एक धाव अस्तित्वाची...

    दिनांक  28-Aug-2018   


 

 

आज 

राष्ट्रीय क्रीडा दिन. त्यानिमित्ताने भारतीय क्रीडा क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व, स्त्रीत्व सिद्ध करुन आशियाई क्रीडास्पर्धेत १०० मी शर्यतीत रौप्यपदक कमाविणाऱ्या द्युती चंदची ही कहाणी...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

आजच्या स्पर्धेच्या युगात संघर्षाशिवाय तरणोपाय नाही. पण, महिला खेळाडूंसाठी हा संघर्ष इतरांपेक्षा थोडा जास्त असतो. त्यांच्या कर्तृत्वाची जेवढी चर्चा होते, त्यापेक्षा कैकपटीने त्यांच्या पराभवाची कारणमीमांसा केली जाते. कारण, आजही आपल्या देशात महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंएवढा मान-सन्मान दिला जात नाही. त्यांना त्यांच्या हक्काचा मान स्वत:ला सिद्ध करुन मिळवावा लागतो. अशाच काहीशा जाळ्यात अडकून स्वत:ला सिद्ध केलेली भारताची एक धावपटू म्हणजे द्युती चंद. सध्या जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये तिने भारतासाठी रौप्यपदक कमावले. द्युतीने १०० मी. शर्यतीच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले आणि रौप्यपदकाची कमाई केली. केवळ ०.०२ सेकंदाच्या फरकाने द्युतीचे सुवर्णपदक हुकले. पण, तिच्या संघर्षचा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे.

 
 
ओडिशासारख्या छोट्याशा राज्यातून प्रवास सुरू करणाऱ्या द्युतीची वाट खडतर होती. जणू स्वत:चं अस्तित्व टिकून राहावं यासाठीचं ती लढली. नुसती लढलीच नाही, तर ही लढाई जिंकलीसुद्धा. द्युतीचा हा जीवनसंघर्ष सुरू झाला, तो २०१४ साली. ग्लासगोतील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी २०१४ मध्ये तिची निवड झाली. तिच्यासाठी हे तिच्या मेहनतीचं फळ होतं, पण नियतीच्या मनात काही तरी वेगळंच होत. स्पर्धेच्याकाही दिवस आधी बंगळुरूच्या स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया संकुलात डॉक्टरांनी तिची अचानक चाचणी घेतली आणि तिला भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या स्वप्नांना पूर्णविराम मिळाला की काय, असं तिला वाटायला लागलं. साधारणतः एखाद्या स्पर्धकाला अशा जागतिक क्रीडास्पर्धांतून वगळण्यामागचं कारण असतं ते डोपिंग. पण, द्युतीला डावलण्यामागचं कारण हे तिच्या स्त्रीत्वाची परीक्षा घेणारं होतं. कारण, तिच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण हे पुरुषांइतकं होतं. यामुळे द्युती पुरती खचली होती. आपलं स्त्रीत्व हे केवळ एका चाचणीवर अवलंबून असल्याच्या या विचाराने तिला नैराश्य आलं. द्युती अत्यंत सामान्य घरातली मुलगी. मात्र, स्वत:चं स्त्रीत्व सिद्ध करणं तिला कदापि मान्य नव्हतं. घरच्यांनी तिला या काळात खूप मदत केली. मुळात स्त्रीत्व नाकारणारी ही चाचणीचं सदोष आहे, ज्यामुळे एखाद्या महिलेला ती पुरुष आहे की स्त्री, हे सिद्ध करता येत नाही. एखाद्या महिलेतील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जर उत्तेजक द्रव्य सेवनाने वाढले असेल, तर ती किंवा तो खेळाडू बंदीस पात्र ठरतात. मात्र, नैसर्गिकपणे एखाद्या महिलेत टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषपातळीएवढे असेल, तर ती दोषी कशी ठरू शकेल? या नैसर्गिक वाढीमागे माझा काय दोष? या प्रश्नांनी तिला पुन्हा एकदा लढण्याची हिंमत दिली. तिने या चाचणीलाच ‘कॅस’ (कोर्ट आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स) मध्ये आव्हान दिले. ’कॅस’ने हे मान्य केले की, महिला खेळाडूंत टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषांइतके असले तरी ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे त्या महिला खेळाडूला फायदा होऊ शकतो. या निर्णयामुळे अखेर ३६ वर्षांनंतर द्युती रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करू शकली. तिच्या या संघर्षात तिला मागे खेचणारे खूपजण होते; पण तिने स्वत:च्या आत्मविश्वासावर ही लढाई जिंकली आणि विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचली. या सगळ्या संघर्षामुळे आज तिला विजयाची चव चाखता आली.
 

२०१४ हे वर्ष माझ्यासाठी फार कठीण होते. माझ्याबद्दल अनेकांनी अनेक तर्कवितर्क लावले. माझ्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण, आज त्याच मुलीने देशासाठी पदक मिळवले आहे, ही फार मोठी गोष्ट आहे,” असं द्युती आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवल्यानंतर म्हणाली.

 

आज द्युतीने जे यश संपादन केले त्यात अनेकांचा वाटा आहे. मात्र, तिच्या मते, तिच्यासाठी स्वबळाचे महत्त्व फार आहे. ती म्हणते, “माझं स्वत:वर जेवढं प्रेम आहे, तेवढाच स्वत:वर विश्वासदेखील आहे. माझं कर्तृत्व हे मी मुलगी आहे म्हणून मोठं मानावं, असं मला कधीच वाटत नाही. मी केवळ एक खेळाडू आहे.”

 

द्युतीने आपल्या प्रवासात खूप चढ-उतार पाहिले. नैराश्यही अनुभवलं. पण, कधीही हार मानली नाही. आशियाई स्पर्धा जिंकल्यानंतर द्युतीने एक अजब खुलासा केला. ती म्हणाली की, “मी धावताना डोळे बंद ठेवले होते आणि शर्यत संपताना मी माझे डोळे उघडले. मला फायनल लाईन पार करताना पाहायचे होते, जेणेकरुन मी माझ्या स्वप्नपूर्तीचा तो क्षण अनुभवू शकेन.” द्युतीने भारतातीलच नव्हे, तर एकूणच जगभरातील महिला क्रीडापटूंना मिळवून दिलेला हा सन्मान सुवर्णपदकापेक्षा सर्वार्थाने मोठा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/