डोंबिवलीकरांच्या नशिबी यंदाही खड्डेच

04 Jul 2018 22:34:54




डोंबिवली : एमआयडीसी निवासी विभागात मागील वर्षी खड्ड्यांची समस्या ‘जैसे-थे’ राहिली होती. यासह शहरातील अन्य सुस्थितीत असलेले रस्तेही खड्ड्यात जाऊ लागले आहेत. हे रस्त्यातील खड्डे त्रासदायक ठरत असताना आता त्यावर अपघात होऊ लागले आहेत. एमआयडीसी निवासी विभागातील वृद्ध गृहस्थ सुधाकर लोखंडे जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीकरांच्या नशिबी खड्ड्यांतून प्रवास करणे कायम आहे.

 

एमआयडीसी निवासी विभागातील रस्त्यांच्या अवस्थेमुळे येथील रहिवाशी गेल्या वर्षभरापासून त्रस्त आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना तसेच रहिवासी असोसिएशनेही सातत्याने कडोंमपाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतचे पाऊल उचलण्यात आलेले नाही. या ठिकाणी गटार बांधणीच्या कामापायी पालिकेकडून खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले. असेच विविध कामांसाठी खोदण्यात आलेले खड्डेे बुजविण्यात न आल्याची तक्रार येथील नागरिक करत आहेत. मात्र, पालिकेचे त्याकडेही दुर्लक्ष असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या भागातील रहिवासी सुधाकर लोखंडे यांची दुचाकी खड्यात पडून त्यांच्या हाताला मार लागल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या भागातील रस्त्यांची चाळण पाहता असे प्रकार वारंवार घडू शकतील, अशी भीती येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.

 

पूर्वेतील घरडा सर्कल ते टिळक चौक हा मुख्य रस्ताही पावसाळ्यापूर्वी कल्याण- डोंबिवली महापालिकेने सुधारित करून घेतला होता. मात्र, या सततच्या पावसाने या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पाडले आहे. टिळक चौकात मोठे खड्डे पडले असून मंजुनाथ शाळेजवळील रस्त्यावरची वाळूही वर आली आहे. त्यामुळे या ठिकाणीही वाहन अपघाताची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान कल्याण-डोंबिवली वाहतुकीला सोयीस्कर मार्ग असलेल्या कल्याण शीळ रोडलाही खड्डे पडले असल्याने या रस्त्यावर सातत्याने असलेली वर्दळ लक्षात घेता येथेही अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Powered By Sangraha 9.0