आप नेते आशुतोष यांचा पक्षाला 'राम राम'

15 Aug 2018 11:41:18


नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी आज पक्षाला 'राम राम ठोकला' आहे. आम आदमी पक्षाने आज आपला राजीनामा स्वीकारल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. परंतु राजीनामा देण्यामागचे कारण मात्र त्यांनी जाहीर केलेले नाही. परंतु आशुतोष यांच्या अचानकपणे पक्ष सोडण्याचा निर्णयामुळे सध्या राजकीय वर्तुळ एक नवी चर्चा सुरु झाली आहे.
आज सकाळीच आशुतोष यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याविषयी माहिती दिली आहे. 'प्रत्येक प्रवासाला कुठेनाकुठे अंत असतो, त्यामुळे आपण देखील राजकीय प्रवास थांबवत आहोत. पक्षाने आज आपला राजीनामा स्वीकार केला असून यापुढे पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून आपण मुक्त होत असल्याचे आशुतोष यांनी म्हटले आहे. आपल्या काही वैयक्तिक कारणांमुळे आपण पक्षाचा राजीनामा देत असून यापुढे काही काळासाठी आपल्याला एकांत देण्यात यावा, असे आवाहन देखील त्यांनी आपल्या सोशल मिडियावरून केले आहे.





दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजारीवाल यांनी देखील आशुतोष यांच्या राजीनाम्यावर कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. आपच्या काही कार्यकर्त्यांच्या मते आशुतोष यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच आपला राजीनामा दिला होता. परंतु केजरीवाल यांनी त्यांच्या राजीनामा न स्वीकारल्यामुळे ते पक्षामध्ये होते. परंतु आता मात्र केजरीवाल यांनी राजीनामा स्वीकारल्यामुळे ते पक्षात बाहेर पडले आहेत.
Powered By Sangraha 9.0