पुस्तकांना जेव्हा पाय फुटतात

12 Aug 2018 09:07:58

 

 
 
 
 
गवताला जेव्हा भाले फुटतांत, यासारखेच हे ‘पुस्तकांना जेव्हा भाले फुटतांत’, असे वाटण्याची शक्यता आहे. पुस्तके हे गुरू असतात, असेही म्हणतात. त्यामुळे पुस्तके बोलत असलीच पाहिजेत. तशी पुस्तके चालतांतही काय? आता सारेच कसे व्यवसायिक अन् शुद्ध अंत:करणाने सांगायचे तर धंदेवाईक झाले आहे. त्यामुळे ‘चालणे’ हा वाक्प्रयोग वेगळ्या अर्थाने व्यवसायांत वापरला जात असतो. आता बघाना, एखादा चित्रपट खूप चालला, असे म्हणतात. तसेच आता पुस्तकाचेही प्रमोशन केले जाते. एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आधी त्यावर वाद निर्माण केला जातो. वर्तमानपत्रांत ‘पेड’ चर्चा चालविल्या जातात. त्यावर अभ्यासक बोलतात. आरोप, प्रतिआरोप अन् उत्तरांची मालिका चालते अन् मग ते पुस्तक विक्रीस बाजारांत येते. आधी त्यावर डिस्काऊंट मारला जातो. (आता डिस्काऊंड मारला जाणे- हाही धंदेवाईट शब्द प्रयोग) तर त्यावर डिस्काऊंट मारला जातो. पुस्तकाची पहिली आवृत्ती महिनाभरांतच खपली, असे सांगितले जाते.
 
सहा महिन्यांत पाच आवृत्त्या खपल्या, असेही मार्केटिंग केले जाते. तसे ते खरेही असते. पुस्तके छापतानाच त्यावर प्रथम ते पाचवी अशा आवृत्त्यांच्या तारखा टाकल्या जातांत. दोनशे पुस्तकांची एक आवृत्ती असू शकते आणि हजाराचीही असू शकते. त्यामुळे अमूक एक पुस्तक चालले, असे म्हटले जाते. विक्रीचे सारे आकडे ओलांडले, असेही सांगण्यांत येते. पु. ल. देशपांडे असताना त्यांना पुस्तक भेट देण्यांत येई अन् मग पुलंनी एकमुखाने गौरवलेले, अशी त्या पुस्तकाची जाहिरात केली जाई. त्यामुळे पुस्तकं चालतांत अन् मग त्यांना पाय फुटतांत, हे सत्य आहे. अर्थात पुस्तकांचे हे पाय अदृष्य असतात. त्यांनी गाठलेला पल्लाही दृष्यमान नसतो... अर्थात पुस्तकांना पाय फुटतात, हे वेगळ्या अर्थाने म्हटले आहे. ते कसे? याचे संदर्भासह अर्थ स्पष्टीकरण हळुहळु केले जाईलच... कधी एखाद्या मित्राचा फोन येतो अन् तो खूपवेळ असाच बोलत राहतो. खरंतर त्याला एक पुस्तक हवं असतं. नंतर ते पुस्तक शोधण्याचा कार्यक्रम सुरू होतो. घरांत ते नेहमीप्रमाणे सापडत नाही. आम्ही अलिकडे पुस्तकांच्या बाबत एक नियम केला आहे. कुणाला दिलं किंवा कुणी नेलं तर तशी नोंद एक रजिस्टरमध्ये करून ठेवत असतो. त्यातही या पुस्तकाची अशी नोंद सापडेना. मग आठवतं, कुणीतरी ते नेलंय् वाचायला. आता कुणी आपल्याकडून नेलेली पुस्तक, उधार घेतलेले पैसे अन् माहेरी गेलेली बायको कधी परत येतील याचा नेम नसतो. म्हणजे जी वेळ किंवा दिवस दिला आहे, त्या दिवशी या गोष्टी आपल्याकडे परत येतील, याचा नेमच नसतो.
 
खरं सांगायचं तर येणारच नाहीत, याची खात्री असते. आपल्याला हवी असलेली पुस्तकं आपण खरेदीच करायची असतात, हे सुभाषित झालं. मात्र ते अस्तित्वात येत नसतं. अनेकांच्या घरांत घराची सजावट म्हणून पुस्तकाची आलमारी असते. त्यात पुस्तकं नीट सजवून लावली असतात. नवे इंटिरीअर करताना पुस्तकांचेही रंग आणि मुखपृष्ठावरचे डिझाईन पाहून रंगांच्या संगतीत ती लावली जात असतात. आमच्या एका मित्राकडे मला खूपसारी इंग्रजीही पुस्तकं दिसली. त्याचा नि इंग्रजीचा संबंध केवळ पिण्यापुरता. त्याला देशी चालतच नाही. मात्र पुस्तकंच काय तो साधं वर्तमानपत्रही वाचत नाही. तरीही त्याच्या घरांत इंग्रजी पुस्तकं पाहून गांगरलोच. त्यानंच मग खुलासा केला, त्याच्या इंटेरीअर डिझायनरनेच ती पुस्तकं मुद्दाम विकत आणली होती. त्यामुळे डेकोरेशन नीट झालं होतं... आम्ही मात्र पुस्तकं खरेदी करत असतो अन् आम्हाला ती वाचायलाच हवी असतात. माणसांना राहयला जी जागा लागते त्या व्यतिरिक्त आमच्या घरांत पुस्तकांनाच जागा आहे. घरांत पुस्तकांच्या आलमार्या आहेत. बैठकीत यानेकी ड्रॉइंग रूम मध्येही कपाटं आहेत पुस्तकांची. आता कुणी आलं की आपण किती अभिजात वाचक आहोत, हे दाखविण्याची संधी त्याला मिळत असते. तो पुस्तकाच्या आलमारीजवळ जाऊन एक एक पुस्तक न्याहाळतो अन् खूप विचारांती कृती केल्यागत त्यातलं एक काढतो अन् घेऊन जातो. आपली परवानगीही घेत नाही.
 
