आरक्षणासाठी राज्यात सातवा बळी

    दिनांक  31-Jul-2018

बीडमध्ये तरुणाचा गळफास
बीड : मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये आज सातवा बळी गेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यामागणी बीड जिल्ह्यातील अभिजित देशमुख या ३१ वर्षीय तरुणाने आज सकाळीच गळफास लावून घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी म्हणून आपण हे पाऊल उचलत असल्याचे अभिजितने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे.


बीडमधील केज तालुक्यातील विडा या गावामध्ये आज सकाळी ही घटना घडली आहे. या गावामध्ये असलेल्या अभिजित बाळासाहेब देशमुख याने आज सकाळी गळफास लावून घेतला आहे. उच्च शिक्षित असून देखील नोकरी नाही, शेती करण्यासाठी बँकेतून कर्ज उपलब्ध होत. तसेच घरच्या वाईट परिस्थिती आणि मराठा आरक्षण यासाठी आपण गळफास घेत असल्याचे अभिजितने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते.


आज सकाळी घटना उघड झाल्यानंतर विडा गावामध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी विडा गावामध्ये आणि आसपासच्या परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन देखील पोलिसांकडून केले जात आहे.
 

लातूरमध्ये तरुणांकडून आत्मदहनाचा इशारा

दरम्यान लातूरमध्ये देखील मराठा आंदोलन तीव्र होऊ लागले असून आरक्षणासाठी लातूरमधील औसा तालुक्यातील काही मराठा तरुणांनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. औसातील तालुक्यातील काही तरुणांनी लेखी निवेदनामधून हा इशारा दिला असून तत्काळ आरक्षण न दिल्यास आत्मदहन करू, असे त्यांनी म्हटले आहे. .