सनातनवरील बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे सुपूर्द

21 Aug 2018 14:55:56


 


संस्थेवरील बंदीसाठी राज्य सरकराच्या हालचाली सुरू


मुंबई : सनातन या संस्थेवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून या संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

 


 

डाॅ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेशी जोडलेल्या संशयीतांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. यानंतर सरकारनेदेखील हालचाली सुरू केल्या असून सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सोपवला आहे. यापूर्वी सोपविण्यात आलेल्या प्रस्तावात काही त्रुटी होत्या. त्यानंतर नव्याने पुन्हा प्रस्ताव केंद्राकडे सादर केल्याचे केसरकर म्हणाले. तसेच दहशतवादविरोधी पथकाकडून सुरू असलेल्या तपासावरही त्यांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी २०१५ साली सनातनवर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनातनविरोधात पुरावे सापडल्यास बंदी घातली जाईल, असे स्पष्ट केले होते.

 

सनातनवर बंदी आणू देणार नाही

 
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाशी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. आम्ही सनातन आणि आमच्या संस्थेवर बंदी आणू देणार नाही, असे हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी सांगितले. तसेच या हत्यांमध्ये आमच्या संस्थाचा कोणताही संबंध नसून यात नाहक बदनामी केली जात आहे. संस्थांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात तीव्र लढा उभारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
Powered By Sangraha 9.0