अमेरिकन निवडणुकीत चिनी हस्तक्षेप?

    दिनांक  22-Aug-2018   सध्याची जागतिक राजकारणातली परिस्थिती पाहता अमेरिकेचे चीन, उत्तर कोरिया वा इराण या कोणाशीही मधुर संबंध आहेत, असे म्हणता येत नाही. अशावेळी अमेरिका आपले राजकारण अधिक प्रभावी करण्यासाठीही या देशांवर आरोप करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

महासत्ता अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांत गेल्या काही महिन्यांपासून व्यापारयुद्धाचा भडका उडालेला आपल्याला दिसला. अमेरिकेने चिनी वस्तूंवरील करांत वा आयात शुल्कांत वाढ केली की, लगेच चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवरील आयात शुल्कांत वाढ केली. यातून दोन्ही देश एकमेकांवर मात करण्याचा, वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत होते. शह-प्रतिशहाचा हा खेळ अजूनही सुरूच असताना आता अमेरिकेने चीनवर आणखी गंभीर आरोप केले आहेत. 2016 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढत झाली. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर मात करत राष्ट्राध्यक्षपद पटकावले. पण, ज्यावेळी अमेरिकेसारख्या महासत्तेतील सर्वोच्च प्रमुखपदाची निवड होत असते, त्यावेळी त्यात फक्त अमेरिकी राजकीय पक्ष वा तिथली जनता नव्हे तर जगभरातील सर्वच देशांचे हितसंबंध त्यात गुंतलेले असतात. त्यांचेही डोळे तिकडे लागलेले असतात, कारण अमेरिकेचा प्रभाव हा फक्त त्या देशापुरता मर्यादित नसून तो जगातल्या प्रत्येकाशी संबंध सांगणारा असतो. त्याचमुळे अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाह्य शक्तींनी हस्तक्षेप केल्याचा गवगवा ट्रम्प निवडून आल्यानंतर झाला. प्रामुख्याने बाहेरील हस्तक्षेपाचे जे काही आरोप झाले, त्यात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे नाव घेतले गेले. डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हावेत, हिलरी क्लिंटन पराभूत व्हाव्यात म्हणून रशियाने मोठी मेहनत घेतली, असे दावे करण्यात आले आणि ट्रम्प यांचाही या सगळ्याला पाठिंबा होता, असेही म्हटले गेले. अमेरिकेत सध्या या सर्वच प्रकाराची चौकशीदेखील सुरू आहे. पण, आता अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सर्वांनाच चकित करणारा दावा केला असून तो चीनशी संबंधित आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी रविवारी सांगितले की, “2016 सालच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीन, उत्तर कोरिया आणि इराणनेही हस्तक्षेप केलेला असू शकतो.” एवढेच नव्हे तर खुद्द राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही यासंबंधी ट्विट केले असून त्यात ते म्हणतात की, “सगळेच बावळट लोक केवळ रशियावर लक्ष केंद्रित करत आहेत, पण त्यांनी दुसर्‍या दिशेला चीनकडेही पाहिले पाहिजे.” ट्रम्प यांच्या या ट्विटनंतर अमेरिकन निवडणुकीत चिनी हस्तक्षेपाच्या शक्यतेवर काही प्रश्नही निर्माण होतात. मुख्य म्हणजे ट्रम्प यांना हे सगळे निवडणुकीनंतर, आरोपांची आतषबाजी झाल्यानंतरच सांगावेसे का वाटले? यामागे एकतर रशिया वा ब्लादिमीर पुतीन यांच्यावरील लक्ष विचलित करून ते चीनकडे वळविण्याचा उद्देश असू शकतो किंवा आता दोन्ही देशांत सुरू असलेल्या व्यापारयुद्धाला आणखी टोक आणण्यासाठीही ट्रम्प यांनी असे विधान केलेले असू शकते. जॉन बोल्टन यांनी असेही म्हटले की, “चीन, उत्तर कोरिया आणि इराण या देशांचा निवडणुकीतील हस्तक्षेप चिंताजनक आहे आणि आम्ही हे थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.” सध्याची जागतिक राजकारणातली परिस्थिती पाहता अमेरिकेचे चीन, उत्तर कोरिया वा इराण या कोणाशीही मधुर संबंध आहेत, असे म्हणता येत नाही. अशावेळी अमेरिका आपले राजकारण अधिक प्रभावी करण्यासाठीही या देशांवर आरोप करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी अमेरिकेने हस्तक्षेपाचा आरोप केलेला असताना आता चीन, उत्तर कोरिया आणि इराणकडून याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/