‘त्या’ प्रकरणाची त्वरित चौकशी करा : सुभाष म्हस्के

31 Jul 2018 20:04:36



डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना यात आता केडीएमटीचा भारही कडोंमपाला उचलावा लागत आहे. केडीएमटीच्या कार्यपद्धतीमुळे परिवहन खाजगीकरणाची मागणी पुन्हा जोर धरत आहे. अनेक गोष्टींमधील दिरंगाईची केडीएमटीची उदाहरणे समोर असताना नव्याने बस देखभाल दुरुस्तीच्या नावे सुमारे एक कोटींचा निधी दिल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे परिवहन विभागाला तितकेसे गांभीर्य नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तसेच या संदर्भात कोणतीही माहिती परिवहन सभापती व सदस्य यांच्यासमोर न ठेवल्याने या संबंधित योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन सभापती सुभाष म्हस्के यांनी दिले आहेत.

 

मे. श्यामा अँड श्यामा कंपनीला कल्याण-डोंबिवली परिवहन विभागाच्या गाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी ते काम पूर्ण न करता त्यांना एक कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती सदस्यांसमोर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली. यावेळी काम अर्धवट असताना कंपनीला निधी कसा आणि कोणी दिला, यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनावर टीका केली व सभागृहात एकच गोंधळ उडाला. याविषयी अहवाल सादर करण्याचे आदेश म्हस्के यांनी केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांना दिले. यावेळी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सर्वपक्षीय सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, प्रशासन समितीला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

Powered By Sangraha 9.0