रासायनिक खते : एक संथ विष

    दिनांक  29-Aug-2018   


 

रासायनिक खते आणि विविध रासायनिक द्रव्ये यांचा अनुक्रमे वापर आणि फवारणीसाठी विविध यंत्रसामुग्रींचा वापर हा जगभरात केला जातो. तेच तत्त्वतः भारतातही लागू आहे. त्यामुळे जरी, कृषिमालात वाढ होत असली तरी, जमिनीतील खनिजे नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे.

 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 

आजमितीस भारतीय शेतीत वाढणारे रासायनिकीकरणाचे प्रमाण ही कृषिव्यवसायापुढील मोठी समस्या बनली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील विकसित राष्ट्रेही शेतीमध्ये रासायनिकीकरणास चालना देताना पाहावयास मिळतात. नुकतेच अमेरिकेतल्या एका शेतकऱ्याने विशिष्ट तणनाशक वापरल्यामुळे आपल्याला कर्करोग झाल्याचा दावा तेथील न्यायालयात केला. तो दावा मान्य करत न्यायालयाने कंपनीला २८९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. रासायनिक खतांचे आणि जंतुनाशकांचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम एवढे गंभीर असतील तर आपण त्याच खतांचा आणि जंतुनाशकांचा वापर करण्याचा अट्टाहास का करावा, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. कृषिपिके आणि मानवी पोषण यावर भाष्य करताना आणि शास्त्रीय संशोधन करताना प्रा. जॉन मार्शी यांनी काही सैद्धांतिक बाबींचा ऊहापोह केला आहे. त्यांच्या मते, जागतिक लोकसंख्यावाढीमुळे कृषिक्षेत्राचे क्षेत्रफळ आजमितीस कमी होत आहे. त्यामुळे अत्यंत मर्यादित जागेत वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पुरविता येतील, अशी पिके घेणे, ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे कमी संख्येत रोप लागवड करून त्यातून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याकडे आजमितीस शेतकऱ्याचा कल आपल्याला दिसून येतो. साहजिकच आहे, उत्पादन वाढीचे ध्येय साध्य करण्यासाठी साधन म्हणून रासायनिक खतांचा वापर हा सर्रास केला जातो. त्यामुळे अशा पिकांतून ऊर्जा जरी मिळत असली तरी, सुपोषण मिळत नाही. त्यामुळे जमिनीचा पोत खालावण्याबरोबरच कुपोषणाचीही समस्या उभी राहिली आहे. रासायनिक खते आणि विविध रासायनिक द्रव्ये यांचा अनुक्रमे वापर आणि फवारणीसाठी विविध यंत्रसामुग्रींचा वापर हा जगभरात केला जातो. तेच तत्त्वतः भारतातही लागू आहे. त्यामुळे जरी, कृषिमालात वाढ होत असली तरी, जमिनीतील खनिजे नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, कृषिपिके हे केषाकर्षण पद्धतीनुसार मुळांद्वारे जमिनीतील खनिजे शोषत असल्याने त्यातदेखील खनिजांची कमतरता ही मोठ्या प्रमाणात दिसून येते.

 

अशा प्रकारच्या भरघोस उत्पादनामुळे विकसित देशांमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगांचा जरी विकास झाला असला तरी तेथील नागरिकांचा पोषणस्तर हा कमालीचा खालावलेला दिसून येतो. त्यातच आधुनिक युगात व्यक्तीची कार्यप्रवणता वाढल्याने त्यांच्या जेवणाच्या वेळाही बदललेल्या आहेत. मागणी तसा पुरवठा हे अर्थकारणाचे सूत्र असल्याने वेळी-अवेळी होणाऱ्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाईन फूड मागविण्याची नवीन पद्धत रूढ झाली आहे. त्याचा थेट भार हा प्रथमोत्पादक असलेल्या कृषिव्यवस्थेवर पडून रासायनिक खतांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते. अन्न सुरक्षा नियामक मंडळाने नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर फळपिके आणि भाजीपाल्यावर केला जातो, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी २०१६ मध्ये संसदेत दिली होती. केंद्र सरकारने भाजीपाल्यांच्या काही नमुन्यांची तपासणी केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील वार्षिक अहवालात कीटकनाशक फवारणीचे प्रमाण १ .७८ टक्के जास्त असल्याचेही आढळून आले. या तपासणी अहवालात फळे पिकविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आणि इतर काही संस्थांनीही काही कीटकनाशके आणि तणनाशके यांच्याबाबत वेळोवेळी इशारे दिले आहेत. बहुसंख्य पाश्चिमात्य देशांनी त्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. एवढेच नव्हे, तर अशा शेतमालावर रितसर आयात बंदी देखील केली आहे. विविध देशांत बंदी असलेल्या तब्बल ६६ कीटकनाशकांचे फेरपरीक्षण केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकरण समितीतर्फे करण्यात येत आहे. या ६६ पैकी २१ कीटकनाशके २०२० पर्यंत कायमस्वरूपी बंद होणार आहेत. हे एक स्वागतार्ह पाऊल म्हणावे लागेल. मानवी जीवनासाठी अत्यंत घातक असणारे रासायनिक खतयुक्त कृषिपीक केवळ भरघोस उत्पादन आणि अर्थार्जन यासाठी पिकविणे हा संथ विषप्रयोगाचाच प्रकार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे अशा पिकांना ग्राहकांनी नाकारणे, हाच या उत्पादन वाढीवरील नियंत्रणाचा रामबाण उपाय ठरू शकतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/