काँग्रेस सोशल मिडिया समिती सदस्याला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक

31 Jul 2018 20:37:25

 
 
नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या केंद्रीय सोशल मिडिया समितीच्या सदस्याला माजी महिला सहकाऱ्यासोबत विनयभंगाच्या आरोपावरून काल अटक करण्यात आली. चिराग पटनाईक असे आरोपीचे नाव असून त्याच्याच एका माजी सहकारी महिलेने त्याच्याविरोधात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. ३ जुलै रोजी संबंधित महिलेने चिराग विरोधात दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. त्यानुसार त्याला काल अटक करण्यात आली.
 
 
चिराग यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत माझ्यासोबत अश्लील वर्तन केले. मी शब्दाने व कृतीने सांगूनही त्यांनी आपले कृत्य थांबवले नाही व माझा विनयभंग केला असे तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. चिराग याला कालच जामीन मिळाल्यामुळे त्याची लगेचच सुटका करण्यात आली.
 
 
 
दरम्यान या संदर्भात पक्षाच्या नियमांनुसार चिरागवर चौकशी चालू आहे. मात्र हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे तसेच पक्षाची अंतर्गत चौकशी चालू असल्यामुळे याविषयी अधिक काही बोलता येणार नाही अशी प्रतिक्रिया पक्षाच्या सोशल मिडिया प्रमुखे दिव्या स्पंदना उर्फ रम्या यांनी ट्वीटर वरून दिली.
 
Powered By Sangraha 9.0