काबुलमध्ये ट्युशन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट

    दिनांक  16-Aug-2018
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी आज एका ट्युशन सेंटरला आपले लक्ष बनवत ट्युशन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या स्फोटामध्ये तब्बल ४८ नागरिकांचा मृत्यू झाला असून ६५ नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तरुण आणि लहान मुलांचा समावेश अधिक असून जखमी नागरिकांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.


काबुलमधील पीडी-१८मधील दश्त-ए-बार्ची याठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला आहे. दश्त-ए-बार्चीमधील शियाबहुल भागामध्ये मेवोद एज्युकेशन अकॅडमीमध्ये शिया समुदायातील मुले आगामी परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करत होते. मेवोद ही नावाजलेल्या अकादमी असल्यामुळे याठिकाणी शिया विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. अशावेळी एका अज्ञात हल्लेखोराने काल याठिकाणी येऊन स्वतःला बॉम्बने उडवून घेतले. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती कि, यामुळे तब्बल ४८ विद्यार्थांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

दरम्यान या स्फोटामागील नेमके कारण अद्याप कळलेले नसले तरी देखील यासाठी इसीसला जबाबदार धरले जात आहे. शहरातील शिया क्लर्कियल काउंसिलचे सदस्य जवद घवरी यांनी यांनी यासाठी इसिसला दोष दिला आहे. इसिसने या अगोदर देखील शिया समुदायांच्या शाळा, मस्जिद आणि धार्मिक कार्यक्रमांवर हल्ले केलेले आहेत. गेल्या वर्षभरात इसिसने शिया समुदायांवर १३ हल्ले केले आहेत. त्यामुळे हा हल्ला देखील इसिसनेच केल्याचे बोलले जात आहे.