का आली? कारण आम्ही गीतेला विसरलो. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने युद्ध करण्यास उठविले. त्याला त्याच्या क्षात्र धर्माची आठवण करून दिली. “रडत राहण्यासाठी, अपमान सहन करण्यासाठी, आपले हक्काचे सोडण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही. उठ, धनुष्य हातात घे आणि लढायला सिद्ध हो. काका, मामा, गुरू, आजोबा, भाऊ, कशाचाही विचार करू नकोस, हे सर्व अधर्मी आहेत. त्यांनी भयानक पापे केलेली आहेत, ते आपल्या पापानेच मेले आहेत, तू फक्त निमित्तमात्र हो आणि सर्वांना खलास करून टाक. हा क्षात्रधर्म आहे. तो हिंदू बहादुर विसरले.”

 

या कडव्यातील दुसरी ओळ आठवण करून देते की, आम्ही श्रीकृष्णाची रासलीला जीवंत ठेवली आहे, तिचे विस्मरण आम्हाला झाले नाही, आम्हाला विस्मरण झाले ते, सुदर्शन चक्राचे. रासक्रीडा, प्रेमभक्तीचा एक आविष्कार असेल, परंतु ती क्षात्रधर्माचा बळी देऊन जर आपण करायला लागलो, तर आपली अवस्था शक्तीहिन गलितगात्र झालेल्या माणसासारखी होईल. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे, रासलीला तेव्हाच खेळली पाहिजे, जेव्हा एका हातात सुदर्शन असेल, ते पेलण्याची ताकद बोटांमध्ये असेल, ते सोडण्याचे सामर्थ्य शरीरात असेल, सोडण्याचा आदेश देण्यास मन खंबीर असेल आणि ते कशासाठी सोडायचे याचा सारासार विचार करणारी बुद्धी स्थिर असेल.

गीताचे तिसरे कडवे सुरू होते-

‘राणा ने राह दिखाई थी,

शिवराज ने भी अपनाई थी

जिस राह पे बंदा वीर चला,

उस राह पे चलना भूल गये’

 

राजस्थानच्या राणा संघाने मुस्लीम आक्रमकांचा जबरदस्त प्रतिकार केला. असं म्हणतात की, त्यांच्या शरीरावर ऐंशीहून अधिक जखमा झाल्या होत्या, पण हा शूरवीर शरण गेला नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकणार्या शिवरायांचे काय कौतुक करावे! आपली वाणी आणि लेखणी त्यासाठी तोकडी पडते. रायगडावर त्यांनी हिंदू सिंहासन निर्माण केले. ते चक्र सोडायला विसरले नाहीत आणि लंकादहनाचा संदेशही विसरले नाहीत. त्याच मार्गावरून बंदा बैरागीदेखील निघाला. गुरुपुत्रांच्या हत्येचा बदला त्याने घेतला. गुरुपुत्रांना ठार करणाऱ्या यवनांना त्याने कंठस्नान घातले. ही आपली पराक्रमाची गाथा आहे आणि आपल्या क्षात्रतेजाचा प्रवास आहे. तो प्रवास १९४७ च्या फाळणीमध्ये का थांबला गेला? त्या मार्गावरून चालण्याचे आपण का विसरलो? आणि म्हणून त्याची आठवण करून देणारे ध्रुवपद येत राहते-

‘निज गौरव को निज वैभव को,

क्यों हिंदू बहादुर भूल गये’

गीताचे शेवटचे कडवे आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे आहे -

‘केशव की है ललकार यही,

भारतमाता की पुकार यही,

जिस गोद में जीवन पाया है,

क्यों मान बढाना भूल गये’

 

झालं ते झालं, आता त्याचा शोक करत बसण्यात काही अर्थ नाही, आता आपण आपलाच उद्धार करण्यासाठी कंबर कसून तयार झाले पाहिजे. केशव म्हणजे केशव बळीराम हेडगेवार. त्यांनी काय सांगितले, “हिंदुस्थान हिंदूंचा आहे, हिंदू म्हणून हिंदुस्थानच्या उत्थान आणि पतनास मीच जबाबदार आहे. मी जेव्हा सामर्थ्यसंपन्न होतो, तेव्हा ही माझी भारतमाता सुवर्णभूमी झाली, वैभवसंपन्न झाली आणि जेव्हा मी दुर्बळ झालो तेव्हा माझ्या भारतमातेचे सर्व वैभव लयास गेले. ते वैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर केशवाने ललकारी दिली आहे - उठा! जागे व्हा! संघटित व्हा! शक्ती संघटनेतच असते, स्वतःला दुर्बळ समजू नका, आपण प्रत्येकजण हनुमंताचे अंश आहोत, सुदर्शनधारी श्रीकृष्णाचे वंशज आहोत आणि छत्रपती शिवरायांचे अनुगामी आहोत.”

 

भारतमातेचीदेखील हीच आर्त हाक आहे. तिचे सांगणे आहे की, “तुम्ही सर्व माझी संतान आहात, माझ्याच अंगाखांद्यावर बागडता, माझ्यातूनच तुमचे भरणपोषण होते, कसल्या जातीच्या कृत्रिम भिंती तुम्ही उभ्या केल्या आहेत, भेदांचे अडसर उभे केले आहेत, ती आपली ओळख म्हणून मारामार्या करता, सोडून द्या, हे लाजिरवाणे जिणे आणि जागवा एकच जाणीव, आम्ही पुत्र भारताचे!”  उत्सवातून आल्यानंतर पूर्ण दिवसभर हे गीत माझ्या मनात सतत गुणगुणत राहिले आणि डोके त्याच्या अर्थाचा शोध घेत राहिले. त्या दिवशी तरी इतर सर्व विषय डोक्यातूनही गेले आणि मनातूनही गेले. फक्त एक ओळ सतत येत राहिली की, ‘निज गौरव को निज वैभव को, क्यों हिंदू बहादुर भूल गये’ आणि या विस्मरणाचे परिणाम आजूबाजूला सतत दिसू लागतात, तेव्हा अस्वस्थ व्हायला होते आणि मग ही अस्वस्थताच स्वस्थ बसू देत नाही. ती कार्यप्रवण करीत राहते. शिशुपणात गायलेल्या एका संघगीताचे हे अद्भुत सामर्थ्य आहे.