चोरट्यांचे लक्ष्य महिला डबे

    दिनांक  28-Aug-2018 

वसई : पश्चिम रेल्वेच्या विरार ते वैतरणा या स्थानकादरम्यान महिलांच्या डब्यात भुरट्या चोरांकडून गेल्या पाच वर्षांत ३९ लाख ३६ हजार ८२ हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी याबाबत रेल्वेकडून माहिती मिळवली असता ही बाब समोर आली. विरार ते वैतरणा या दोन स्थानकांदरम्यान गेल्या पाच वर्षांत महिलांच्या रेल्वे डब्यात चेन, मंगळसूत्र, पर्स मोबाईल चोरीच्या ११२ घटना घडल्या आहेत. त्यात ३९ लाख ३६ हजार ८२ रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. या दोन स्थानकांदरम्यान एवढ्या मोठ्या मुद्देमालाची चोरी झाल्यामुळे पालघर, डहाणू विभागातील महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
 

वसई रोड, रेल्वे पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र हे मीरा रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान आहे. सन २०१३ या वर्षात चोरीच्या १२ घटना घडल्या असून त्यापैकी गुन्हे उघडकीस आले आहेत. यात चार लाख ३९ हजार ९०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली होती. त्यापैकी दोन लाख ९६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सन २०१४ या वर्षात चोरीच्या २० घटना घडल्या असून त्यापैकी गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात १० लाख ६५ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्यापैकी एक लाख ९१ ह्जार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

सन २०१५ या वर्षात चोरीच्या सात घटना घडल्या असून त्यापैकी तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. यात तीन लाख ८६ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यापैकी एक लाख २४ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सन २०१६ या वर्षात पाच चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी दोन घटना उघडकीस आल्या आहेत. यात एक लाख ७० हजार ४२४ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यापैकी ५३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सन २०१७ या वर्षात ३० चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी काही घटना उघडकीस आल्या आहेत. यात सहा लाख ८१ हजार ७४७ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यापैकी ३६ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सन २०१८ या वर्षात ३८ चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी दोन गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात ११ लाख ९२ हजार ७२ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यापैकी २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच गुजरातची सीमा अगदी जवळ असल्याने गुन्हेगारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी उपलब्ध नसल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/