नाटकाचा नवा अंक

03 Aug 2018 20:16:32


 

 
 
शेतकरी कर्जमाफीचा ढोल वाजवत नंतर मला कसे काम करू दिले जात नाही, कर्जमाफीसाठी सरकारचे, प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही, म्हणून रडारड करून सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
 
 
सत्ताकारणाच्या गर्तेत दिवसेंदिवस अधिकच खोल बुडत चाललेल्या कर्नाटकच्या एच. डी. कुमारस्वामी सरकारने आणखी एक काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला आहे. गेली अनेक दशके धुमसत असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नाची धग बेळगावला कर्नाटकच्या कथित दुसऱ्या राजधानीचा दर्जा देऊन कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे. जेमतेम ३६ आमदारांचा जनता दल सेक्युलर पक्ष आणि ८० आमदारांचा काँग्रेस पक्ष यांच्या अभद्र युतीचं राज्य सरकार चालवता चालवता कुमारस्वामींना सध्या पुरते नाकी नऊ आले आहेत. हे नाकी नऊ विरोधकांमुळे नसून त्यांच्याच आघाडी सरकारमधील अंतर्गत भानगडींमुळे आहेत. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीयु एकत्र आले. काँग्रेससारख्या पक्षात असूनही पाच वर्षं सलग मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम करणारे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांना हात चोळत बसण्याशिवाय काही पर्याय उरला नाही. सत्तेचे अमृत आपल्या ओंजळीत घेण्यासाठी आसुसलेले काँग्रेसमधील इतर अनेक गटदेखील आपल्या पक्षाच्या निम्म्याहूनही कमी जागा मिळालेल्या जेडीयुमुळे अतृप्तच राहिले. तीच बाब जेडीयुच्या बाबतीतही घडली. त्यामुळे मंत्रिपदांच्या वाटपावरून या दोन पक्षांत पहिली ठिणगी पडली. ती पुढे भडकत गेली. ‘जेडीयु वि. काँग्रेस’ हा संघर्ष रोज नव्याने समोर येऊ लागला. कधी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडांनी काँग्रेसला जाहीरपणे लक्ष्य करत ‘आम्हाला गृहीत धरू नका,’ असे जाहीरपणे सुनावले तर कधी स्वतः कुमारस्वामी आपण मुख्यमंत्रिपदी असूनही असहाय्य असल्याचे सांगत व्यासपीठावर ढसाढसा रडले. या सर्व परिस्थितीत स्वतः नामानिराळे राहण्याचा कुमारस्वामींचा प्रयत्न चाललेला दिसतो. त्यातूनच शेतकरी कर्जमाफीचा ढोल वाजवत नंतर मला कसे काम करू दिले जात नाही, कर्जमाफीसाठी सरकारचे, प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही, म्हणून रडारड करून सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हे बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचे नाटक कुमारस्वामींनी सुरू केल्याचे स्पष्ट आहे.
 

उद्याची तरतूद ?

 

वास्तविक पाहता, या दुसर्‍या राजधानीचा दर्जा वगैरे गोष्टींना फार काही अर्थ नसतो. बेळगाव तशीही कर्नाटकची उपराजधानी आहेच. तरीही बेळगावचा प्रश्न सुटलेला नाही. तीच बाब महाराष्ट्रातही लागू होते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, तेव्हा नागपूरला वाजतगाजत उपराजधानीचा दर्जा देण्यात आला, हिवाळी अधिवेशन वगैरे देण्यात आलं. मात्र, नागपूर किंवा विदर्भाच्या विकासाला दिशा मिळण्यासाठी २०१४ उजाडावं लागलं. आता कुठे नवे उद्योग, पायाभूत सुविधा, नामवंत संस्था आदींमुळे नागपूर कात टाकताना दिसतं. हे बेळगावात मात्र होताना दिसलेलं नाही. कारण, कर्नाटकचं राजकारण, अर्थकारण हे आतापर्यंत दक्षिण कर्नाटक, जो कर्नाटकाचा समृद्ध, सधन भाग मानला जातो, तिथूनच चालत आलेलं आहे. विद्यमान मुख्यमंत्री कुमारस्वामी, त्यापूर्वीचे सिद्धरामैय्या हे दक्षिणेचेच. उत्तर कर्नाटक आणि किनारी कर्नाटक हे कायम डावलले गेले असल्याची भावना या भागांतील जनतेत आहे. संपूर्ण राज्य फिरल्यास याची प्रचिती येतेच. त्यात पुन्हा बेळगावला सीमावादाची आणखी झणझणीत फोडणी मिळालेली असल्याने तिथला प्रश्न अधिक गंभीर आहे. देवेगौडा-कुमारस्वामींच्या जेडीयुचा पायाच मुळात वोक्कलिंग समाज आहे आणि हा समाज मुख्यतः दक्षिण कर्नाटकात वसलेला आहे. जेडीयुचे आजचे अस्तित्वही राज्यातील दक्षिणेतील दोन-चार जिल्ह्यांच्या पलीकडे नाही. बेळगाव, हुबळी-धारवाड, विजापूर वगैरे भागात तर हा पक्ष नावालाही आढळत नाही. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अदूरदर्शी आणि आत्मघातकी धोरणाचा फटका समितीला बसला. मोदी लाट आणि बी. एस. येडीयुरप्पांची घरवापसी यामुळे भाजपनेही उत्तर कर्नाटकात लक्षणीय यश मिळवलं. त्याखालोखाल काँग्रेसनेही अस्तित्व शाबूत ठेवलं. भोपळा मिळाला तो जेडीयुला. भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे आणि काँग्रेसने भाजपला सत्तेत न येऊ देण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचं ठरवल्यामुळे जेडीयूला मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. उद्या जर जेडीयु-काँग्रेसमधील झोंबाझोंबी कायम राहिली आणि सरकार पडलंच, तर राज्याला पोटनिवडणुकांना सामोरं जावं लागेल. त्यावेळेस जर भाजप किंवा काँग्रेसला बहुमत मिळालंच, तर जेडीयुला कोणीही किंमत देणार नाही, हे स्पष्ट आहे. म्हणूनच दुसर्‍या राजधानीचा दर्जा वगैरेंतून उत्तर कर्नाटकला सुखावून आणि दुसरीकडे स्वतःभोवती सहानुभूती निर्माण करून भविष्याची तजवीज करण्याची धडपड सध्या कुमारस्वामी करत असल्याचं दिसून येत आहे.

Powered By Sangraha 9.0