
मुंबई : भक्तांना त्यांच्या सोयीनुसार साई समाधीचे दर्शन मिळवून देऊन त्यांना समाधान देणे, हेच आपले परमकर्तव्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे हावरे यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पूर्वी आपण जेव्हा शिर्डीत दर्शनाला जात असू त्यावेळी आपल्याला आलेले अनुभव अन्य भाविकांना येऊ नयेत यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिर्डीत दर्शनाच्यावेळी आपल्याला आलेले अनुभव अन्य कोणत्याही भाविकांना येऊ नये, असा निर्धार केला आणि ज्यांच्याकडे बाळ आहे त्या मातांना थेट दर्शन, तसेच वयोवृद्ध, दिव्यांग, रुग्ण यांना रांगेत उभे न राहता थेट दर्शनाची सोय आपण करून दिली. तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी बेबी फिडींग रूमही उभारल्याचे डॉ. हावरे म्हणाले.
रोजगारनिर्मिती झाली
श्री साईबाबांच्या समाधीवर वाहिलेल्या फुलांचा विचार करून एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने बचतगटातील महिलांना सोबत घेऊन त्यापासून अगरबत्ती सुरू करण्याचे काम सुरू केले. या ठिकाणी दररोज ५ हजार अगरबत्तींच्या पॅकेट्सची विक्री करण्यात येत असून याद्वारे विक्रीकेंद्राला दररोज दीड लाख रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसादालयात मोफत प्रसाद
गेल्या एक वर्षापासून आपण प्रसादालयात मोफत प्रसाद सुरू केल्याची माहिती डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. आज ३६५ दिवसांमधील जवळपास २५० दिवसांचे अन्नदान हे भक्तांकडून करण्यात येत आहे. तसेच सोलारवर उभारण्यात आलेले आशियातील मोठे किचन या ठिकाणी असल्याचे ते म्हणाले.
दर्शनासाठी विशेष पास
आपण पदभार स्वीकारल्यानंतर शिफारसीचा प्रकार हद्दपार केल्याचे ते म्हणाले. तसेच यानंतर या सेवेचा लाभही अनेक भक्तांनी घेतला असून पूर्वी याद्वारे १८ कोटींचे उत्पन्न मिळत होते, परंतु आता त्यातून ४५ कोटींचे उत्त्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दर्शनासाठी ठराविक वेळ दिल्याने दर तासाला ६ हजार भाविक दर्शन घेऊ शकतात. याचाच फायदा भाविकांना लागणाऱ्या दर्शनाची वेळ कमी करण्यात झाल्याचे हावरे यांनी सांगितले.
सामाजिक दृष्टिकोनातूनही संस्थानाचा हातभार
या ठिकाणी दोन रुग्णालये उभारण्यात आली असून यातील एक रुग्णालयात मोफत सेवा देण्यात येत आहे, तर दुसऱ्या रुग्णालयात रेशनकार्ड दाखवून त्या त्या प्रकारे रुग्णालयातील सेवांचा लाभ घेता येतो. या ठिकाणी साई अम्ब्युलन्स ही योजना राबविण्यात येत असून अन्य जिल्ह्यांमध्येही ही सेवा पुरविण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
टेंपल मॅनेजमेंटची गरज
देशातील मंदिरांची सुरू असलेली दुकानदारी संपवण्यासाठी टेंपल मॅनेजमेंटची गरज असल्याचे हावरे म्हणाले. मंदिरांचा चेहरा हा सेवाभिमुख हवा, त्यासाठी टेंपल मॅनेजमेंटवर आपण अभ्यास करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यासंदर्भात विद्यापीठांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी यासंदर्भात काही पेपर्स मागविले असून त्यावर ते विचार करणार असल्याचे ते म्हणाले.
शेतकरी कुटुंबीयांना मदत
यवतमाळमधील ६०० शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय संस्थानाने घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या रोजगारनिर्मितीसाठी संस्थानाने पुढाकार घेतला असून त्यांना छोटा व्यवसाय सुरू करण्यात संस्थान मदत करणार असल्याचे डॉ. हावरे म्हणाले. तसेच सप्टेंबर महिन्यात पार पडणाऱ्या एका कार्यक्रमात या कुटुंबीयांना साधन सामग्रींचे वाटप करण्यात येणार असून अन्य ठिकाणीही असा उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/