साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी पाच कोटींची मदत

23 Aug 2018 20:04:55



 

मुंबई : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने केरळ पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाची मान्यता घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या निधीचा धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.
 

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या या बैठकीला संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, मोहन जयकर, बिपीनदादा कोल्हे, विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिताताई शेळके, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे-पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे आदी उपस्थित होते.

 

डॉ. हावरे म्हणाले, “केरळ राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. लाखो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असल्याने आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून व माणुसकीच्या संवेदनांना साद देऊन केरळमधील या आपत्तीग्रस्तांसाठी ५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय शिर्डीकरांच्यावतीने संस्थानच्या व्यवस्थापन समितीने घेतलेला आहे.

 

मुख्यमंत्र्यांकडे मदत सोपविणार

या मदतनिधीचा धनादेश राज्याच्या विधी व न्याय विभागाची मान्यता घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0