केशवसृष्टी ग्रामविकासतर्फे वीस हजार वृक्षांची लागवड

08 Jul 2018 21:15:56



 

वाडा: वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यातील ४२ गावांमध्ये आंबा, काजू आणि पेरूच्या उच्च प्रतीची २० हजार ,१८६ झाडे रविवारी लावण्यात आली. केशवसृष्टी ग्रामविकास योजना या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे व आसपासच्या विविध शहरांतील १२३८ लोक सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर, इंजिनियर, वकील, उद्योगपती, विविध कंपन्यांचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वृक्षप्रेमी इत्यादी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

 

केशवसृष्टी ग्रामविकास योजनेच्या माध्यमातून वाडा, विक्रमगड व जव्हार तालुक्यातील ४० गावांमध्ये ग्रामविकासाचे कार्य सुरू असून यामध्ये प्रामुख्याने जल, कृषी, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, उद्योग, सरकारी योजना, सौरऊर्जा, कौशल्य विकास या विषयांमध्ये मागील वर्षापासून कार्य सुरू आहे.

सदर वृक्षलागवडीसाठी ४२ गावांतील १०३९ शेतकर्‍यांनी आपआपल्या शेतात तसेच उपलब्ध जागेत उन्हाळ्यात खड्डे तयार केले. त्याप्रमाणे त्यांना फळझाडे विनामूल्य वाटप करण्यात आली. अनेक गावांमध्ये वृक्षदिंडी काढून पारंपरिक पद्धतीने रोपांची पूजाअर्चा करण्यात आली तर वृक्षलागवडीसाठी सहभागी शहरातील नागरिकांसाठी त्या त्या गावातील एकूण १२४ शेतकर्‍यांनी आपआपल्या घरी भोजनव्यवस्था केली होती.

वृक्षारोपणात प्रामुख्याने फळझाडांची लागवड केल्याने पुढील काही वर्षात शेतकर्‍यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊन वृक्षारोपणासाठी आलेल्या शहरातील या नागरिकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध प्रस्थापित होतील, असे मत केशवसृष्टीचे विश्वस्त बिमल केडिया यांनी व्यक्त केले आहे तर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या वृक्षलागवडीत सहभागी झाल्याने शेतकर्‍यांना अत्यंत आनंद झाला आहे तसेच शहरातील जनतेला ग्रामीण संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने तेदेखील खूप समाधानी झाल्याचे संतोष गायकवाड, अरविंद माडीकर यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0