पाकव्याप्त काश्मीरमध्येही ‘आझादी’चे नारे...

    दिनांक  09-Jul-2018   


 

एका बाजूला पाकिस्तान सरकारने नाकारलेले अधिकार आणि दुसऱ्या बाजूला दहशतवादी, पाक लष्कर, आयएसआयच्या अत्याचारांनी ग्रस्त असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना कोणीही वाली नसल्याचेच यावरून दिसते. आता भारतानेच या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत हा प्रश्न कायमचा सोडविण्याची व पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा एकदा देशाशी जोडण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

पाकव्याप्त काश्मीर या भारताच्या अविभाज्य भागावर पाकिस्तानने बळाने कब्जा केल्याचे आपण जाणतोच. भारताने वेळोवेळी पाकव्याप्त काश्मीरवर आपलाच हक्क असल्याचे निरनिराळ्या जागतिक व्यासपीठांवरही ठासून सांगितले. आता तर गेल्या काही वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेनेच पाकिस्तानविरोधात उघडउघड भूमिका घेत निदर्शने केल्याचेही पाहायला मिळाले. पाकिस्तानी सरकार करत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात पुन्हा एकदा इथल्या नागरिकांनी संतप्त आंदोलन छेडले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथे वाढत्या दहशतवादी घटनांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले व त्यांनी दहशतवादी तथा पाक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

पाकिस्तान सरकारच दहशतवाद्यांचे पाठिराखे असल्याचे आणि त्यांना आर्थिक मदत करत असल्याचे आरोपही यावेळी नागरिकांनी केले. पाक सरकारविरोधातला पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांचा असंतोष ही काही आजची गोष्ट नाही. पाकिस्तानने नेहमीच इथल्या लोकांना सावत्रपणाची वागणूक दिली. भारताच्या ताब्यातला हा प्रदेश स्वतःच्या हातात आल्यावर पाकिस्तान सरकार व लष्कराने इथल्या लोकांना कधीही आपले मानले नाही. इथल्या लोकांना फक्त कामगार म्हणून आणि इथल्या जमिनीला फक्त नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करण्यासाठीच वापरून घेतले. इथल्या नागरिकांना ना कधी सन्मानाने वागवले ना कधी त्यांना त्यांचे हक्क दिले. नंतरच्या काळात तर दहशतवादाच्या राक्षसाने डोके वर काढले आणि पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या आयुष्याचाच खेळ झाला. पाकिस्तान सरकारने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवठा केला. पाक सरकारच्या रसदेवर पोसलेल्या या संघटनांनी भारताकडील काश्मीरसह पाकव्याप्त काश्मीरमध्येही धुमाकूळ घातला, ज्यामुळे हजारो निष्पाप, निरपराध्यांचा बळी गेला. तेव्हाही इथल्या लोकांनी या दहशतवादाला विरोधच केला, पण अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्यानंतर सर्वच जगातिक सत्तांनी लष्कर-ए-तोयबाविरोधात आघाडी उघडली. जागतिक सत्तांनी लष्कर-ए-तोयबाविरोधात आघाडी उघडल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या लढ्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. दरम्यानच्या काळात पाकिस्तानवरील जागतिक दबावामुळे त्या देशाने मसूद अझहरच्या नेतृत्वाखाली जैश-ए-मोहम्मद या नावाने दहशतवादी संघटना सक्रिय केली. त्यानंतर इथल्या लोकांची अवस्था अधिकच बिकट झाली. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे सदस्य सरदार जागीर खान म्हणाले की, “आम्ही कितीही विरोध केला तरीही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयद्वारा जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली जाते. ज्यामुळे आम्ही उद्ध्वस्त होत आहोत. जग आता आम्ही राहतो त्या जागेला दहशतवादाचा गड समजते आहे, पण आमचे कोणीही ऐकत नाही.

 

पाकव्याप्त काश्मीरच्या तरार खेलमधील स्थानिक रहिवाशांनी पाकिस्तानवर जबरदस्तीने जमीन बळकावणे, भ्रष्टाचार, भेदभाव आणि अत्याचाराचाही आरोप केला. स्थानिक प्रशासन इस्लामाबादच्या हातातली कठपुतळी असल्याचाही दावा त्यांनी केला. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, “आम्हाला कित्येक दशकांपासून मूलभूत मानवाधिकार आणि सुविधांपासून वंचित ठेवले गेले. इथे ना आरोग्याच्या सुविधा आहेत ना रस्ते आहेत. विशेष म्हणजे, इथे आमच्या डोक्यावर नेहमीच जीव जाण्याची टांगती तलवार असते.त्यामुळे एका बाजूला पाकिस्तान सरकारने नाकारलेले अधिकार आणि दुसऱ्या बाजूला दहशतवादी, पाक लष्कर, आयएसआयच्या अत्याचारांनी ग्रस्त असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना कोणीही वाली नसल्याचेच यावरून दिसते. आता भारतानेच या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत हा प्रश्न कायमचा सोडविण्याची व पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा एकदा देशाशी जोडण्याची गरज निर्माण झाली आहे.