मराठा आरक्षणासाठी सोलापुरात चक्का जाम

    दिनांक  01-Aug-2018

 
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून आज पुन्हा एकदा चक्का जाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाकडून आज सकाळपासून चक्का आंदोलन सुरु करण्यात आले असून पुणे-सोलापूर महामार्गावर मराठा समाजाकडून 'रास्ता रोको' करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्ग पूर्णपणे जाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस येथे मराठांकडून रास्ता रोको करण्यात आला आहे. आज सकाळी ११ च्या सुमारास आसपासच्या गावातील मराठा युवकांनी महामार्गावर ठिय्या मांडत रस्ता अडवून धरला आहे. त्यामुळे महामार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली असून सामान्य नागरिकांना वेठीस न धरण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे. दरम्यान खान्देशात देखील मराठा समाजाकडून काही ठिकाणी रास्ता रोको केला जात आहे. जळगाव-औरंगाबाद महामार्गावर मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला असून त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.
 

मुंबईमध्ये आज 'जेल भरो' आंदोलन

मुंबईमध्ये आजपासून 'जेल भरो' आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. गेल्या रविवारी लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांच्या झालेल्या बैठकीमध्ये सरकारला आरक्षण लागू करण्यासाठी ९ ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला होता. तसेच १ तारखेपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यानुसार आजपासून मुंबईमध्ये जेल भरो आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे..