उष्णतेच्या जागतिक झळा

    दिनांक  05-Jul-2018   


 
 
अक्राळविक्राळ हिमनगांना उष्णतेच्या झळांनी अगदी लाटेत रुपांतरीत करुन टाकले. हिमनग वितळण्याचे हे प्रमाण दिवसागणिक वाढतच असून त्याचा सर्वाधिक फटका युरोपला बसला आहे. तेथील देशांमध्ये पर्जन्यवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि समुद्राची वाढलेली पातळी त्यासाठी जबाबदार असल्याचेही कालांतराने समोर आले. तेव्हा, एरवी गारठलेल्या उत्तर गोलार्धातील उष्मालाटेने मात्र तेथील देशांच्या तापमान आणि वातावरणात प्रचंड तफावत निर्माण झालेली दिसते. 
 
 

आपल्याकडे सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरु असला तरी, जागतिक स्तरावर मात्र वातावरण चांगलेच तापले आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ अर्थात जागतिक तापमानवाढ याला सर्वस्वी जबाबदार असल्याचा निष्कर्ष यावरुन तज्ज्ञांनी काढला असून उच्च तापमानाचे वेगवेगळ्या शहरातील उच्चांकही मोडीत निघाले आहेत. त्यामुळे उत्तर गोलार्धातील उष्णतेच्या या लाटेने अमेरिकेपासून ते अगदी युरोपीय देशांनाही चटके बसले. एरवी उत्तर गोलार्ध म्हटले की, कडाक्याची, गोठवणारी थंडी असे चित्र समोर येते. त्यातच मोठमोठाले हिमनग आणि हिमनद्यांची पांढरी शुभ्र चादर हेही या उत्तरेचे शीतवैशिष्ट्य. परंतु, आगामी काळात तापमानवाढीच्या परिणामस्वरुप उत्तर गोलार्धातील बर्फ वितळून महासागरांची पातळी वाढण्याची भीती यापूर्वीच शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. त्याची प्रचिती देणाऱ्या घटनाही उत्तर गोलार्धात उघडकीस आल्या. अक्राळविक्राळ हिमनगांना उष्णतेच्या झळांनी अगदी लाटेत रुपांतरीत करुन टाकले. हिमनग वितळण्याचे हे प्रमाण दिवसागणिक वाढतच असून त्याचा सर्वाधिक फटका युरोपला बसला आहे. तेथील देशांमध्ये पर्जन्यवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि समुद्राची वाढलेली पातळी त्यासाठी जबाबदार असल्याचेही कालांतराने समोर आले. तेव्हा, एरवी गारठलेल्या उत्तर गोलार्धातील उष्मालाटेने मात्र तेथील देशांच्या तापमान आणि वातावरणात प्रचंड तफावत निर्माण झालेली दिसते.

 

उत्तर अमेरिका, कॅनडा, आईसलँड तसेच युरोपीय देशांमधील कित्येक शहरांमध्ये आजपर्यंतचे तापमानाचे रेकॉर्ड मोडले. डेनव्हरमध्ये गुरुवारी तब्बल ४० अंश सेल्सिअस तापमानाची उच्चांकी नोंद करण्यात आली. भारतीय उपखंडात, विष्ववृत्तानजीकच्या प्रदेशांसाठी ४० अंश सेल्सिअस तापमानही फारसे भीषण भासत नसले तरी, उत्तर गोलार्धातील शहरांसाठी ते निश्चितच सर्वसाधारण तापमानाच्या काहीपट अधिक आहे. म्हणजे, भारतात साधारण ४०-४५ अंश सेल्सिअस तापमान काही प्रदेशांमध्ये उन्हाळा नसतानाही वाढलेले दिसून येते. पण, उत्तर गोलार्धात ही अजिबात सामान्य बाब नाही. कारण, उष्णता वाढल्यामुळे हवेतील आर्द्रताही वाढते आणि त्याचा दुष्परिणाम नागरी आरोग्यावरही होतो. स्कॉटलंड आणि युकेमधील तापमानवाढीनेही असेच उष्णतेचे रेकॉर्ड्स मोडले. युरेशिया, जॉर्जिया, अर्मेनियामध्येही उष्णतेच्या असहनीय झळांनी नागरिकांच्या चिंतेत भर घातली.

 

उत्तर गोलार्धातील या उष्मालाटेची झळ मध्य-पूर्वेकडील सौदी अरब, येमेन, कुवेतसारख्या आखाती देशांनाही बसली. म्हणजे, शुष्क आणि वाळवंटी अशा या प्रदेशात एरवीही उष्णतेचे चटके बसतात, पण गेल्या आठवड्यातील तेथील तापमानानेही ४० अंश सेल्सिअसचा पल्ला पार केला आणि तापमानवाढीचे नवीन उच्चांकाची नोंद करण्यात आली. एकीकडे अशाप्रकारे जागतिक तापमानवाढ आणि आर्क्टिक-अंटार्क्टिकमधील हिमशिखरे वितळण्याच्या संख्येत वाढ झाली असली तरी, संयुक्त अरब अमिरातीसारख्या श्रीमंत देशाने याचाच फायदा आपल्या देशातील पेयजल समस्या सोडविण्यासाठी घेतल्याचे दिसते. कारण, या देशातील पाण्याची गंभीर समस्या पाहता, त्यावर उपाय म्हणून तब्बल पाच हजार मैल दक्षिणेकडून उत्तरेकडे तीन कि.मी लांबीचा एक मोठा हिमनग बोटींनी खेचून आपल्या देशात आणण्याचा संयुक्त अरब अमिरातीचा मानस आहे. असे झाल्यास या देशाला २० अब्ज गॅलन इतके पिण्यालायक पाणी उपलब्ध होऊ शकते. दुबईचा हा महत्त्वाकांक्षी प्रयोग यशस्वी झाला तर, येत्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या देशांमध्ये हिमनगांच्या अशा ओढताणीची चढाओढ रंगली, तरी आश्चर्य वाटायला नको.

 

जागतिक तापमान वाढीला हरितगृहवायूंचे होणारे उत्सर्जन आणि वाढते प्रदूषण कारणीभूत आहेच. त्यामुळे विकसित आणि विकसनशील देशांनी यावर सामोपचाराने मार्ग काढून कार्बन उत्सर्जन घटविण्याची आपली वैश्विक जबाबदारी विसरता कामा नये. सोबतच वृक्षतोडीवर कडक निर्बंध आणि वसुंधरेचे हरितकवच कसे अबाधित राहील, याचा विचार केवळ विविध राष्ट्रांनी नाही तर प्रत्येक नागरिकाला करावा लागेल. कारण, कुठल्याही देशाच्या कोपऱ्यात आपण श्वास घेत असलो तरी हे जीवन याच ‘जगाच्या पाठीवर’ व्यतीत करायचे आहे, हे कसे विसरुन चालेल...