अमेरिकन मालावर चिनी बहिष्कार

    दिनांक  15-Aug-2018   अमेरिका आणि चीन... एक महासत्ता आणि दुसरा महासत्तेच्या मार्गावर वेगाने मार्गक्रमण करणारा देश... या दोन्ही देशांतील इतक्या वर्षांचा तसा सुप्त संघर्ष ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून अधिकाधिक तीव्र झाला आहे. कारण, ट्रम्प यांनी चीनविरोधात राबविलेली एकूणच व्यापारी धोरणे आणि आयात मालावरील वाढवलेली जकात

 

भारत आणि चीनमध्ये डोकलाम असेल किंवा इतर मुद्द्यांवरून संघर्ष उफाळून आला की आपसूकच त्याचे पडसाद भारतीय बाजारपेठेतही उमटू लागतात. चिनी मालावर बंदी, बहिष्काराची भाषा अधिक तीव्र होते. पण, दोन्ही देशांतील संघर्षाचे काळे ढग दूर सरले की पुन्हा भारतीय बाजारपेठ ‘मेड इन चायना’ उत्पादनांकडे वळलेली दिसते. याचे कारण अगदी स्पष्ट आहे. राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना. म्हणजे, आपल्या देशावर या ना त्या मार्गाने कुरघोडी करणाऱ्या देशाला अद्दल घडविण्यासाठी मग देशाचे नागरिकही पुढे सरसावतात. संघर्ष करण्यासाठी सीमेवर जाऊनच लढले पाहिजे, असे नाही, तर मग आपल्या कृतीतून, बहिष्कारातून विरोध प्रदर्शन केले जाते. त्याचा बाजारावर थोड्या फार प्रमाणात काही कालावधीकरिता का होईना, परिणाम जाणवतो. मार्केट थंडावते. तशीच काहीशी परिस्थिती सध्या चीनमध्ये निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वातावरण भारताविरोधात नाही, तर अमेरिकेच्या व्यापारी मनमानीविरोधात...

 

अमेरिका आणि चीन... एक महासत्ता आणि दुसरा महासत्तेच्या मार्गावर वेगाने मार्गक्रमण करणारा देश... या दोन्ही देशांतील इतक्या वर्षांचा तसा सुप्त संघर्ष ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून अधिकाधिक तीव्र झाला आहे. कारण, ट्रम्प यांनी चीनविरोधात राबविलेली एकूणच व्यापारी धोरणे आणि आयात मालावरील वाढवलेली जकात. यामुळे जिनपिंगसह अवघे चिनी जगत द्वेषाने ढवळून निघाले आहे पण, तरीही अमेरिकेच्या उत्पादनांवर, सेवांवर चिनी सरकारने कोणतीही बंदी किंवा निर्बंध अद्याप तरी लादलेले नाहीत पण, चीनमधील एका सर्वेक्षणानुसार, चिनी नागरिकांमध्ये मात्र अमेरिकेच्या या आततायी धोरणाविषयी नाराजी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासंदर्भात चिनी नागरिकांशी सर्वेक्षण संस्थेने बातचीत केली असता, 14 ते 28 टक्के चिनी नागरिकांना अमेरिकी उत्पादने विकत घ्यावीशी वाटत नाही, तर काहींनी अमेरिकन उत्पादनांची खरेदी पूर्णपणे थांबविली आहे, तर काही चिनी नागरिकांचे म्हणणे आहे की, अमेरिकेचे हे अरेरावीचे धोरण कायम राहिले तर भविष्यात मात्र ते अमेरिकी उत्पादनांकडे फिरकणारदेखील नाहीत.

 

राष्ट्रवादी चिन्यांनी जर खरंच ‘नो अमेरिकन प्रोडक्ट्स’चे धोरण स्वीकारले, तर आगामी काळात अ‍ॅपलचे आयफोन, डिझनीचे चित्रपट, स्टारबक्स, जनरल मोटार्स यांसारख्या जगभरात पाय पसरविलेल्या अमेरिका ब्रॅण्ड्सना मात्र त्याचा नाहक फटका सहन करावा लागेल आणि तेही कुठल्याही अधिकृत सरकारच्या बहिष्काराच्या प्रयत्नांशिवाय... याच सर्वेक्षणात व्यापारयुद्धाविषयीही चिनी नागरिकांची मतं जाणून घेण्यात आली पण, केवळ 22 टक्के नागरिकांनी या व्यापारयुद्धामुळे चिंतेत असल्याचे सांगितले, तर 78 टक्के नागरिकांनी त्यामुळे त्यांच्या जीवनावर कुठलाही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले. या सर्वेक्षणात चिनी नागरिकांनी अमेरिकन उत्पादनाबाबतही अगदी संमिश्र मते व्यक्त केली. एक तरुण चिनी उदाहरणादाखल म्हणाली की, “सध्या आम्ही मोठ्या प्रमाणावर अमेरिकेकडून येणारी सौंदर्यप्रसाधनाची उत्पादने वापरतो पण, अमेरिकेकडून अशाप्रकारे आमच्या देशावर आयात शुल्क वाढवून दबाव आणण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही जपान किंवा कोरियाकडूनही तशाच प्रकारची उत्पादने मागवू शकतो.” एकूणच काय तर अमेरिकेविरोधात चीनमध्ये हळूहळू असंतोष वाढत चालला आहे आणि त्याचा आगामी काळात दोन्ही देशांच्या व्यापारावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवण्याची शक्यताही नाकारता येत नाही.