भयाण अशा एकटेपणात

    दिनांक  17-Aug-2018   


 

 

जगात एक असाही देश आहे, जेथील सुमारे 90 लाख लोक दररोज अशा परिस्थितीचा सामना करत आहेत. ही अशी माणसे आहेत, ज्यांच्या आयुष्याचा एकटेपणा हा एक भागच झालेला आहे. या देशातील लोकांनी आपल्या माणसांशी न बोलल्यामुळे त्यांना डिप्रेशनने गाठले आहे. या देशाचे नाव आहे ब्रिटन...

 

विचारवंत, तत्त्वज्ञांसाठी एकांत हा नवे काहीतरी प्रसवणारा, सृजन करणारा असतो. नव्हे एकांतात विचारवंत आणि तत्त्वज्ञांची बुद्धी स्वतःचा, समाजाचा, राज्याचा वा देशाचा नव्हे तर संपूर्ण जगाचा-विश्वाचाच विचार करते. म्हणूनच अशा लोकांना एकांत प्रिय असतो पण एकटेपणा? एकटेपणाचे काय? आणि मुख्य म्हणजे एकांत व एकटेपणा एकच आहेत की भिन्न? नक्कीच एकांत आणि एकटेपणा एक नसून भिन्न आणि भिन्नच आहेत. एकटेपणा म्हणजे सभोवताली माणसांची गर्दी तर दिसते, पण त्यात आपलं म्हणावं असं कोणीच नसतं. एकांत हा बहुतांशवेळा व्यक्तीने स्वीकारलेला काळ असतो, ज्यात व्यक्तीला आनंदाची अनुभूती मिळत असते, तर एकटेपणा हा नेहमीच कंटाळवाणा आणि सभोवतालच्या माणसांनी तोंड फिरवल्यामुळे निर्माण झालेली उदासीन अवस्था असते. सध्या जगभरात एकांतात राहणाऱ्यांपेक्षा एकटेपणात आयुष्य कंठणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, जे दुर्दैवी म्हणावे असेच. कारण जर तुमच्यासमोर अशी परिस्थिती आली की, तुम्हाला जवळपास एका महिन्यापर्यंत घरात एकटे राहावे लागले तर? दरम्यानच्या काळात तुम्हाला कोणाशीही भेटण्याची आणि बोलण्याचीही संधी मिळाली नाही तर, तुम्हाला कसे वाटेल? जाहीरच आहे की, या कालावधीत तुमची अवस्था केविलवाणी होईल. तुमच्यासाठी एक एक क्षण घालवणे अडचणीचे ठरेल. कदाचित आपल्यापैकी कितीतरी लोक अशा दिवसांबद्दल विचार करूनही तणावाखाली जाऊ शकतील. पण...

 

जगात एक असाही देश आहे, जेथील सुमारे 90 लाख लोक दररोज अशा परिस्थितीचा सामना करत आहेत. ही अशी माणसे आहेत, ज्यांच्या आयुष्याचा एकटेपणा हा एक भागच झालेला आहे. या देशातील लोकांनी आपल्या माणसांशी न बोलल्यामुळे त्यांना डिप्रेशनने गाठले आहे. या देशाचे नाव आहे ब्रिटन... ज्याला कोणे एकेकाळी आपल्या राजेशाही ताकदीमुळे ‘द ग्रेट ब्रिटन’ म्हटले जात असे, तो देश. मात्र आता तो जमाना गेला असून आजघडीला हा देश एकटेपणा आणि नैराश्यानेने, ग्रस्त झाला आहे. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले, ज्यात या देशातले 90 लाख लोक एकटेपणाने ग्रस्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. याच सर्वेक्षणात ब्रिटनमधील ज्येष्ठ नागरिकांनी (ब्रिटनमध्ये 75 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या 51 टक्के आहे) असेही सांगितले की, त्यांनी किमान एका महिन्यापासून कोणाशीही बातचीत केलेली नाही. इथे 17 टक्के ज्येष्ठ नागरिक असे आहेत, जे एका आठवड्यात फक्त एकदाच आपल्या कुटुंबातील सदस्य वा एखाद्या मित्राशी बोलू शकतात, तर 11 टक्के लोक संपूर्ण महिन्याभरात कोणत्याही व्यक्तीशी बोलू शकलेले नाहीत. असे का होत असावे? बदललेली जीवनशैली, करिअरची चिंता आणि स्वतःबद्दलच केलेला विचार हीच याची कारणे आहेत. एकटेपणाचा त्रास भोगणाऱ्या या सर्वच लोकांचे म्हणणे आहे की, कुटुंबातील अन्य सदस्य आपल्या कामात एवढे व्यस्त आहेत की, त्यामुळे त्यांना इतरांशी बोलण्याची इच्छाही होत नाही आणि त्यासाठी वेळही मिळत नाही.

 

आज आपल्यापैकी कितीतरी लोकांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी, मित्रांशी बोलण्याची संधी मिळत असेल, पण भयाण असा एकटेपणा वाट्याला आला तर तुम्ही काय कराल? ब्रिटनमधील जवळपास चार लाख लोकांनी असे सांगितले की, त्यांच्या एकटेपणात दूरचित्रवाणी आणि त्यावरील कार्यक्रम, बातम्या त्यांच्या सोबती आहेत. एकटेपणाने नेमके काय होते? एका अध्ययनानुसार एकटेपणामुळे होणारे नुकसान दिवसभरात ओढलेल्या 15 सिगारेटमुळे होणाऱ्या नुकसानाइतके असते. एकटेपणा आणि त्यामुळे येणाऱ्या ताण-तणावांमुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो. एकटेपणा खूप काळापर्यंत राहिला तर गंभीर आजारात बदलतो, ज्यामुळे मृत्यूची शक्यता 26 टक्क्यांनी वाढते. नोकरी करणारे लोक एकटेपणामुळे आपली कामे व्यवस्थित करू शकत नाहीत. ज्यामुळे ब्रिटनमध्ये दरवर्षी 24 हजार कोटींचे नुकसान होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एकटेपणामुळे ब्रिटनमध्ये सुमारे सहा हजार लोक दरवर्षी आत्महत्या करतात. ही खरेच गंभीर बाब म्हटली पाहिजे. माणसाने जसजशी वैज्ञानिक, तंत्रज्ञानविषयक प्रगती केली, स्वतःच्या विकासाची नवीनच परिमाणे निर्धारित केली, तेव्हापासून त्याचा माणसाशी असलेला संवाद तुटला आणि तो निर्जीव अशा गोष्टींशी जास्तच संवाद साधू लागला. पण, यातून खरेच आता सुखी वा आनंदी दिसणारा माणूस आयुष्याच्या शेवटपर्यंत असाच राहू शकेल का?