प्लास्टिकचा महासागर...

    दिनांक  10-Aug-2018   प्लास्टिक माशांच्या पोटात जाऊन हजारो मासे दगावतात. शिवाय, मानवाने कचरा समजून समुद्रात टाकलेले हेच प्लास्टिक परत किनाऱ्यांवर धडकून त्याची निसर्गाकडून परतफेडही केली जाते. यासंबंधीचा एक जागतिक अहवाल नुकताच समोर आला असून त्यातील प्लास्टिकमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाची आकडेवारीही निश्चितच धोकादायक आहे.

 

प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येची तीव्रता आपण जाणतोच. त्याचे दुष्परिणामही आपल्या डोळ्यादेखत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारनेही प्लास्टिकबंदी जाहीर गेली पण, एकट्या भारतात नव्हे, तर जागतिक स्तरावरही प्लास्टिकच्या प्रदूषणाने हैदोस घातला आहे. कारण, प्लास्टिकचा वापर शून्यावरही आणता येणे तेवढे सोपे नाही. त्यामुळे अगदी सहजासहजी आपण प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून हद्दपार करू शकत नाही. पण, प्लास्टिकचा कमीत कमी वापर, पुनर्वापर, प्लास्टिकच्या वस्तूंना पर्यायी वस्तूंचा वापर हे नक्कीच शक्य आहे. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात हल्ली प्रबोधनही केले जाते. वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी तर प्लास्टिक तसेच इतर कचऱ्याचा वापर रस्तेबांधणीतही करता येऊ शकतो, असेही मागे म्हटले होते. काही देशांमध्ये तसे यशस्वी प्रयोगही झाले आहेत पण, तरीही प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येवर शाश्वत उपाययोजना सापडलेल्या नाहीत. त्यातच हे प्लास्टिक जेव्हा समुद्रात फेकले जाते, तेव्हा साहजिकच त्याचा परिणाम समुद्रीजीवांवर, प्रवाळांवर होतो. प्लास्टिक माशांच्या पोटात जाऊन हजारो मासे दगावतात. शिवाय, मानवाने कचरा समजून समुद्रात टाकलेले हेच प्लास्टिक परत किनाऱ्यांवर धडकून त्याची निसर्गाकडून परतफेडही केली जाते. यासंबंधीचा एक जागतिक अहवाल नुकताच समोर आला असून त्यातील प्लास्टिकमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाची आकडेवारीही निश्चितच धोकादायक आहे.

 

‘इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप इनिशिएटिव्ह’ या संस्थेने जगभरात केलेल्या सर्वेक्षणानुसार महासागरात एका दिवसात तब्बल 9 कोटी 20 लाख इतका कचरा टाकला जातो. यावरून प्लास्टिकमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाच्या तीव्रतेची दाहकता समोर येते. इतकेच नाही तर समुद्रातील प्लास्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ यांचे प्रमाणही अव्वाच्या सव्वा असून आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. प्लास्टिकच्या पिशव्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, समुद्रात इतक्या पिशव्या आढळून आल्या आहेत की, त्याने पाच मोठे स्विमिंग पूल भरू शकतील. खरं तर या संस्थेने प्लास्टिकच्या कचऱ्याची दिलेली आकडेवारी यापेक्षा निश्चितच अधिक असण्याची शक्यताच जास्त वाटते. कारण, असे कितीतरी समुद्रकिनारे, प्रदेश आहेत जिथे कदाचित संस्थेचे प्रतिनिधी पोहोचलेही नसतील परंतु, तरीही संस्थेने जारी केलेली ही आकडेवारी भीषण आणि डोळ्यात अंजन घालणारी आहे, हेही खरे.

 

याच कचऱ्यात स्ट्रॉचेही प्रमाण प्रचंड आहे. कारण, समुद्रकिनाऱ्यांना भेट देणारे लोक सहसा ज्यूस, नारळपाणी पिऊन स्ट्रॉ सर्रास समुद्रात टाकणे पसंत करतात. संस्थेच्या आकडेवारीनुसार, समुद्रात इतके स्ट्रॉ आढळले आहेत की, त्याचा तब्बल 243 किमीचा रस्ताच तयार होऊ शकतो. आहे की नाही धक्कादायक...? त्याचबरोबर समुद्रात मिळालेल्या धाग्यादोऱ्यांची संख्याही इतकी आहे की, त्यापासून म्हणे 28 किमी लांब टॉवेलच तयार होऊ शकतो. या सगळ्या मानवी कचऱ्याबरोबरच आणखीन एक विचित्र घटक कचऱ्यात आढळून आला आणि ती म्हणजे सिगारेट. रस्त्यावर एरवी दिसणारी सिगारेटची थोटकं समुद्रातही आढळून आली आणि तीही थोडीथोडकी नाही तर तब्बल 24 लाख. याशिवाय 17 लाख अन्नपदार्थांच्या पिशव्या, 15 लाख प्लास्टिकच्या बाटल्या, 11 बाटल्यांची झाकणे जवळपास दिवसाला प्राप्त होत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

 

त्यामुळे समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाची ही आकडेवारी अतिशय चिंताजनक असून त्यावर जागतिक स्तरावर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. जागतिक स्तरावर सर्व देशांनी एकत्र येऊन, एका व्यासपीठावर याबाबत ठोस निर्णय घेतल्यास प्लास्टिकच्या या जलप्रदूषणावर निश्चितच आळा बसू शकेल. त्याचबरोबर प्रत्येक देशात यासंबंधीचे कडक कायदे आहेतही, पण त्यांच्या अंमलबजावणीकडेही तितकेच गांभीर्याने पालन करण्याची आज गरज आहे. समुद्रात कचरा टाकला की त्याची विल्हेवाट झाली, जमिनीवरून तरी गेला, असं विचार नागरिकांनी न करता जे काही आपण समुद्रात टाकतोय, ते नंतर आपल्याकडेच परत येणार आहे, याचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे.