पाऊस आणि रंगसोहळा...

    दिनांक  22-Aug-2018   

 
 
 
 
पावसाने मौन तोडले की त्याची गाणी होतात. आभाळाचे गहिवर ढगांमध्ये दाटून येतात आणि ढगांना पाण्याच्या टपोर्या थेंबांचे जोंधळे लगडून येतात. आभाळ तेव्हा बीजनवाही करून पेरणीसाठी तयार असतं. बीज कुशीत घट्ट धरून सुस्तावलेल्या नागिणीगत जमीन अस्ताव्यस्त पडलेली असते. पावसाच्या इवल्याशा थेंबानेही बिजाला कोवळा जीव फुटतो. नेमक्या अशा वेळी गाव सोडणे तसे कठीण असते. पाण्याच्या रंगाने जमीन हिरवी होते, हा खरेतर भास असतो. पाणीदार ढगांमधून सूर्यकिरणे आरपार जातात आणि ढगांची कूस उजळून रंगसोहळा बाहेर पडतो. जमिनीच्या निरभ्र आरशात आभाळाचं पडलेलं लख्ख प्रतिबिंब म्हणजे पावसाळा! एरवी आभाळाच्या आभास्त रंगच्छटा बघून जमीन काळीठिक्कर पडलेली. पण पाऊस हळूच आभाळाचे रंग चोरून जमिनीत पेरून टाकतो. रंगार्तता लपविता येत नाही, हे जमिनीला माहीत नसतं. माहीत असण्यासाठी रंगांची सवय असावी लागते. रंगांचं वेड असणं वेगळं आणि थेंबांच्या कुंचल्यावर अलगद रंग तोलून ते नेमकेपणाने पसरविणं वेगळं. एखादीही छटा चुकली तर बेरंग व्हायचा. म्हणून मग जमीन अशी रंगबावरी झाली की, आकाशालाच तिची काळजी घ्यावी लागते.
पावसाला मग हळूहळू जमिनीची सवय होते. ओढ वाढत जाते. शेताची कुंपणेदेखील फुलांनी शहारतात. न्हातीधुती झाल्यानंतर पहिलंच न्हाणं लेवून, कुंवारपण अंगावर ठसठशीत झालेली कातकर्याची भाटक काळी पोरही उन्मादक दिसते. अशा बहरत्या दिवसांत भरणार्या अंगाने ती जवळून गेली की, श्वासांची फुलं टपटपू लागतात. शेतबांधावरची झुडपं तशीच ज्वान होतात. उग्र दर्पाच्या चटकदार फुलांनी सजून जातात. डोळ्यांतले गहिरे होत जाणारे रंग कसोशीने सावरत बिल्लोरी सजून जत्रेला जाणार्या गावच्या तरण्या पोरींची भर पावसात अशी नटवी झुडपं होत असावीत. पडदानशीन खानदानी दमणीत बसून गावच्या भरल्या घरच्या स्वप्नाळू डोळ्यांच्या लेकी नव्या उभारीतले ऊर सावरीत शेतबांधांवरून जातात, तेव्हा उग्र फुलांच्या काटक झुडपात दंडेली करणार्या तरण्या पोरींकडे बघून त्या उस्तावतात. दमणीच्या अदबशीर घुंगरमाळांच्या नादी लागून एखादं नखरेल पाखरू डौलदार बैलांच्या पावलांसमोर उडत राहतं. पावसाच्या रिपरिपीनं हळवी झालेली पायवाट बैलांच्या खुरांनी जखमी होते. पायवाटेच्या या जखमा दमणीची मालकीण डोळाभर कोरून ठेवते. पायवाटेशेजारचे वारूळ एव्हाना पाण्याने फसफसलेले. वारुळाच्या वाटेवर कपाळावरील चटकदार लालचुटूक कुंकवासारखे गोसावी किडे रेशमी जीव पांघरून तुरतरत असतात.
 
 
दमणी झाकणार्या पडद्याच्या अस्पष्ट फटीतून ती गोसावी बघते. तिच्या कुंकवाचा करंडा उदास होतो. तिच्या बांगड्यांच्या किणकिणाटाने गाडीवान जाणतो, थांबायचं आहे. कासरे अखडतात. शहाणे बैल मूकपणे थांबतात. ती उतरते. धरतीला पोपटी शहारे आलेले. गवताच्या पात्यांना पाण्याचे मोती लगडलेले. ती तळवा भिजणार नाही इतक्या नजाकतीने पाऊल ठेवते. गुलाबी तळव्याखाली हिरवी लव लाजून चूर होते. ती उत्कट, नितळ मुलायम तळव्यांवर गोसावी अलगद उचलते. कुंकवाची रुप्याची बिल्लोरी डबी उजागर होते. तिच्या डोळ्यांत कुंकवाचा धनी तरळू लागतो. पापण्यांच्या आत बुबुळांच्या चंद्रकोरींच्या कडांवर हा चंद्रहासी चेहरा अलीकडे अस्पष्ट, धूसर साकारू लागला आहे. तो स्पष्ट होत नाही. डोळ्यांतून जातही नाही. ती डोळे मिटून घेते. काळजाच्या खोल खोल डोहात मग पौर्णिमेचं टिपूर चांदणं पडतं. चंद्र मात्र पाण्यावर हेलकावे खात राहतो. चेहरा मात्र स्पष्ट होत नाही. तिच्या श्वासात नागरमोथा दरवळत राहतो. दमण्यांची रांगच रांग, रंगीबेरंगी, हसरी माणसं, कारल्याचा मांडव, हिरवा चुडा आणि खिदळणार्या करवल्या, वटवृक्षासारखे बाबा अन् हळदकुंकू दाटलेल्या-डवरलेल्या तुळशीगत आई... सारंच स्पष्ट. पण, राजा सखा मात्र क्षितिजपार डोंगरावर निळ्याशार पावसाआड दडलेल्या दृश्यासारखा धूसरच. स्वप्नांचा चंद्र ओंजळीत धरून दमणी दुडदुडत राहते. आता बैलांच्या शिंगावरही चंद्रकोरी उगवलेल्या.
 
 
गाव मग पाऊस-गाणी गाऊ लागते. गावच्या वाटेवर हळदकुंकू दाटून येतं. घराची छपरेही फुलांची होतात. पाऊस आता पुष्ट झालेला. आषाढातले ढग सांगावे आणतात. तिच्या डोळ्यांत तरळणारा चेहरा आषाढाने वाचलेला. अशा वेळी आषाढाने मौन तोडावे. आषाढाचे असे मौन तोडणे सोपे नसते. आषाढाने मौन तोडले की, चंद्रभागेचा बांध ढळतो. गावातले ओहोळही नदीशी स्पर्धा करू बघतात. आषाढाच्या मौनाचे अभंग होतात. राऊळात भावभक्तीची दाटी होते. आळंदी चिंब चिंब होते. वर ढगात जनाबाई जात्यावर ओव्या दळते आणि अबीरदाटी झालेले शब्द भाबड्या भक्तांच्या मदतीला धावण्यासाठी आभाळातून टपटपतात. राऊळाच्या वाटेवर टाळ-मृदंगांची दाटी झालेली. माउलीच्या पायावर विसावलेल्या चिपळ्या, तुक्याचे हात शोधू लागतात. पावसाची मग समाधी लागते. हरेक गाव पंढरी होते. तुळस बाळसं धरू लागते. पाऊस मग सावतामाळी होतो. भावभक्तीच्या आरत्या थेंबथेंब टपटपून जातात. प्रत्येक जीव गोराकुंभार होऊन चिखल तुडवत जातो. काळ्या मातीचा विठू होतो. पावलापावलांनी वाट बनत जाते. झाडं मग पानांच्या चिपळ्या करून भजनं गाऊ लागतात. कृष्णतुळस सावळ्याच्या रंगात रंगून जाते. हिरव्या पानांवर सावळा तजेला चढतो. आषाढ सरत असताना तुळस ऐन वयात आलेली. वेडा श्रावण मग तुळशीच्या नाकात मंजिर्यांची नथ घालतो. पावसाला हुलकावणी देऊन ऊन तुळशीचं असं उजागर सौंदर्य डोळा भरून बघतं. पाऊस खोडकर उन्हाला, सरींच्या चाबकानं फटकारून लावतो. चिडलेला पाऊस हस्ताच्या पावलांनी धो-धो कोसळतो. मळभ वाहून जातं.
 
अशा ऐन हंगामात गाव सोडणं कठीण असतं. पण, पोटाच्या कातडी तंबूची शिवण उसवू नये म्हणून गावाकडे पाठ करून मावळतीकडे चालत राहावं लागतं. गावाच्या स्मशानात चिता एकटीच भकभकत असते. लाकडं निखारे धरतात आणि देह गळून पडतो. कायेची पंढरी राख बनून उडून जाते आणि आत्म्याचा विठ्ठल दरवळत राहतो. गावच्या हंगामी श्रीमंतीवर पोटासाठी जांधळे कमवायला आलेले वाटसरू, गावपंढरीची माती कपाळाला लावून गावाच्या चांगभल्याच्या घोषणा देतात. गावाची लेकरं मात्र कपाळावर सटवाईनं कोरलेला लेख तळहातावर तोलून परागंदा होतात. अशा लेकरांच्या भल्याच्या गोष्टी नंदी गुबूगुबू आवाजावर मान डोलवीत सांगतो. पान्हावलेली कातर माउली पदराआड जोंधळे आणून देवनंद्याच्या मालकाची झोळी समृद्ध करते.
हंगाम आटोपला. कापणीनंतर पिकांची कलेवरं कुशीत घेऊन केविलवाण्या डोळ्यांनी जमीन आभाळाकडे बघत असताना, गावाच्या वाटेवरून भरल्या झोळ्या सावरीत भुकेच्या भाकेत गुंतलेले कलावंतांचे थवे उडून जातात. हे दरवर्षीचंच. पण, देणार्या हातांनी दुसरं काही करता येत नाही. देत राहणं, हे त्यांचं प्राक्तन असतं. देणार्याचे हात मग जोंधळ्याचे होतात. असे अनेक हंगाम गावानं पचविले आहेत, तरीही देणं सरत नाही. कुडमुड्या ज्योतिषी मग मेंदीसाठी आसुसलेले हात बघून हळदगोरे होण्याची स्वप्नं अलगद पेरून जातो. स्वप्नांच्या पेरणीला हंगामाचं बंधन नसतं. स्वप्न कुठल्याच मोसमाचे गुलाम नसतात. स्वप्नं पेरून जोंधळे नेण्याचं कसब ज्यांच्या अंगी असतं, तेच गावाच्या भरवशावर जगू शकतात. जोंधळ्यांच्या बदल्यात स्वप्नं तशी महाग नसतात अन् उन्हाच्या गळ्यात गळा घालून पाऊस धुक्यात हरवितो, तेव्हा गावातल्या तुळशीच नव्हे, तर रानातल्या बाभळीही पिवळी फुलं लेवून गुलजार झालेल्या... स्वप्नं काट्यांचीही फुलं करतात. गावाला तुळशीची आणि बाभळीचीही तेवढीच काळजी असते. त्यांचं उन्मुक्त तरणेपण गावाच्या काळजीचा विषय असतो. मांडवाखालून नवर्या चोरून नेणारे कृष्ण येण्याची वाट बघणं तसंही सोपं नसतं. लेकीचं भाबडं तारुण्य पाऊस ओसरू लागल्यावर कसं टोचत राहतं, हे कळण्यासाठी बाप व्हावं लागतं. ज्यांना विठू बाप अन् रुखमाई माय म्हणून लाभते, त्यांचं बरं असतं. रुजवाई सरली की गाव उजवाईच्या मागे लागतं. तुळशीला हवा असतो कृष्ण अन् बाभुळवनात म्हसोबा घिरट्या घालीत असतो. एखाद्या साली गावची एकही लेक उजविली जात नाही. मग गावातली मानवाईक मंडळी रात्रीच्या भजनानंतर चिंतनात गढून जाते. कुंकवाच्या खाली हळदीची इवलीशी रेघ उमटावी म्हणून, गाव मग सामूहिक बाहुलीचं लग्नं लावतं. गावाच्या वाटेला आलेला नकटेपणा टळावा म्हणून बाहुलीची वरात घराघरांत नेण्यात येते. रान, उगवलेलं सगळंच गावच्या पदरात घालून निसृत झालेलं. अशा वेळी पाऊस भैरवी गायला सुरुवात करतो. कापलेल्या पिकालाही मग पालवी फुटते. गावच्या भल्याची गीतं पावसासंग गाऊ लागते. भरल्या घरच्या मुली आणि हिरव्या रानात तरतरीत सावळ्या कांतीने नागिणीगत फिरणार्या काटक रानमुली, दोघींच्या डोळ्यांत सारखीच स्वप्नं. स्वप्नं डोळ्यांचे कूळ आणि स्तर बघत नाही. पाऊस मग डोळ्यांतल्या स्वप्नांचं गाणं करून टाकतो...