एक ‘लक्ष्य’णीय प्रवास...

    दिनांक  16-Aug-2018   


 


आपलं कोणीतरी आहे, याची जाणीव त्यांनी जवानांना करून दिली आणि त्याचमुळे जवानांच्या मनातही आपले बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही, अशी खात्री निर्माण झाली.

 

आपण मनोरंजनासाठी सिनेमे पाहतो आणि फार फार तर गाणी किंवा त्यातील काही दिलखेचक संवाद लक्षात ठेवतो, तर काही हौशी सिनेप्रेमी त्यांच्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींची फॅशन, लाईफस्टाईलही अगदी ‘फॉलो’ करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे एखादा सिनेमा पाहून, त्यातून प्रेरणा घेऊन समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती विरळाच... असेच एक समाजसंवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे अनुराधा प्रभुदेसाई. 2004 साली अभिनेता हृतिक रोशनचा ‘लक्ष्य’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्या सिनेमात कारगील, लेहमधील सैनिकांची एकूणच कहाणीवर प्रकाश टाकण्यात आला होता. पण, हा सिनेमा अनुराधा यांनी केवळ पाहिला नाही, तर त्यातून बोधही घेतला आणि त्यांच्या आयुष्याला सर्वस्वी एक कलाटणी मिळाली. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्या आपल्या पती आणि मित्रपरिवारासोबत लडाखला फिरायला गेल्या आणि त्यांना जाणवलं की, सामान उचलून आपण या वातावरणात साधं भरभर चालूही शकत नाही. वातावरणात झालेला बदल जर आपल्याला इतक्या प्रकर्षाने जाणवू शकतो, तर इथे राहणाऱ्या जवानांचे काय हाल होत असतील, हा विचार त्यांना बैचेन करुन गेला. कारगीलहून द्रासकडे जात असताना, रस्त्यातला एक फलक त्यांनी वाचला आणि त्या हादरून गेल्या. त्या फलकावर लिहिले होते, ‘मला खंत वाटते की, या देशासाठी माझ्याकडे फक्त एक आयुष्य आहे.’ हे वाचून त्या दोन क्षण निःशब्द झाल्या. द्रासला सरकारी विश्रामगृहात राहत असताना तिथल्या खानसाम्याने त्यांना 1999च्या कारगील युद्धाची जवानांच्या शौर्याची आणि हौतात्म्याची वीरकहाणी कथन केली. युद्धभूमीवरील त्या परिस्थितीचा केवळ क्षणभर विचार करूनही अनुराधा अतीव अस्वस्थ झाल्या. अनुराधा यांनी भारताने जिंकलेले कारगील युद्ध जेथे झाले, तो टायगर हिलचा भाग लांबून पाहिला. तो सुळका पाहून त्यांना जाणवले की, भारतीय जवान परतीचा मार्ग धूसर असूनही मृत्यूच्या जबड्यात गेले असतील!

 

अनुराधा त्यानंतर तोलोलिंगच्या विजयस्तंभाजवळ गेल्या. तेथे अनेक फलक होते. एका फलकावर कारगील युद्धात हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या नावाची यादी, त्यांची वये लिहिलेली होती. हौतात्म्य प्राप्त झालेल्या 22, 23, 24 वर्षांच्या जवानांची ती नावे त्यांनी वाचली आणि तो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला! त्या घटनेची भीषणता आणि हजारो कुटुंबांवर झालेल्या परिणामाने त्यांच्या मनात कोलाहल सुरू झाला. त्याच क्षणी अनुराधा आणि त्यांचा मित्र विक्रम यांनी विजयस्तंभाजवळ, “आम्ही सर्वसामान्यांना दरवर्षी लडाख येथे घेऊन येऊ,” अशी शपथ घेतली आणि त्यांच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. 26 जुलै रोजी ‘कारगील विजय दिवस’ साजरा केला जातो, याच दिवशी आपल्या शपथेनुसार दरवर्षी अनुराधा प्रभुदेसाई भारतीयांना जवानांच्या कणखर आयुष्याचेमोल कळावे, म्हणून घेऊन जातात. अनुराधा यांनी 2004 सालापासून सलग पाच वर्षें असंख्य लोकांना कारगीलला नेले. या दरम्यान त्यांच्या तेथील जवानांशी ओळखी झाल्या आणि नकळत त्या काही जवानांच्या आई तर काहींच्या ‘ताई’ बनून गेल्या. इथल्या जवानांनीच त्यांना हा उपक्रम चालू ठेवण्याचा आग्रह केला.

 

2009 साली अनुराधा यांनी ‘लक्ष्य’ फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनचे ब्रीदवाक्य आहे ‘वीरभोग्या वसुंधरा.’ 2011 साली अनुराधा यांनी बँकेतल्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आपले पुढील आयुष्य जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करायचे ठरवले. शिस्त, निष्ठा, तीव्र इच्छाशक्ती व समर्पण हे लष्करातील जवानांत आढळणारे गुण आहेत. ते गुण समाज व देशाचा उत्कर्ष यासाठी आवश्यक आहेत. त्या गुणांचा/वृत्तीचा विविध माध्यमांद्वारे प्रसार करून सक्षम, सशक्त आणि संयमी पिढी निर्माण करणे हे अनुराधा यांनी पहिले उद्दिष्ट ठेवले. एवढंच नाही तर, त्यांनी रक्षाबंधनानिमित्त सीमेवर जाऊन जवानांना राखी बांधणे, जवानांच्या परिवारासोबत दिवाळी पहाट साजरी करणे, वसुबारसच्या दिवशी आपल्या जवानांची प्राणज्योत सदैव तेवत राहावी याकरिता ‘प्रत्येक जवान, एक पणती’ हा कार्यक्रमही साजरा केला जातो. तसेच, आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणाऱ्या जवानांसोबत ‘लक्ष्य’ फाऊंडेशनच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ जवानांसोबत साजरा करण्यात येतो. अनुराधा यांचे काम पाहून, 2010 व 2011 साली ‘विजय दिवस साजरा करायला या’ असे खास आमंत्रण लष्करातर्फे त्यांना देण्यात आले होते. लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांच्या हस्ते अनुराधा यांना 2011 साली स्मृतिचिन्हही प्रदान करण्यात आले. कारगिल मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करण्याचा मानही अनुराधा यांना मिळाला. आपलं कोणीतरी आहे, याची जाणीव त्यांनी जवानांना करून दिली आणि त्याचमुळे जवानांच्या मनातही आपले बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही, अशी खात्री निर्माण झाली.