भारतीयांचे ऑनलाईन ‘स्वराज’

    दिनांक  27-Aug-2018   


 


सध्याच्या घडीला सोशल मीडियातून दुष्प्रचाराला प्रोत्साहन मिळताना दिसत असले तरी याच सोशल मीडियामुळे देश-विदेशात राहणाऱ्या भारतीयांना मोठा फायदा झाल्याचीही वस्तुस्थिती आहे. सोशल मीडियाचा वापर करून सर्वसामान्य लोकांची मजल जिथे सरकारच्या ध्येय-धोरणांबद्दल आपले मत मांडण्यापर्यंत जाते, तिथेच कितीतरी भारतीयांना आपले म्हणणे आमदार-खासदारांपासून ते थेट केंद्र सरकारमधील मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे व्यासपीठही याच सोशल मीडियामुळे उपलब्ध झाले आहसोशल मीडियाचा प्रभावी वापर करणाऱ्या मंत्र्यांमधील तत्पर मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. सोशल मीडियाच्या शक्तीला ओळखून देश-विदेशात अडचणीत सापडलेल्या समस्याग्रस्त भारतीयांना आपल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सुषमा स्वराज यांना ट्विटरच्या माध्यमातून विचारता येते आणि स्वराज यांच्यामार्फत त्याच्यावर लागलीच कार्यवाहीही केली जाते. परदेश दौऱ्यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरील आपल्या याच सक्रियतेचा दाखला देत आपल्या टीकाकारांची तोंडेदेखील बंद केली आहेत.  मागच्याच आठवड्यात काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनीमोदी सरकारमध्ये सुषमा स्वराज बेरोजगारअसल्याचा जावईशोध लावला होता. पण, स्वतःच्या पक्षातलीच खबरबात माहीत नसलेल्या राहुल गांधींना सुषमा स्वराज यांचे काम वा त्याची माहिती असण्याची शक्यताच नाही. म्हणून त्यांनी असले आचरट विधान करण्याचा प्रकार केला. परराष्ट्रमंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांनी आपल्या खात्याचे काम कशाप्रकारे चालते, याची माहिती देत म्हटले की, “जगभरात आज कोणत्याही परिस्थितीत एखादा भारतीय अडकलेला असो, त्याला हे माहिती आहे की, तो भारत सरकारशी थेट संपर्क साधू शकतो आणि भारत सरकारही त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी प्रत्येकवेळी तयार आहे. कारण तो भारत सरकारपासून फक्त एका ट्विटच्या अंतरावर आहे.” सुषमा स्वराज यांचे हे म्हणणे नक्कीच खरे आहे, त्याची प्रचितीही वेळोवेळी आली आहे. बंदिस्त महालात राहणाऱ्या काँग्रेस सरकारपेक्षा सोशल मीडियाचा वापर करून तात्काळ मदतीसाठी उपलब्ध असलेले परराष्ट्र मंत्रालय खरेच अभिमानाचे आणि विश्वासाचे ठिकाण बनले आहे, हेच यातून निश्चित होते.
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 

अमेरिकेचे बंटी अन् बबली...

 

गरिबांच्या, पीडितांच्या, संकटग्रस्तांच्या नावाने पैसा जमवायचा आणि नंतर तो आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी वापरायचा, हा शिरस्ता आपल्याकडे अथवा जगभरातही नवीन नाही. भारतात तर गुजरात दंगलीपासून कालपरवा जम्मू-काश्मीरच्या कठुआतील अत्याचार प्रकरणापर्यंत अन्यायग्रस्तांना सहानुभूती दाखवत त्यांच्या नावावर स्वतःचे खिसे भरणारे कितीतरी लोक इथे दिसतील. तिस्ता सेटलवाड वा इंदिरा जयसिंग यांच्यासारखे लोक तर अशी प्रकरणे न्यायालयात गेल्यावर कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी सैरभैर झालेलीही पाहायला मिळाली. आपण फार मोठे समाजकार्य करत असल्याचा आव आणणारी ही मंडळी हा पैसा देशातून आणि परदेशातून दोन्हींकडून ओरबाडताना दिसली, पण सध्याच्या सरकारने परदेशातील देणग्यांचा हिशोब देण्याची अट घातल्यापासून अशा लोकांची रसद बऱ्यापैकी कमी झाली, त्यावरूनही या लोकांचा आरडाओरडा सुरू आहेचभारतात ही अवस्था तर तिकडे परदेशातही लोकांना गंडा घालण्याचे प्रकार सतत होताना दिसतात. नुकतेच अमेरिकेतील असलेच एक प्रकरण उघड झाले असून महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडवर ठकविण्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्याकडेला झोपणाऱ्या, राहणाऱ्या जॉनी बॉबरिट नामक व्यक्तीवर वा त्याच्यासारख्या लोकांवर अशी नामुष्कीची वेळ येऊ नये, या उदात्त हेतूने कैट मैकक्लुरे या महिलेने#गोफडीगकॅम्पेनच्या नावाने पैसा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचा बॉयफ्रेंडही या महिलेसह पैसा गोळा करण्याच्या कामाला लागला. सुरुवातीला दोघांनाही जास्तीत जास्त १० हजार डॉलरचा निधी जमा होण्याची आशा होती. प्रत्यक्षात मात्र १४ हजार दात्यांनी त्यांच्याकडे लाख डॉलरची रक्कम सुपूर्द केली आणि काय आश्चर्य, आतापर्यंत गरिबांचा कळवळा दाटून आलेल्या महिलेची आणि तिच्या बायफ्रेंडची मती फिरली. दोघांनीही जमा झालेला पैसा स्वतःच्या खाजगी सोयीसुविधांवर, ऐशोआरामावर उडवायला सुरुवात केली. आहे ना गंमत? एकीकडे या दोघांचे हे गाडीघोडे, बंगले खरेदी सुरू असतानाच जॉनी बॉबरिट याने याविरोधात तक्रार दाखल केली. जॉनीने केलेल्या आरोपांनुसारया जोडप्याने त्याला वापरलेली गाडी, लॅपटॉप आदी गोष्टी दिल्या खऱ्या, मात्र हे दोघे बीएमडब्ल्यूतून फिरतात लास वेगासला सुट्ट्या घालवतात. मला मात्र अजूनही रस्त्यावरच झोपावे लागते.” म्हणजेच दयाळूपणाचा आव आणून ठकवण्याचे धंदे इथेही जोरात झाले. आता या प्रकरणाची चौकशी होते की नाही, हेच पाहायचे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/