भारताची ‘जैव’भरारी

27 Aug 2018 22:55:14



 

 

नवी दिल्ली: देशातील पहिल्यावहिल्या जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाची सोमवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. स्पाईसजेट कंपनीचे विमान डेहराडून येथून उड्डाण करून नवी दिल्ली विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले व ही चाचणी यशस्वी ठरली. या चाचणीमुळे आगामी काळात जैव इंधनाचा (बायो फ्यूएल) वापर देशात वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 

उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथून उड्डाण केल्यानंतर स्पाईसजेटचे हे विमान नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. नवी दिल्ली विमानतळावर केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, नागरी विमानोड्डाण मंत्री सुरेश प्रभू, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विमानाचे स्वागत केले. या विमानात ७५ १० टक्के एव्हिएशन टर्बाईन फ्युएल तर २५ टक्के बायो फ्युएल वापरण्यात आले होते. या यशस्वी प्रयोगाबाबत बोलताना पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, “दि. १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे ‘जैव इंधन धोरण’ जाहीर केले. त्यानंतर आज आपण या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.” विमान क्षेत्रातील आणि ऊर्जा क्षेत्रातील ही मोठी कामगिरी असल्याचे ते म्हणाले. तसेच, केंद्र सरकारने जैव इंधन आणि इथेनॉलवरील जीएसटीत कपात केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारने गेल्या दोन-तीन वर्षांपासून बायो फ्यूएल वापर वाढविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथेनॉलसह जैव इंधनाच्या वापराबाबत सातत्याने आग्रही भूमिका मांडत आहेत. आता विमानोड्डाण क्षेत्रात स्पाईसजेटसह अन्य आघाडीच्या कंपन्यांनी जैव-इंधनाचा वापर सुरू केल्यास या धोरणाला चालना मिळू शकणार आहे.

 
 

ही विमानोड्डाण क्षेत्रातील नव्या क्रांतीची सुरूवात

देशातील विमानोड्डाण क्षेत्रात आज नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे. जैव इंधनावरील विमानाच्या यशस्वी परीक्षणामुळे भारत आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. आता या स्वदेशी, स्वस्त आणि देशातील शेतकऱ्या ना फायदेशीर ठरणाऱ्या जैव इंधनाचा अधिकाधिक वापर होण्याची गरज आहे. स्पाईसजेटने केलेल्या या प्रयोगाचे मी स्वागत करतो. अन्य विमानोड्डाण कंपन्याही असे प्रयोग करतील, अशी मला आशा आहे.

-नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्री

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0