पाकिस्तान करणार ३० भारतीय नागरिकांची सुटका

    दिनांक  13-Aug-2018इस्लामाबाद : पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये तुरुंगवास भोगत असलेल्या ३० भारतीय नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. येत्या १४ ऑगस्टला म्हणजे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी या सर्व नागरिकांची सुटका करण्यात येणार असल्याची घोषणा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.


मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एकूण ३० नागरिकांची सुटका येत्या स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार आहे. यामध्ये २७ नागरिक हे मच्छीमार असून पाकिस्तानच्या समुद्र हद्दीत मासेमारी करताना त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच उरलेल्या नागरिकांना पाक सीमेजवळून अटक करण्यात आली होती. तसेच आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची संशयित वस्तू अथवा माहिती मिळालेली नाही. त्यामुळे येत्या १४ तारखेला या सर्व नागरिकांची सुटका करण्यात येईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.


याचबरोबर पाकिस्तान हा मानवी मूल्यांना जपणारा देश आहे, असे देखील पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. प्रत्येक मानवाच्या मानवी अधिकाऱ्यांचे जतन करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असतो. त्यामुळे निर्दोष असलेल्या या भारतीय नागरिकांची आम्ही सुटका करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.