खच्चीकरण करणारे राहुल गांधी

    दिनांक  15-Aug-2018   
 


“शिकंजी विकणाऱ्यार्ने मॅक्डोनाल्डस हॉटेल्सची शृंखला सुरु केली, सरकारने भेल कंपनीचा मोबाईल का विकत घेतला नाही,” अशी शेंडा ना बुडखा असलेली विधाने करण्याचीच कुवत असलेल्या राहुल गांधींनी देशातल्या एका सच्चा आणि हरहुन्नरी व्यक्तीच्या बुद्धीचा, क्षमतेचा, शोधाचा सोमवारी चांगलाच अपमान केला.

 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैविक इंधन दिनी एका कार्यक्रमात गटारातल्या घाण पाणी व कचर्‍यातून निघणार्‍या वायुचा वापर करुन गॅस शेगडी पेटवणार्‍या, त्यावर स्वयंपाक करणार्‍या एका व्यक्तीचे उदाहरण दिले होते. श्यामराव शिर्के हे त्या व्यक्तीचे नाव. सतत काहीतरी नवीन करण्याच्या शोधात असणार्‍या श्यामराव शिर्के यांना नाले, गटारातील पाणी, प्रदूषणाची समस्या तर दिसत होती, पण त्याला स्वच्छ करण्याचा उपाय मात्र कोणी करत नव्हता. हाच विचार करुन श्यामराव यांनी गटारातील पाण्याच्या साह्याने गॅस बनवला आणि त्याआधारे स्वयंपाक केला तर काय होईल, हा विचार केला आणि तो प्रत्यक्षातही आणला. छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये राहणार्‍या श्यामराव यांनी नाल्यातून-गटारातून वाहणारे पाणी एकत्र केले आणि त्या पाण्यातून बाहेर पडणार्या बुडबुड्यांना एकत्रित करण्यासाठी मिनी कलेक्टर तयार केले. नंतर गॅस होल्डरसाठी त्यांनी एका ड्रमचा वापर केला आणि त्याचे परीक्षण-निरीक्षण केले. यावेळी त्यांना आपण केलेला प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसले. श्यामराव शिर्के यांनी ताबडतोब एक गॅस शेगडी आणून त्याला पाईपच्या साह्याने या गॅसचा पुरवठा केला व त्यावर चहा तसेच स्वयंपाक करायला सुरुवात केली. त्यांचा हा प्रयोग चार-पाच महिने सुरु होता. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गटाराच्या पाण्यापासून तयार झालेला गॅस व त्यावर स्वयंपाक करणार्‍या व्यक्तीचे दिलेले उदाहरण कसलीही थापेबाजी नव्हती, तर सत्यकथा होती. पण, ज्यांना मोदीविरोधाने, मोदीद्वेषानेच पछाडले आहे, त्यांना खऱ्या गोष्टी स्वीकारण्याची वा त्यांची माहिती करुन घेण्याची हिंमतच होत नाही (कदाचित आयुष्यभर खोटपणा केल्याने?). विशेष म्हणजे राहुल गांधींनी इथे फक्त नरेंद्र मोदींवरच टीका केलेली नसून श्यामराव शिर्के यांचाही अपमानच केला. शिवाय राहुल गांधींचे विधान देशातल्या कोणत्याही गावातल्या, शहरातल्या, भागातल्या, राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकाचे खच्चीकरण करणारेच म्हटले पाहिजे. कारण ज्या कोणाला काहीतरी नवीन करण्याची उर्मी वाटत असेल, त्याचीच खिल्ली उडवणारे, त्याला मागे खेचणारे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून वावरत असतील तर तो सर्वसामान्यांच्या नवसंशोधनाचा, नवसर्जनशीलतेचाच अपमान!
 

गटाराच्या पाण्यातून गॅस

 

श्यामराव शिर्के (वय - ६०, शिक्षण - ११ वी) यांच्यासारखे शेकडो तरुण, प्रौढ, अशिक्षित, सुशिक्षित भारतीय देशात आहेत. या सर्वांकडेच काही ना काही जगावेगळे, नवे करण्याची क्षमता आणि ताकद आहे. अशा सर्वांच्याच नाविन्याच्या उमेदीला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आयआयटीतील आपल्या मार्गदर्शनातही ही बाब अधोरेखित केली होती की, नाविन्यालाच भवितव्य आहे. आता श्यामराव शिर्के यांच्या प्रयोगाचे पुढे काय झाले? तर गटारातील पाण्यापासून तयार केलेला गॅस व त्यावर पेटवलेली शेगडी पाहून छत्तीसगढच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने त्यांना हा प्रयोग अधिक वरच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत दिली. काही शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगाची कागदपत्रे-संशोधन पत्रिका तयार करुन ती उच्च अधिकार्‍यांनाही पाठवले. आता या गोष्टीला दोन वर्षे झाली. दरम्यान, श्यामराव शिर्के यांनी आपल्या प्रयोगाला आर्थिक मदत मिळावी म्हणून अनेक ठिकाणी विनंती केली. पण, त्यांना कोणीही मदत दिली नाही. इतकेच नाही तर नगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी तर त्यांची उपकरणे फेकूनही दिली व तुमचा प्रयोग बेकार, निरुपयोगी असल्याचेही सांगितले. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील लोकांनी त्यांना याविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितला. या सर्वच गोष्टींना दोन वर्षे उलटून गेली होती आणि श्यामरावही जवळपास सर्वच विसरले होते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात श्यामरावांच्या प्रयोगाचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. ही गोष्ट जेव्हा श्यामराव शिर्के यांना समजली तेव्हा ते आनंदित झाले आणि आपल्या प्रयोगाला पेटंट मिळावे म्हणून अर्जदेखील केला. आता लवकरच श्यामरावांना त्यांनी केलेल्या प्रयोगाचे पेटंट मिळण्याची व त्याआधारे अनेकांची गॅसची समस्या सुटण्याची आशा आहे. देशात एकीकडे हे सगळे घडत असतानाच राहुल गांधींनी मात्र श्यामरावांची चेष्टा करण्याचेच काम केले, जे सर्वथा अनुचितच. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण सध्या वापरत असलेली कितीतरी उपकरणांची, यंत्रांची, तंत्रज्ञानाची तत्कालीन प्रस्थापितांनी सुरुवातीला टिंगल-टवाळीच केलेली होती. पण ज्यांनी त्यांचा शोध लावला, ते सर्वसामान्यांच्या गळ्यातले ताईतच झाले. आज राहुल गांधींनी श्यामरावांच्या शोधाची अशीच खिल्ली उडवत त्यांच्यावरच टीका केली. श्यामरावांनीही राहुल गांधी अपरिपक्व असल्याची प्रतिक्रिया दिली. ते खरेच आहे म्हणा, राहुल गांधी अपरिपक्व तर आहेतच पण त्यांना एखाद्या गोष्टीची माहिती घेऊन बोलण्यापेक्षा, काहीतरी बरळून स्वतःचेच हसे करुन घेण्याचीही हौस आहेच.