महापौर परिषदेच्या सभेत हक्क, अधिकारांबाबत चर्चा

25 Aug 2018 20:56:53


 

पनवेल : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र महापौर परिषदेची 17 वी सभा शनिवारी (25 ऑगस्ट) उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाली. या सभेत महापौरांचे हक्क व अधिकारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या अधिकारात वाढ करावी, अशी एकमुखी मागणी उपस्थित सर्व महापौरांनी केली. यासंदर्भात महापौर परिषद शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

 

या महापौर परिषदेचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, संयोजक लटके यांच्यासह विविध ठिकाणचे महानगरपालिकांचे महापौर, सभापती, नगरसेवक, अधिकारी आदी उपस्थित होते.

 

या वेळी मार्गदर्शन करताना आ. प्रशांत ठाकूर म्हणाले की, “शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर हे मानाचे स्थान, शक्ती आणि आशेचे केंद्र आहे. त्यामुळे महापौरांच्या अधिकारात वाढ व्हावी आणि शासकीय स्तरावर त्यांना सन्मान मिळावा, ही त्यांची मागणी योग्यच आहे. आपल्या सर्वांच्या एकत्र येण्याने महापालिकांच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडून येऊन परिषदेची ही सभा यशस्वी ठरो,” अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. दरम्यान, या परिषदेला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुखदेखील उपस्थित होते.

 

पनवेल महापालिकेची स्थापना आ. प्रशांत ठाकूर यांच्यामुळे होऊन पहिल्या महापौरपदाचा मान मला मिळाला. तसेच या महापौर परिषेदेचे यजमानपद आम्हाला मिळाले. अशा प्रकारच्या सभा सातत्याने व्हायला हव्या. जेणेकरून महापौरांच्या हिताचे चांगले निर्णय होऊन त्याचा लाभ महापालिकेच्या सर्वसमावेशक विकासाला होईल.

- डॉ. कविता चौतमोल

महापौर
Powered By Sangraha 9.0