काळ्या रंगाची परी

    दिनांक  02-Aug-2018    


परी आणि तीही चक्क काळ्या रंगाची... होय, या गोरेगोमटेपणाच्या सौंदर्याच्या व्याख्येला छेद देत एका मुलीने मॉडेलिंग क्षेत्रात आत्मविस्वासाने पाऊल टाकले आणि आज ती एक यशस्वी मॉडेल म्हणून ओळखली जाते.

 

दुरचित्रवाणी असो वा वृत्तपत्रे वा चित्रपट आणि आता सर्वांच्याच ओठावर असलेले नाव म्हणजे युट्युब. इथल्या प्रत्येक जाहिरातीत, कामात आपल्याला नेहमीच गोऱ्या गोऱ्या रंगाच्या मुली आणि स्त्रिया सुंदर दाखवल्या जातात. सुंदर असणं म्हणजेच गोरा रंग असणं, असं समीकरणच जणू काही या सर्वच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनात, मेंदूत घट्टपणे रुजवले जाते. जर कोणी गोरं नसेल तर? तर ती मुलगी, स्त्री, व्यक्ती म्हणजे कुरुप, दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट अशीच अशा लोकांची तर्‍हा असते. आपल्या कोट्यवधी रुपये खर्च करून कारखान्यात तयार होणारी, त्वचेला गोरं (?) करणारी उत्पादने विकली जावीत, म्हणून या कंपन्या गोरं नसलेल्या म्हणजेच काळ्या वर्णाच्या व्यक्तीला कमी दर्जाचेच समजतात आणि तसेच दाखवतात. गोरा रंग असेल तर मुलगी, महिला, व्यक्ती यशस्वी होते आणि काळा रंग असेल तर अपयशी, असेही या कंपन्यांकडून सर्वसामान्यांच्या मनावर ठसवले जाते. या सर्वच गोष्टी जितक्या चीड आणणाऱ्या तितक्याच माणूसपणाला तिलांजली देणाऱ्या.

 

जिथे त्वचेच्या रंगाच्या आधारावर जवळपास सर्वच गोष्टी ठरवल्या जातात, जिथे एखाद्याला सुंदर ठरवण्याचा निकष फक्त त्या व्यक्तीचं गोरेपण असते, तिथे सावळ्या वा काळ्या रंगाच्या मुलींना कशा प्रकारच्या समस्यांचा, अडचणींचा सामना करावा लागत असेल, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. छत्तीसगढच्या बगीचा नामक गावातील रिनी कुजूर हिलादेखील अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला. पण, तिने समाजाच्या विरोधाला तोडीस तोड उत्तर देत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आणि आज तिची मॉडेलिंगच्या दुनियेतील एक चर्चित चेहरा म्हणून ओळख झाली आहे. तिचा लुक, गेटअप आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाशी मिळताजुळता असल्याने रिनी कुजूरला ‘भारताची रिहाना’ असेही म्हटले जाते.

 

भारतात व्यक्तीच्या रंगाबाबत चांगले-वाईट करणाऱ्या अनेकानेक प्रथा आणि रुढींचे अस्तित्व आहे. आपल्यासारख्या रुढीप्रिय देशात जन्मूनही रिनीने आपल्या कष्ट, परिश्रम आणि मेहनतीच्या, जिद्दीच्या जोरावर देश-विदेशातील माध्यमांत आपली एक वेगळी छबी तयार केली. असे असले तरी तिला वाटते की, तिच्या त्वचेच्या रंगामुळे आजही तिच्या प्रतिभेचे योग्य आकलन केले जात नाही. रिनी म्हणते की, “फोटोग्राफर्स आपल्या क्‍लायंटला सांगतात की, ते रिहानासारख्याच एक मॉडेलला आणू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला काम देणे सुलभ होते. कारण रिहानाचे नाव घेतल्याने कोणी तिला ती सुंदर नसल्याचे वा कुरुप असल्याचे म्हणू शकत नाही.” रिनी सांगते की, अशाप्रकारे तिच्याबाबत गोष्टी होत राहतात. रिनी सांगते की, “मला आठवतेय एकदा माझ्या वडिलांकडे कोणीतरी माझे फोटो मागितले. जेव्हा समोरच्या व्यक्तीला पहिला फोटो आवडला नाही, तेव्हा त्यांनी थोडासा गोरा फोटो मिळेल का, अशी विचारणा केली. आपल्याकडील लोकांची मानसिकताच अशी आहे.” रिनीच्या काळ्या रंगावरून तिला लहानपणापासूनच चिडवले जाई. लहानपणी ती एका स्पर्धेत गेली असता, स्टेजवर गेल्या गेल्या तिचे हसे करण्यात आले. रिनी स्टेजवर आल्यावर प्रेक्षकांनी लगोलग गोंधळ घालत ओरडा केला की, काळी परी आली, काळी परी आली. खरे म्हणजे सगळेच प्रेक्षक तिच्या रंगाचीच चेष्टा करत होते.

 

मॉडेलिंगच्या क्षेत्रात रिनी कशी आली? रिनीच्या एका मित्राने तिला ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका रिहानासारखी दिसत असल्याचे सांगितले. तिने सुरुवातीला मित्राच्या गोष्टीला हसण्यावारी उडवून लावले. पण नंतर तिने यावर गांभीर्याने विचार केला. शिवाय तिला पाहणारी प्रत्येक व्यक्ती रिनीला रिहाना म्हणूनच हाक मारू लागली. त्यानंतर रिनीने मॉडेलिंगच्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. काळा रंग असल्याने रिनीला कित्येक आव्हानांचा सामना करावा लागला. कितीतरी लोकांनी तिला ती जोपर्यंत क्‍लायंटसला खुश करत नाही, तोपर्यंत तुला काम मिळणार नाही, असेही म्हटले. पण, या सर्वच समस्यांचा सामना करूनही रिनी आज एक यशस्वी मॉडेल म्हणून आपल्या सर्वांसमोर उभी आहे.

 

दिल्लीत मॉडेलिंगचे काम करणाऱ्या रिनीने असेही सांगितले की, “तिला लहानपणी तिच्या चपट्या नाकावरून नेहमीच चिडवले जाई. त्यामुळे आता माझी मुंबईत जाऊन काम करण्याची इच्छाच नाही, तर मला आता लंडनला जायचे आहे.” त्यामागचे कारण सांगताना रिनी म्हणते की, “लंडनमधील लोक जेवढ्या जास्त प्रमाणात तिचा रंग न पाहता काम करायला प्रोत्साहन देतात, तितके भारतीय लोक देत नाहीत. कारण इथे तिला सर्वाधिक नकारांचा सामना करावा लागला. लोक म्हणत असत की, आम्हाला काळी मुलगी चालणार नाही.” रंगावरून नेहमीच नकाराला सामोरी जाणारी रिनी कदाचित भारताबाहेर जाईल अथवा जाणारही नाही, पण भारतीय चित्रपट, जाहिरात, वेबसीरिजच्या जगात जोपर्यंत गोरेपणा हाच सौंदर्याचा मापदंड असल्याचे मानले जाईल, तोपर्यंत रिनीसारख्या कितीतरी मुली-महिला प्रतिभा असूनही नाकारल्या जातील, याचे वैषम्य वाटते. आज आपण रिनीला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो, पण केवळ रंगावरून नाकारले जाण्याची वेळ कोणावरही येऊ नये, अशी इच्छाही व्यक्त करु शकतो.