दिघी दारुगोळा कारखान्याच्या रेड झोनची मर्यादा ५०० मीटर करण्याची मागणी

01 Aug 2018 10:59:23
 
 
 
 
नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील दिघी येथील लष्कराच्या दारुगोळा कारखान्याच्या रेड झोनची मर्यादा ५०० मीटर करण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून सुधारित अधिसूचना काढण्यात यावी, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेत केली.
 
 
लोकसभेत शून्य प्रहरात पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, लष्कराच्या खडकी दारुगोळा कारखान्या अंतर्गत दिघी दारुगोळा कारखाना उभारण्यात आला. या कारखान्याच्या हद्दीतील ११४५ मीटर पर्यंतचा परिसर हा रेड झोन म्हणून प्रतिबंधित करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील दिघी, भोसरी, मोशी आणि चार्होळी गावांतील ५० हजार घरे प्रभावित झाली आहेत.
 
 
या प्रश्नाबाबत २००५ मध्ये पिंपरी चिंचवड महानगर पालिका, जिल्हाधिकारी आणि लष्कराचे अधिकारी यांच्यामध्ये एक करार झाला, करारानुसार रेड झोन ६१० मीटर करण्याचा निर्णय झाला. हा करार संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, मंत्रालयाकडून याबाब कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. परिणामी या भागात मोठ‌्या प्रमाणात घरे बांधण्यात आली. आता हा प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने तातडीने पावले उचलत रेड झोनची मर्यादा ५०० मीटर करण्याची गरज आहे. तसे निर्देश लोकसभा अध्यक्षांच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालयास देण्यात यावे व याबाबत सुधारित अधिसूचना काढण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0