गोदा व्हावी मिसौरी

    दिनांक  22-Aug-2018    

सातत्याने नद्यांचे होणारे प्रदूषण हा भारतासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. नदीला मातृत्वाचा दर्जा देऊनही तिच्या समृद्धीसाठी, शुद्धतेसाठी आणि प्रवाहीपणासाठी आपण नेमके काय करतो? याचे अंतर्मुख होऊन विचारमंथन करणे आवश्यक आहे.

 

मानवी जीवनाचे अस्तित्व जिच्या किनारी आदीमकाळीच वसले ती म्हणजे नदी. सातत्याने प्रवाही असणारी आणि आपल्या भोवतालच्या प्रदेशाला सुजलाम् सुफलाम् करणारी नदी ही भारतातील असो वा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील, तिचे कार्य सर्वत्र एकच आहे. ते म्हणजे केवळ अन् केवळ दायित्वाचे. प्रदूषणासारख्या अनेकविध समस्यांनी जगभरातील नद्यांना ग्रासले आहे. मात्र, प्रातिनिधीक स्वरूपात भारतातील गोदावरी आणि अमेरिकेतील मिसौरी या दोन्ही नद्यांचा प्रवाह आणि जलप्रदूषणासाठी त्यावर योजलेल्या उपाययोजना यांचा ऊहापोह या लेखात केला आहे. दिसण्यास बऱ्याच अंशी सारख्या असणाऱ्या आणि उगमस्थानांचे एकच द्योतक म्हणजे पर्वत असणाऱ्या या नद्या बव्हंशी आपल्या मार्गातील पर्यावरणीय परिस्थितीकीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकत असतात. अमेरिकेतील ओमाहा शहर मिसौरी नदीच्या किनारी वसले आहे. एका बाजूला ओमाह आणि दुसऱ्या बाजूला आयोवा राज्यातील कौन्सिल ब्लफ आणि मधोमध मिसौरी नदी, अशी साधारणत: रचना मिसौरी नदीची आहे. या नदीवर प्रसिद्ध बॉब केरी पूल आहे, जो नाशिकमधील गोदावरीवरील अहिल्याबाई होळकर पुलाची आठवण प्रामख्याने करून देतो. हा पूल मिसौरी नदीला पार करत नेब्रास्का आणि आयोवा प्रांत यांना जोडतो. ओमाहा-कौन्सिल ब्लफचे नयनरम्य दृश्य या पुलावरून दिसते. अतिशीत वातावरणामुळे या नदीचे किनारे नेहमीच गोठतात. मात्र, पात्रातील पाणी हे सदैव प्रवाही असते. बर्फाखालून हे पाणी कायम प्रवाही असते.

 

अनेक बाधा असूनही वाट काढत पुढे जाणाऱ्या मिसौरीला बघताना, तिच्याबद्दल वाचताना भारतवासीयांच्या नजरेसमोर गोदावरीच उभी राहते. असे साधर्म्य असणारे नैसर्गिक स्त्रोत परदेशस्थ भारतीयांना मानवी जगात मानवाची उपस्थिती असतानाही आपला माणूस भेटल्याची अनुभूती देतात. यातूनच परदेशातील असे स्त्रोत विशेषत: चटकन दिसणारी नदी आणि आपल्या मूळ गावातील, देशातील, राज्यातील नदी यांचा मानवी मनसंगम बांधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच निर्माण होते, ते एक आपुलकीचे नाते. या दोन नद्यांची जर स्थिती पाहिली, अभ्यासली तर, गोदेसाठी एकच गोष्ट आवश्यक वाटते ती म्हणजे तिचे प्रवाही असणे. कारण, ती प्रवाही नसली तर तिच्या स्थितीकडे पाहवत नाही. आजमितीस तिला प्रवाही ठेवणारे अनेक लहानमोठे मुख्य स्त्रोत काँक्रिटीकरणामुळे नष्ट झाले आहेत. त्यामुळे गंगापूर धरणातील पाण्याच्या उत्सर्गाशिवाय गोदावरी प्रवाही राहूच शकत नाही. याची समस्त भारतीयांना खंत वाटते. केवळ गोदावरीच नाही तर भारतातील अनेकविध नद्यांची हीच स्थिती आज आपणाला पाहावयास मिळते. सातत्याने नद्यांचे होणारे प्रदूषण हा भारतासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. नदीला मातृत्वाचा दर्जा देऊनही तिच्या समृद्धीसाठी, शुद्धतेसाठी आणि प्रवाहीपणासाठी आपण नेमके काय करतो? याचे अंतर्मुख होऊन विचारमंथन करणे आवश्यक आहे.

 

 
 

अमेरिका पुष्कळ अंगांनी भारतापेक्षा प्रगत आहे. औद्योगिकीकरण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र तेथील नद्या अजूनही आटलेल्या नाहीत. आपल्या इतक्या तेथील नद्या प्रदूषित नाहीत. तेथील नागरिक कायद्याचे पालन करतात. नद्या आणि जलस्त्रोत यांची जपणूक करतात. मिसौरीचा उगम तीन नद्या एकत्र येऊन होतो. त्या म्हणजे जेफरसन, मॅडिसन आणि गॅलेटीन या नद्या होय. मिसौरी नदी मोन्टाना, नॉर्थ डकोटा, साऊथ डकोटा, नेब्रास्का, आयेवा आणि कॅन्सस या अमेरिकी प्रांतातून वाहते आणि शेवटी मिसौरी राज्यातील सेंट लुई या शहरामधील मिसिसिपी नदीला जाऊन मिळते. सुमारे 3800 किमी. वाहून आल्यानंतरही मिसौरीचे पाणी अतिशय स्वच्छ असते. त्यावर मोठी शहरे वसलेली आहेत. औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मात्र, एवढे असूनही नदी स्वच्छ आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील स्थानिक स्तरावर सतत कार्यरत असणारी अनेक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे. नाल्यात सोडलेली कोणतीही वस्तू वा रसायने या केंद्रातून योग्य ती प्रक्रिया पूर्ण होऊनच नदीपात्रात सोडले जातात. त्यामुळे नद्यांना जोडणारे नालेही तुलनेने स्वच्छ असतात. अमेरिकेत नद्यांना मिळणाऱ्या अनेक जलवाहिन्यांभोवती कुंपण घालण्यात आले आहे. वाहनांतून वा रेल्वेने प्रवास करताना नदीत कचरा फेकण्याची मानसिकता येथे अजिबात नाही. अशा प्रकारचे कृत्य आपण सर्रासपणे करतो. त्यात आता आपण बदल करण्याची गरज आहे. गोदा व मिसौरी दोन्हीही नद्याच आहेत. मात्र, फरक त्यांच्या किनारी वसलेल्या नागरिकांच्या मानसिकतेत आहे. शाश्वत विकासासाठी त्यात बदल होणे आवश्यक आहे. तेव्हाच गोदा ‘मिसौरी’ होईल.