 
एकतर पुस्तकांची आलमारी दर्शनी भागांत अन् येणार्याचा सहज वावर असेल अन् त्याचा हात पोहोचेल, अशा ठिकाणी नकोच. म्हणजे गॅसची शेगडी, वीजेच्या वस्तू अशा घातक वस्तू लहान मुलांच्या हाती लागतील अशा ठिकाणी नकोत, तशीच पुस्तकं तुमच्या घरी येणार्यांच्या हाती लागतील, अशा ठिकाणी नकोतच. म्हणून आजकाल लॉफ्ट करून उंचावर पुस्तकं असतात. तरीही काही महाभाग जवळंच स्टुल ओढून त्यावर चढून पुस्तकांपर्यंत पोहोचतात. वरून, ‘‘पुस्तकं कशी हाताशी हवीत. हँडरीच (हा नवा शब्द) मध्ये हवीत. नाहीतर नुसती कपाटात राहतात, वाचनात येतच नाहीत...’’ असा सल्लाही देतात. याचा दुसरा अर्थ असाही असतो की इतक्या उंचावर ठेवलीत पुस्तकं याचा अर्थ तुम्ही वाचत नाहीत ती. शोबाजी आहे नुसती... असं त्याला म्हणायचं असतं. तर घरी येणारे मित्र, स्नेही अगदी अधिकारानं पुस्तक काढून नेतात अन् सांगतातही, पंधरा दिवसांत देतो परत. माझं वाचन फास्ट आहे. झपाटल्यागत वाचत असतो मी पुस्तकं.
 
 
हे पुस्तक मी कित्ती दिवसाचे शोधतच होतो... खरेतर ते दुकानांत सहज मिळणारे असते. तरीही नेताना तो त्याच लेखकाचे ‘ते तमके पुस्तक वाचलेस का तू? नक्की वाचच...’असा सल्लाही देतो. ते जे पुस्तक त्याने वाचले असते, तेही त्याने कुठूनतरी असेच आणले असते अन् मग आपल्याला सुचविताना त्याला आठवते, ‘अरे! बघ, त्याला हे पुस्तक परत करण्याचे विसरलोच...’ एकदा का त्याने तुमच्याकडून पुस्तक नेले की ते परत येण्याची काहीच शक्यता नसते. कधी भेटल्यावर तोच, ‘‘अरे हो! वाचले बरं का तुझ्याकडून नेलेले पुस्तक...’’ म्हणत आणून देतो, असे सांगतो. काही जण तर पुस्तक नेताना आपल्यालाच सल्ला देतात, ‘‘तू लिहून नाही ठेवत का कुणाला दिले ते? अरे लिहून ठेवले पाहिजे. काय आहे ना पुस्तकांना पाय फुटतात. आपल्याला हवे असते तेव्हा काही आठवत नाही मग कुणाला दिले, कुणी नेले ते... नसशील लिहून ठेवत तू तर माझ्यापासून सुरू कर...’’असे म्हणत तो आपल्याला लिहायला लावतो. कधी आपण आठवणीने पुस्तक परत मागितलेच तर तो सांगतो, ‘‘अरे ते त्या तमक्याने नेले माझ्याकडून... बरे झाले तू आठवण दिलीस, मी उद्याच त्याला मागतो.’’ आपण दोन दिवस वाट पाहून त्याला फोन केलाच पुस्तकासाठी तर तो सांगतो, ‘‘अरे तो म्हणत होता की अमक्याचेच आहे ना हे पुस्तक? मग मीच नेऊन देतो त्याला. माझ्या घराजवळच राहतो तो’’ म्हणजे आता पुस्तक परत आणून देण्याची याची जबाबदारी संपलेली असते. याच्याकडून त्याच्याकडे अन् मग त्याच्याकडून तमक्याकडे असा पुस्तकाचा प्रवास सुरू असतो अन् काही दिवसांनी ते नेमके कुणाकडे आहे, हे कुणालाच नीट सांगता येत नाही...
Powered By Sangraha 9.0