महिलासबलीकरणासह ध्यास बाल संगोपनाचा

    दिनांक  31-Jul-2018


 

 

शिक्षण हा महिलांच्या प्रगतीतील महत्त्वाचा भाग आहे. पण, आपल्या शिक्षणातून सामाजिक भान जपले पाहिजे. या जाणीवेतून ‘इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम’च्या महिला काम करीत आहे. महिला सबलीकरण व गरजू मुलांसाठी उत्तम भविष्य हे मूळ उद्दिष्ट उराशी बाळगून ८ फेब्रुवारी २००८ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. या ‘इनरव्हील क्लब’ची मूळ स्थापना लंडनमधील मार्ग्रेट गोल्डी यांनी केली. त्यांच्या मुख्य ध्येयाला आपले ध्येय मानत २००८ साली ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट’या संस्थेची स्थापना झाली.
 

रोटरी च्या जिल्हा अध्यक्षा छाया भडकमकर यांच्या देखरेखीखाली तसेच रोटरी प्रेसिडेंट सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली’ संस्थेचे काम सुरू झाले. सुरुवातीच्या काळात २२ जणी या संस्थेच्या सदस्या होत्या. यावेळी या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गीता कुलकर्णी यांनी पहिली, तर सचिव म्हणून राजेश्वरी सुब्रमण्यम यांनी काम पहिले. सद्यस्थितीत संस्थेत सुमारे ४० महिला आहेत. यामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असून यात काही गृहिणी आहेत. यात काही डॉक्टर्स तर काही उच्च पदावर नोकरीला असल्याने महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बैठक घेऊन कार्यक्रम करण्याची एक शिस्त या संस्थेने आपल्या सहकाऱ्यांना घातली आहे. तसेच प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष लागवड व संवर्धनाची शपथ ही या संस्थेतील सदस्यांनी घेतली आहे.

 

सुरुवातीच्या काळात रक्तदान शिबिरे, देहदान तसेच अंध मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन संस्थेने केले. तसेच शासकीय अनुदानित शाळांमध्ये ‘हॅप्पी स्कूल’सारख्या संकल्पना राबविण्यात आल्या. या संकल्पना आजतागायत राबविल्या जातात डोंबिवली पश्चिमेतील तोंडवळकर विद्यालयाला अनुदान देऊन त्यांच्या मदतीने शाळेचे नूतनीकरणही करण्यात आले. तसेच अंधबांधवांना अक्युप्रेशरचे क्लासेस घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीची एक मोहीम राबविण्यात आली. आधारवाडीमधील महिला कैद्यांच्या मुलांसाठी खेळणी तसेच इतर उपयोगी वस्तू देण्याचा अभिनव उपक्रम या संस्थेच्यावतीने केला जातो. सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव तसेच सार्वजनिक उत्सवात घडणारी नागरी सुविधांबाबतची हेळसांड या सगळ्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा घातक परिणाम ही बाब आता सत्य आहे. अशा समस्यांना वाचा फोडण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांमध्येच जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून येथील ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम’, ‘इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम’ आणि ‘पर्यावरण दक्षता मंडळ’ डोंबिवली शाखा याच्या संयुक्‍त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवले जाते. याअंतर्गत आपल्या परिसरातील तीन शाळांच्या सहभागातून येथील औद्योगिक निवासी विभागातील ज्ञानमंदिर विद्यालय, निळजे येथील सर्वोदय विद्यालय आणि केंब्रिज इंग्लिश स्कूल या शाळांमधून चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी विषय होते- गणपतीचे स्वागत,प्रदूषित नदी. या पर्यावरणाशी नाते सांगणाऱ्या विषयांवर मुलांना निबंध लिहिण्यास व चित्रे काढण्यात सांगितली.

 

‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे संदेश देत तसेच झाडे किती महत्त्वाची आहेत, हे पटवून देत सेंट जोसेफ शाळेच्या विद्यार्थिनींनी झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. डोंबिवलीत प्रथमच अशा प्रकारचे आगळेवेगळे रक्षाबंधन केले. ‘इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम’ या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम’च्यावतीने या शाळेत विद्यार्थ्यांची ‘निसर्ग व मी’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. संस्थेने ‘स्वामी अरुणोदय विद्यालय’ दत्तक घेऊन येथे पर्यावरण स्नेही उपक्रम राबवण्यात आला आहे. यानुसार इकोफ्रेंडली आकाशकंदील, शाडूचे गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. समाजाने पर्यावरणाशी नाळ कायम राखावी, यासाठी पर्यावरणाच्या घटकांशी संबंधित प्रस्थापित करण्याचे काम ही संस्था करते. त्यानुसार दरवर्षी पक्षी निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. ‘जैविक खतनिर्मिती’ हा सध्या ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. यासाठी संस्था जनजागृती करते. नुकताच, या संस्थेच्यावतीने कापडी पिशव्या बनविण्याचा व मोफत वाटपाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. संस्थेतील सदस्यांकडून जुन्या साड्या घेतल्या गेल्या. गरजू महिलांना त्या साड्यांपासून पिशवी बनवण्यास सांगितले. त्यामुळे या महिलांना रोजगार उपलब्ध झाला. या महिलांनी बनविलेल्या पिशव्या पुन्हा मोफत वाटण्यात आल्या. हेतू हा की, प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद व्हावा व कापडी पिशव्यांचा वापर लोकांनी करावा. येत्या वर्षभर त्यांचा हा उपक्रम सुरू असून यामुळे गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगत या संस्थेच्या अध्यक्षा आरती मोघे यांनी आनंद व्यक्त केला.

 

‘इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट’तर्फे अंधांसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विविध भागातून बुद्धिबळपट्टूंनी यात भाग घेतला असून तब्बल ५० अंध बुद्धिबळपट्टूंनी यात भाग घेतला आहे.डोंबिवली, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथून खेडाळू या स्पर्धेसाठी आले होते. संस्था विविध मार्गाने समाजकार्य करत असते. वाकडी येथे कुष्ठरूग्णांसाठी वृद्धाश्रम, मुलांसाठी वसतिगृह, शाळा, कुष्ठरोगासाठी वसाहतीलाही संस्थेने आवश्यक मदत केली. इथे पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष होते. संस्थेने अथक प्रयत्न करून त्यांच्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. भविष्यात तसेच या ठिकाणी समाजाने नाकारलेल्या आणि कुठेही स्थान नसलेल्या दुर्दैवी कुष्ठरोगी बांधवांसाठी लेप्रसी कॉलनी तयार करण्याचा या संस्थेचा मानस आहे. दरवर्षी या संस्थेच्या माध्यमातून एका शासकीय रुग्णालयाला मदतीचा हात द्यायचा पायंडा आहे. त्याप्रमाणे यंदा टाटा मेमोरियल रुग्णालयाला मदत देण्यात येणार आहे.

 

या संस्थेचा वार्षिक कारभार हा १ जुलै ते ३० जून या कालवधीचा असतो. या दरम्यानच अध्यक्षांचे कार्यभार बदलतात. यंदाच्या वर्षात सार्वजनिक शौचालयात, शाळेत सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर वापरलेल्या नॅपकीन्सच्या विल्हेवाटीसाठी मशीनही बसविण्यात येणार आहेत. यात आतापर्यंत चार शाळांमध्ये ही मशीन्स बसविण्यात आली आहेत. टिटवाळा येथील एक आणि डोंबिवली येथील तीन शाळांमध्ये बसविण्यात आली आहेत. ‘चाइल्ड लाईन वेल्फेअर’च्या मदतीने शाळांमध्ये ‘स्पर्श’ हा प्रकल्प राबविण्यात आला. यात मुलांना चांगले स्पर्श व वाईट स्पर्श शिकविण्यात आले. या कामांसाठी लागणारी आर्थिक व्यवस्था ही सदस्यांमार्फत केली जाते. तसेच यंदा आधारवाडी कारागृहात असणाऱ्या महिला कैदींसाठी ‘स्किन टेस्ट’ ही घेण्यात येणार आहे. १९७१ च्या युद्धात सामील झालेल्यांचा सन्मान या संस्थेच्यावतीने करण्यात येतो. याचबरोबर खर्डी गावात ५० वृक्ष वाटपाची मोहीम हाती घेण्यात आली. याअंतर्गत आर्थिक उलाढाल करता येईल, अशा झाडांचे वाटप येथील शेतकऱ्यांना करण्यात आले. विज्ञान कार्यशाळा, महिलांसाठी रॅली, वृद्धांना तसेच शिकण्याची आवड असणाऱ्यांना शिक्षित करणे, शाळा ना ई-लर्निंग किट पुरविणे, वृद्धांमध्ये डिजिटल जागृती तयार करणे, वृद्धाश्रमांना डायपर पुरविणे असे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत व अनेकांवर काम सुरू आहे.

 

संस्थेच्या अध्यक्षा आरती मोघे, उपाध्यक्ष श्रुती पारसनीस, सचिव राजेश्वरी सुब्रमण्यम, खजिनदार नीता कुलकर्णी, इंटरनॅशनल सर्व्हिस ऑर्गनायझर अनुजा दुनाखे, निलिमा नगदा या मुख्य असून यांच्याशी निगडित सहा छोट्या कमिटी आहेत.