‘डिजी लॉकर’मधील कागदपत्रे ग्राह्य

20 Aug 2018 23:17:11


 

मुंबई : बर्‍याचदा वाहनधारकांना रोखल्यानंतर वाहनाच्या मूळ कागदपत्रांची मागणी वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकार्‍यांकडून केली जाते. मात्र, गाडीत कागदपत्रे न बाळगल्याने अनेकदा नाहक दंड सोसावा लागतो. त्यात कधी वादाचे प्रसंगही उद्भवतात. हे टाळण्यासाठी ‘डिजी’ लॉकरमधील कागदपत्रे वाहन चालकांनी दाखवल्यास ते ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश नुकतेच परिवहन आयुक्तालयाने दिले आहेत.
 

नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना रोखले जाते. आपत्कालीन प्रसंगी, तसेच नाकाबंदी दरम्यान आरटीओ अधिकर्‍यांकडून वाहनचालकांकडे वाहन अनुज्ञप्ती (लायसन्स), वाहन नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली जाते. अशा प्रसंगी इ-प्रकारातील कागदपत्रे उपलब्ध असल्यास, संबंधित वाहनचालकाकडून पुस्तक रूपातील कागदपत्रांची मागणी न करण्याच्या सूचना दि.८ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्या होत्या. या सूचनेनुसार परिवहन आयुक्तलयाकडून दि. १८ ऑगस्ट रोजी डिजी लॉकरसंबंधी आदेश निर्गमीत करण्यात आले.परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्या आदेशानुसार, ’डिजी लॉकर अ‍ॅप‘चा वापर करून वाहनचालक अनुज्ञप्ती (लायसन्स), वाहन नोंदणी प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी मोबाइलमध्ये जतन करू शकतात. वाहतूक अधिकार्‍यांनी कागदपत्रांची मागणी केल्यास डिजी लॉकर कागदपत्रे दाखवू शकतात. संबंधित कार्यालयांनी डिजी लॉकरमधील कागदपत्रे ग्राह्य धरावी, तसेच त्यांच्याविरुद्ध केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३० , १७० अन्वये कारवाई करण्यात येऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0