आशियाई स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्णपदक!

20 Aug 2018 18:56:10




 

 

जकार्ता : महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली आहे. आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी विनेश फोगाट ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. ५० किलो वजनी गटातील सामन्यात खेळून तिने हे सुवर्णपदक मिळवले आहे.

 

जपानच्या युरी इकाईला विनेशने ६-२ ने मात दिली. यापूर्वी झालेल्या आशियाई स्पर्धेत विनेशने कांस्यपदक मिळवले होते. आता तिने सुवर्णपदक मिळवून भारतासाठी मोठी कामगिरी केली आहे. कुस्तीच्या सामन्यात पहिल्याच फेरीपासूनच विनेशने जापानच्या युरी इकाईवर मात करण्यास सुरूवात केली होती. पहिल्या फेरीत ती ४-० ने आघाडीवर होती. दुसऱ्या फेरीत विनेशने बचावात्मक खेळी खेळण्यास सुरूवात केली. जापानी खेळाडू युरी इकाई यादरम्यान फक्त दोन गुण मिळवू शकली. सामन्याचे शेवटचे ३० सेकंद उरले असताना विनेश फोगाटने २ गुण मिळवून हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला.
 

आणखी एक फोगाट

 

विनेश फोगाट ही गीता व बबिता फोगाट यांची चुलत बहिण आहे. भारतासाठी सुवर्णपदक मिळवून विनेशने आपल्या घराण्याला साजेशी कामगिरी केली आहे. तसेच तिने महिला कुस्तीतील फोगाट हे नाव राखले आहे.
Powered By Sangraha 9.0