उड्डाणपुलावर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात यावी

17 Aug 2018 22:14:16


 

मुंबई : मुंबईत मोठमोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. परंतु, काही उड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणावर ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी ‘पी’ दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली.
 

पटेल यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की, मुंबई शहर आणि उपनगरात मोठमोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. परंतु, काही उड्डाणपुलावर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, वीर सावरकर उड्डाणपूल, मृणालताई उड्डाणपूल यावर ध्वनिरोधक यंत्रणा नाही. या पुलावरील विविध वाहनांच्या वर्दळीमुळे येथील इमारतीतील नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी पटेल यांनी केली आहे.

 

तसेच यापुढे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या निविदांमध्ये ध्वनिरोधक यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0